नरमांसभक्षणाचे भीषण वास्तव

15 Feb 2025 11:20:44

communism
 
साम्यवाद हा वरवर दिसायला छान वाटला, तरी त्याच्या मायावी चेहर्‍यामागे एक क्रूर चेहरा लपलेला आहे. त्याचीच जाणीव जगाला झाल्याने, जगभरामध्ये साम्यवादाचा पराभव झाला. त्याने, साम्यवाद संपला नाही, उलटपक्षी नवीन अत्यंत सौम्य पण, तितकेच घातक रूप घेऊन पुन्हा आला आहे. साम्यवादाच्या क्रूर चेहर्‍याबाबतचे सत्य उलगडणारा हा लेख...
 
काही आठवड्यांपूर्वी आपण ‘विश्वसंचार’ कास्तंभामध्ये, लेनिनग्राडच्या लढाईचा मागोवा घेतला होता. लेनिनग्राड उर्फ पेट्रोग्राड उर्फ सेंट पीटर्सबर्ग या रशियाच्या जुन्या राजधानीला, आक्रमक जर्मन सेनांनी वेढा घातला. याला युद्ध इतिहासात ‘९०० दिवसांचा वेढा’ असे म्हटले जाते. या वेढ्यातील अन्नधान्याच्या टंचाईने हजारो नागरिक भुकेने तडफडून मेले. लोकांनी झाडांची पाने, साली, खोडे, चामड्याचे पट्टे, बूट, पिशव्या, पाळीव कुत्रे, मांजरे, घोडे, ससे, कबुतरे, पोपट असे अक्षरश: मिळेल ते खाऊन, पोटाची आग शमवण्याचा प्रयत्न केला. अखेर हे सर्वसुद्धा संपले, तेव्हा लोक नरमांस खाऊ लागले. तेव्हा साम्यवादी पक्षाच्या नेत्यांना एकदम जाग आली. त्यांनी नरमांस भक्षण करणार्‍या गुन्हेगारांना पकडून, कडक शिक्षा ठोठावण्याचा उपक्रम सुरू केला.
 
कोण होते हे गुन्हेगार? त्यात बहुसंख्य स्त्रिया होत्या. त्यांच्या घरात कुणी पुरुष माणूस शिल्लकच नव्हता. त्यांचे पती, भाऊ, बाप, मुलगे युद्धात ठार झाले होते किंवा वेढा घालून बसलेल्या जर्मन सेनेशी झुंजत होते. महिनो न् महिने ते घराकडे फिरकले नव्हते. घरात अन्नाचा कण नव्हता; आणि बाजारातून धान्य आणायला पैसे नव्हतेच पण, मुळात बाजारच जागेवर नव्हता. अशा भीषण स्थितीत स्वतःचे आणि एखाद्-दोन लहान मुले नि क्वचित म्हातारे सासू सासरे यांचे पोट, त्या स्त्रीने कसे भरावे? नाईलाजाने त्यांनी रस्त्यावर पडलेल्या प्रेतांचे अवयव तोडून आणून, ते मांस शिजवून खाल्ले होते.
 
‘एन.के.व्ही.डी.’ या स्टॅलिनच्या कुप्रसिद्ध गुप्तचर संस्थेने, सुमारे दोन हजार लोकांना नरमांस भक्षण केल्याच्या आरोपाखाली पकडले. स्टॅलिनच्या कोशात दया, माया वगैरे शब्द नव्हतेच. निम्म्या लोकांना गोळ्या घालण्यात आल्या. निम्म्या लोकांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ही सगळी न्यायप्रक्रिया चालू असताना, वेढा चालूच होता. जर्मन तोफा शहरावर आग ओकतच होत्या. शहराकडे येणार्‍या प्रत्येक रस्त्यावरून आत मुसंडी मारण्याचा प्रयत्न, जर्मन पँझर रणगाडे करतच होते. लेनिनग्राडचे नागरिक बेभानपणे त्यांचा मुकाबला करतच होते. काही वाचकांनी मला वैयक्तिक दूरध्वनीवरून किंवा समाजमाध्यमावरून अशी विचारणा केली की, हे सगळे खरेच घडले असेल का? माणूस इतका नृशंस हिडिस बनू शकतो का? पोटातली भुकेची आग माणसाला पशू बनवू शकते आणि माझाच धर्म, माझेच तत्त्वज्ञान सर्वश्रेष्ठ हा अहंकार माणसाला पशुहून ही दुष्ट, क्रुर, नृशंस बनवू शकतो, याचे सोव्हिएत राजवटीतले दुसरे उदाहरण अलीकडेच समोर आले आहे.
 
१९२४ साली सोव्हिएत रशियाचा सर्वोच्च नेता व्लादिमीर लेनिन मेला. हा मृत्यू संशयास्पद आहे, असे मत खुद्द लेनिनची बायको क्रुपस्काया हिनेच व्यक्त केले. पण, अशा सर्व मतांकडे दुर्लक्ष करून लेनिनचा चेला जोसेफ स्टॅलिन याने सत्ता हडपली आणि तिच्यावर घट्ट पकड बसवली. मुसलमान सुलतान लोक, आपल्याविरुद्ध कुणीतरी बंड पुकारण्याच्या विचारत आहे असा नुसता संशय जरी आला, तरी शेकडो-हजारो लोकांची सरळ कत्तल करून टाकत असत. हे बंडखोर लोक त्यांच्याच धर्माचे, कित्येकदा त्यांचे भाऊ, काका, मामा असे नातेवाईकच असत. महंमद तुघलख किंवा वेडा महंमद याला, अशा छान-छान कत्तली करण्याची फार आवड होती.
 
आता स्टॅलिनने अगदी तोच कित्ता उचलला. १९२४ ते १९५३ या स्टॅलिनच्या सत्ताकाळात, अनेकवेळा ‘पज्’ म्हणजे साफसफाई किंवा शुद्धिकरण मोहिमा राबवण्यात आल्या. शेकडो, हजारो, लाखो नव्हे, कोट्यवधी लोकांना सरळ गोळ्या घालण्यात आल्या. त्याहून अधिक लोकांना रशियाच्या उत्तरेकडील सैबेरिया या अत्यंत बर्फाळ, ओसाड, गारढोण प्रदेशात जन्मठेपेवर पाठवण्यात आले. हे सर्व लोक शत्रूदेशाचे नागरिक नव्हते, तर स्टॅलिनचे देशबांधवच होते. पण, ते गुन्हेगार ठरले. कारण, त्यांनी साम्यवाद या तत्त्वज्ञानाला, साम्यवादी व्यवस्थेला किंवा वैयक्तिकदृष्ट्या स्टॅलिनच्या नेतृत्त्वाला विरोध केला. तर अशीच ही १९३३ सालच्या ‘शुद्घिकरण मोहिमे’च्या वेळची गोष्ट आहे. मॉस्को आणि लेनिनग्राड या शहरांमधून, एकूण ६ हजार, ७०० लोकांना पकडण्यात आले. यात अल्प प्रमाणात चोर, दरोडेखोर, खुनी वगैरे खरोखरचे गुन्हेगार होते. पण, मुख्यत: राजकीय विरोधक होते. कित्येकांचा खरे म्हणजे, राजकारणाशी काडीचाही संबंध नव्हता. केवळ संशयावरून त्यांना पकडण्यात आलेले होते.
 
आता या साडेसहा हजार लोकांना काय शिक्षा द्यायची? असे ठरविण्यात आले की, सैबेरियात ओब नदीच्या खोर्‍यात, नाझिनो नावाचे एक भले मोठे बेट आहे. ते ओसाड आणि दलदलयुक्त आहे. पण, दलदल कशामुळे बनते, तर नदी जो गाळ सतत वाहून आणते, त्यामुळेच की नाही? आणि गाळाची माती ही सुपीकच असते. तेव्हा या साडेसहा हजार लोकांना त्या बेटावर न्यायचे. त्यांच्याकडून दलदलीत मातीचा भराव टाकून, चांगली सपाट जमीन बनवायची. मग त्या जमिनीवर त्यांच्याचकडून सामुदायिक शेती करवून घ्यायची. म्हणजे दलदलीचे उच्चाटन, नवीन भूमीचे संपादन, त्या भूमीवर शेती उत्पादन आणि हे सगळे गुन्हेगारांच्या श्रमातून करून घेऊन, त्यांना शासन. वा, वा! केवढे हे सोव्हिएत शासक बुद्घिमान!
 
प्रत्यक्षात, दलदलीत मातीचा भराव टाकण्यासाठी कुदळी, खोरी, पहार, फावडी अशी कोणतीही प्राथमिक साधने, या कैद्यांना पुरवण्यात आलीच नव्हती. बरे, बेटावरच्या कोरड्या जागी सोव्हिएत सैन्याचे ठाणे होेते. मग साडेसहा हजार कैद्यांनी कुठे राहायचे? काय खायचे? त्यांना राहाण्यासाठी कोठड्या सोडा, तंबू-राहुट्यांचीसुद्धा सोय नव्हती. त्यांना खाण्यासाठी म्हणून, गव्हाच्या पिठाच्या म्हणजे आट्याच्या गोणी पाठवण्यात आल्या होत्या. पण, त्या आट्याचा पाव बनवायचा कोणी? थोडक्यात म्हणजे, कैद्यांना तुरुंगात डांबण्यासाठीसुद्धा, काही एक तुरुंग व्यवस्था उभी करावी लागते. तशी काही व्यवस्थाच केलेली नव्हती.
 
परिणामी कैद्यांनी सैनिकांविरुद्ध बंड पुकारले. पण, बंड पुकारून काय उपयोग? कैद्यांकडे एखादी साधी काठीदेखील नव्हती नि सैनिकांकडे स्टेन मन्स होत्या. तेव्हा काही कैद्यांनी त्या दलदलीत उड्या टाकून, पळून जाण्याचा प्रयत्न केला. रानात पळणार्‍या सशांना किंवा डुकरांना ठार मारावे, तसे सैनिकांनी त्यांना टिपून-टिपून मारले. उरलेल्या लोकांनी गव्हाचे पीठ पाण्यात कालवून, भूक भागवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हगवण लागून, असंख्य लोक मेले. मग मोठा मासा, छोट्या माशाला गिळतो तो प्रकार सुरू झाला. कैद्यांमधल्या स्त्रिया आणि दुबळे पुरुष यांच्यावर संक्रांत आली. दांडग्या पुरुष कैद्यांनी, त्यांना झाडांना बांधून ठेवले आणि कुत्र्यांप्रमाणे त्यांच्या शरीरांचे लचके तोडून-तोडून मांस खाल्ले.
 
कशी कोण जाणे, पण ही बातमी राजधानी मॉस्कोत पोहोचली. तेव्हा वासिली वेलिचको नावाचा एक अधिकारी, चौकशी करण्यासाठी आला. वेलिचको नाझिनो बेटावर उतरला आणि तिथले दृष्य पाहून हादरला. सैनिकी ठाणे आणि त्याभोवतीचा परिसर सैन्याच्या शिस्तीनुसार ठीकठाक होता. पण, बाकी बेटावर, सर्वत्र अंदाधुंद मुडदे पडलेले होतेे. त्यांच्या दुर्गंधीने डोके गरगरत होते. झाडाझाडांना स्त्रियांचे नि पुरुषांचे निष्प्राण देह बांधलेले होते. त्यांच्या देहांवरचे मांस ओरबाडून काढलेले दिसते होते.
 
वासिली वेलिचको बहुधा अजून पक्का साम्यवादी बनलेला नव्हता. त्यामुळे ते नृशंस दृष्य पाहून तो हादरला. त्याने मॉस्कोला परतून विस्तृत अहवाल लिहिला. नाझिनो बेटाला त्याने ‘नरभक्षक बेट’ असे म्हटले. तिथे पाठवलेल्या ६ हजार, ७०० कैद्यांपैकी आता जेमतेम २ हजार, २०० कैदी जिवंत असून, आपण तातडीने हालचाल न केल्यास तेदेखील मरतील, हे त्याने आवर्जून लिहिले.
पण, त्याचा परिणाम उलटाच झाला. सोव्हिएत शासनामधला उच्चधिकारी असूनही वासिली वेलिचकोच्या अंत:करणात, अजून कुठेतरी माणुसकीचा अंश शिल्लक आहे, हे स्टॅलिनला अजिबात पसंत पडले नाही. वेलिचकोची शासकीय अधिकारपदावरून तर हकालपट्टी झालीच, पण साम्यवादी पक्षातूनही त्याला काढून टाकण्यात आले. त्याचा अहवाल कायमचा ‘फाईल’ करण्यात आला. सोव्हिएत रशिया कोसळल्यावर तिथल्या ठिकठिकाणच्या सरकारी दफ्तरखान्यांमधून जी भीषण प्रकरणे उजेडात आली, त्यातले हे एक बारीकसे प्रकरण. बरे, पण मग नाझिनो बेटावरच्या त्या उरलेल्या दोन अडीच हजार कैद्यांचे काय झाले? त्याचा कसलाही उल्लेख त्या कागदपत्रात नाही. ते सैनिकांच्या गोळ्या खाऊन किंवा हगवणीने किंवा बर्फात काकडून मेले असावेत.
 
कोणतेही सांप्रदायिक तत्त्वज्ञान न मानणार्‍या, धर्माला अफूची गोळी म्हणणार्‍या आणि स्वतःचे आर्थिक वर्गसंघर्षाचे नवेच तत्त्वज्ञान मांडणार्‍या साम्यवादाचा अत्यंत पाशवी, नृशंस, हिडिस असा हा चेहरा आहे. आज जगभरात राजकीयदृष्ट्या साम्यवाद पराभूत झालासा भासतो आहे. पण, लिबरॅलिझम-उदारमतवाद हे त्याचेच एक सौम्य, मायावी रुप आहे. त्यातूनच आता ‘वोकिझम’ या नव्या विकृतीला प्रतिष्ठित करण्याचा, जोरदार प्रयत्न चालू आहे. पोटातल्या भुकेची आग शमवण्यासाठी लोकांनी नरमांस भक्षण केले, हे जाणून आपण अस्वस्थ होतो. नवसाम्यवाद आणि वोकिझमसारखी त्याची अपत्ये, एकदंर मानवी समाजव्यवस्थाच नष्ट करायला निघाले आहेत. आपल्याला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही. आपण अधिकाधिक चंगळवादी बनून, सहजपणे त्यांच्या आहारी जात आहोत. म्हणजे, आता उपभोगवादी भांडवलशाही आणि कष्टकर्‍यांचे राज्य स्थापन करणारा साम्यवाद, एकत्रितपणे खर्‍याखुर्‍या मानवतावादी रामराज्याचा घास घ्यायला निघाले आहेत.
 
जाऊ द्या हो! मला ५० हजारांच्या आयफोनवरून पिझ्झा आणि बर्गर ऑर्डर करायचा आहे आणि नंतर व्हॅलेंटाईन डेच्या पार्टीचा मेनू ठरवायचा आहे.
Powered By Sangraha 9.0