फुलपाखरांचे स्थलांतर कसे होते?

    17-Feb-2025   
Total Views |
 
Butterfly Migration
 
सध्या मुंबईनजीकच्या तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि पश्चिम घाटातील जंगलांमध्ये फुलपाखरांचे थवेच्या थवे दिसू लागले आहेत. काही किमीचे स्थलांतर करून ही फुलपाखरे इथल्या जंगलाच्या आसर्‍याला आली आहेत. फुलपाखरे स्थलांतर कशा पद्धतीने करतात, त्यांची दिशा काय असते, कालावधी कोणता असतो, याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
 
हेमंत ऋतूच्या आगमनाबरोबर सह्याद्रीच्या जंगलात सुखद गारवा पसरतो. थंडीने जंगल गोठून जात. गारव्याच्या चादरीला छेद देऊन कोवळ्या किरणांची तिरीप एका फांदीवर पडते. त्या मंद प्रकाशात फांदीवरून पारंब्यांसारख्या लटकलेल्या वेलीवर काही आकृत्या उभारुन येतात. एखाद्या वाळलेल्या पानासारख्या या आकृत्या दिसतात. मात्र, नीट निरखून पाहिल्यावर आपल्याला वेलींवर लटकलेल्या आकृत्यांमधील सजीवपणाची जाणीव होते. शेकडोंच्या संख्येने स्टाईड टायगर प्रजातीची फुलपाखरे एकमेकांच्या जवळ पंख मिटून दाटीवाटीने बसून असतात. उन्हे चढू लागल्यावर वातावरणातील उष्मा वाढते. अशा वेळी शीतरक्तीय असणारी ही फुलपाखरे उन्हाचा शेक घेऊन उडण्याकरिता योग्य ऊर्जा मिळवतात आणि मोत्याची माळ तुटावी आणि मोती पसरावेत, तशी हीफुलपाखरे भराभर हवेत उडून निघून जातात. साधारण डिसेंबर-जानेवारी रोजीदरम्यान सह्याद्रीच्या खोर्‍यात हजारोंच्या संख्येने दिसणारी ही फुलपाखरे मायग्रेशन म्हणजेच स्थलांतर करून येतात. मात्र, या मायग्रेशनची नेमकी उकल अजूनही झालेली नाही.
 
फुलपाखरांचे स्थलांतर
 
पक्षी आणि फुलपाखरांच्या स्थलांतरामध्ये काही फरक आहेत. फुलपाखरांचे आयुष्य कमी असते, जी पिढी दक्षिणेकडे स्थलांतर करून अंडी घालते, ती तिथेच मरते. त्यांची पुढची पिढी परत उत्तरेकडे उडत येते. फुलपाखरांच्या एकत्र जमावाला ‘लेपसीशसरींळेप’ म्हटले जाते. साधारणतः पावसाळा संपत आला की फुलपाखरांच्या जमावाला सुरुवात होते आणि मार्च-एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहते. याचा नेमका कालावधी, प्रदेश असे काही सांगता येत नाही. ही फुलपाखरे दाट जंगलातील ओढ्याच्या आसपासच्या ओलसर आणि दमट भागात जमू लागतात. तिथे जवळपास आठवडाभर थांबतात. भारतात अशा प्रकारच्या फुलपाखरांच्या जमावाचा (लेपसीशसरींळेप) किंवा मायग्रेशनचा अभ्यास थोड्याफार प्रमाणात झाला आहे. फुलपाखरांचे स्थलांतर हे पश्चिम घाट ते पूर्व घाट असे किंवा पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे असे होत असण्याची शक्यता आहे. पावसाळ्यातील संभाव्य प्रतिकूल हवामान टाळण्यासाठीही फुलपाखरे स्थलांतर करत असावीत. फुलपाखरांचे अशा प्रकारचे स्थलांतर हे दोन किमीपासून तीन हजार किमीपर्यंत असू शकते. हे स्थलांतर टप्प्याटप्प्यांमध्ये होते.
 
फुलपाखरांचे टॅगिंग
 
फुलपाखरांच्या जमावाचा सखोल अभ्यास झालेला नाही. काही संशोधक जमावात जमलेली काही फुलपाखरे पकडून त्यांच्या पंखावर टॅग लावतात. नंतर अशी टॅग केलेली फुलपाखरे कोणाच्या नजरेस पडल्यास त्यातून निष्कर्ष काढता येतो. परंतु, यासाठी हजारो फुलपाखरांना टॅगिंग करावे लागते, तरच थोड्या-फार प्रमाणात त्याची माहिती मिळते. फुलपाखरू अभ्यासकांचा असलेला तुटवडा आणि यासाठी आवश्यक असणार्‍या निधीच्या कमतरतेमुळे असा अभ्यास करणे कठीण होऊन बसते. शिवाय, ही फुलपाखरे पुढील वर्षी सापडतीलच याविषयीची आशा धुसर असते. कारण, या फुलपाखरांचा जीवनकाळ एक वर्षापेक्षा कमी असतो. सिंधुदुर्गच्या जंगलात जमणार्‍या फुलपाखरांच्या जमावाचा अभ्यास काही अभ्यासकांनी केला होता. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले होते की, यामध्ये नर आणि माद्यांची संख्या समसमान आहे. मात्र, माद्या या ीर्शुीरश्र वळरिेीश आहेत. म्हणजेच त्यांची जननेंद्रिये पूर्ण विकसित झालेली नाहीत. त्यांचे पोट लहान होते, याचा अर्थ ही सर्व फुलपाखरे नुकतीच कोशातून बाहेर आली होती आणि स्थलांतरादरम्यान त्यांना अधिकचे ओझे नको होते.
 
स्थलांतर कधी होते?
 
साधारण ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये ही फुलपाखरे पूर्वेकडून (एरीींशीप ॠहरीीं) पश्चिम घाटाकडे येतात (झेीीं -चेपीेेप चळसीरींळेप). आल्यावर काही आठवड्यांनंतर प्रजनन सुरू करतात. त्यानंतर पुढच्या वर्षीच्या एप्रिल-जूनदरम्यान त्यांची पुढची पिढी पश्चिम घाटात पाऊस पोहोचायच्या आत पूर्वेकडे परतीचा प्रवास सुरू करते. या स्थलांतराचा प्रवासाकरिता ही फुलपाखरे सहसा एकाच दिशेने दोन भौगोलिक भागात उडतात. सहसा ही उड्डाणे दिवसा आणि त्यातसुद्धा ज्या दिवशी सूर्यप्रकाश चांगला असेल, त्या दिवशी होतात. या सूर्यप्रकाशामुळे त्यांना उडण्याकरिता योग्य ती ऊर्जा मिळते. या स्थलांतराकरिता फुलपाखरे एकत्र कशी जमतात, कुठल्या दिशेने उडायचे. हे कसे ठरवतात, याचे कोडे अजूनपर्यंत उलगडलेले नाही.
 
स्थलांतर करणार्‍या प्रजाती
 
भारतात जवळपास ६० जातीची फुलपाखरे स्थलांतर करतात. यात प्रामुख्याने निंम्फालीड या कुटुंबातील फुलपाखरांच्या जातींचा समावेश होतो. यामध्ये ब्लू टायगर, ग्लासी टायगर, प्लेन टायगर, स्टाईप्ड टायगर, कॉमन क्रो, डबल बॅन्डेड क्रो या फुलपाखरांचा समावेश असतो. या जातीची फुलपाखरे ज्यांच्या अळ्या पांढरा चीक असणार्‍या झाडांवर वाढतात. पांढर्‍या चीकामुळे ही फुलपाखरेसुद्धा भक्ष्य बनण्यापासून वाचतात.
 
स्थलांतर कुठे पाहाल?
 
फुलपाखरांचे स्थलांतर ही दाजीपूर, राधानगरी वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना वन्यजीव अभयारण्य, आंबा, आंबोली याठिकाणी पाहता येईल. अगदी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य, वसई किल्ला, सगुणा बाग येथेदेखील स्थलांतर पाहता येतात.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.