‘छावा’ : अंगावर शहारा आणणारा इतिहास

    15-Feb-2025
Total Views | 132

chhaava
 
‘छावा’ कादंबरीवर आधारित छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा मांडणारा, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ’छावा’ चित्रपट दि. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. शिवाजी सावंत लिखित ‘छावा’ ही छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील गाजलेली कादंबरी. या कादंबरीमध्ये संभाजी महाराजांच्या धैर्य, बुद्धिमत्ता आणि शौर्याची गाथा मांडणारा उत्कृष्ट आलेख लेखकाने सादर केला आहे. असे हे छत्रपती संभाजी महाराज केवळ शिवरायांचे सुपुत्र नव्हते, तर ते एक सक्षम योद्धा आणि कुशल प्रशासक होते. कादंबरीत त्यांच्या लहानपणापासून ते बलिदानापर्यंतचा प्रवास विस्ताराने मांडला आहे. त्यांच्या शिक्षणातील अष्टपैलुत्व, राजकारणातील समज, मुघल आणि इंग्रजांसोबतचे संबंध तसेच गुप्त कारवाया यांचे सखोल चित्रण या कांदबरीत दिसून येते. विशेषतः त्यांच्यावर झालेले आरोप, त्यांची तगडी लढाऊ वृत्ती आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी केलेला संघर्ष मन हेलावणारा आहे, त्याची प्रचिती ‘छावा’ चित्रपटातह पाहायला मिळते.
 
इतिहासातला काळा दिवस दि. ३ एप्रिल १६८०... म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन... या प्रसंगापासून ‘छावा’ चित्रपटाची सुरुवात होते. ‘मराठों का छत्रपती अब नही रहा’ असे म्हणणारा औरंगजेब जरी खुश दिसत असला, तरी त्याच्याकडे बघून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती, ती म्हणजे महाराजांनी औरंगजेबाला कित्येक रात्री सुखाने झोपू दिले नाही. इथे खुश असणार्‍या औरंगजेबाला जराही कल्पना नव्हती, की, महाराजांच्या छत्रछायेखाली वाढणारा संभाजी हा स्वराज्यातील रयतेच्या सुरक्षेसाठी सज्ज होता.
 
चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी ‘छावा’ चित्रपटाची निर्मित करण्याअगोदर शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ कादंबरीवर चार वर्षे अभ्यास केला. इतिहासातल्या बारकाव्यांचा काळजीपूर्वक आढावा घेतला. मात्र, त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास न मांडता, त्यांची युद्धनीती आणि शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर दाखविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, जो निश्चितच यशस्वी झालेला दिसतो. आत्तापर्यंत बॉलिवूडने ऐतिहासिक चित्रपटात ‘सिनेमॅटिक लिबर्टी’च्या नावाखाली मूळ इतिहासाला गढूळ करण्याचा बरेचदा नाहक प्रयत्न केला. मात्र, ‘छावा’ चित्रपटात घेतलेली ‘लिबर्टी’ कथेला पूरक ठरली आहे. त्यामुळे शिवपुत्राची ही कथा मनाला आणखीन प्रकर्षाने भिडते. प्रत्येक कलाकारांनी उत्तम प्रकारे भूमिका साकारल्या असून, याचे खरे श्रेय दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना जाते. विशेष कौतुक म्हणजे, ऐतिहासिक भूमिकांसाठी त्यांनी केलेल्या कलाकारांची निवड, यामध्ये तक्रारीसाठी कोणतीच जागा उरत नाही.
 
चित्रपटातील युद्धाची दृश्ये अत्यंत जिवंत आणि तितकीच प्रभावी वाटतात. युद्धातील एका प्रसंगाचा विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे बुरहानपूरमध्ये चालू असलेल्या युद्धात अडकलेला एक चिमुरडा मुलगा रडत असतो. शंभूराजांची त्याच्यावर नजर पडताच ते त्या मुलाला उचलून त्याच्या आईजवळ सोडतात आणि त्या मुलाकडे पाहत राहतात. त्यावेळी पार्श्वसंगीताचा आवाज कमी होऊन शंभूराजांना त्यांच्याच लहानपणीचा आवाज येतो आणि त्या रडक्या स्वरात ऐकू येणारा ‘आऊसाहेब...’ हा शब्द कानी पडताच त्यांचे डोळेही क्षणार्धात पाणावतात.
 
दिग्दर्शनाबरोबरच ‘छावा’ चित्रपटातील संवादही तलवारीच्या धारेप्रमाणे अगदी तीक्ष्ण आहेत. मावळ्यांना युद्धाआधी दिलेले ज्वलंत भाष्य कानावर पडताच, आपणही मावळ्यांचा एक हिस्सा आहोत, असे वाटायला भाग पाडणारे हे संवाद ऋषि विरमानी यांनी लिहिले आहेत. ‘नमः पार्वतीपतये हर हर महदेव’ या छत्रपती संभाजी महाराजांच्या आसमंत दुमदुमवणार्‍या घोषणेने तर अक्षरश: अंगावर शहारे उभे राहतात. त्याचप्रमाणे, कवि कलश यांच्या काही कविता कादंबरीतल्या जरी असल्या, तरी काही कविता या चित्रपटाच्या प्रसंगानुरुप चपखलपणे वापरल्या आहेत. कवि कलश यांच्या कविता ऐकताच, दरबारात माहोल तयार होतो आणि आपल्याही तोंडून या कवितांना सहज ’वाह वाह’ ही दाद निघून जाते.
 
‘छावा’ चित्रपटाला आणि इतिहासाला जिवंत करणारा छायाचित्रकार सौरभ गोस्वामी यांनी उत्तम प्रकारे ऐतिहासिक काळातील दृश्ये बारकाईने टिपली आहेत. याविषयी एक प्रसंग सांगायचा झाला तर, जेव्हा औरंगजेब दख्खनला येत होता, त्यावेळी त्याने वाटेत येणार्‍या जनतेला हाल हाल करून मारले. आया-बहिणींची अब्रू लुटून त्यांची हत्या केली. हे कळताच शंभूराजांनी सडेतोड उत्तर देण्यासाठी युद्धाची तयारी केली. अशा वेळी सुरुवातीला शंभूराजांच्या हातातल्या त्रिशुळाने त्यांच्यातल्या रौद्ररूपी शिवशंकराचे दर्शन झाले. त्यानंतरच्या टप्प्याटप्प्याने झालेल्या प्रत्येक युद्धात त्यांचे शस्त्र बदलले. हनुमानाच्या गदेने मुघलांची छाती तोडली. अशा वेळी साक्षात महावीर हनुमानांचे दर्शन झाले. अशा प्रकारे चित्रपटातील टिपलेल्या दृश्यांतून शिकवण मिळते ती त्या निडर राजाच्या इतिहासाची!
 
त्यात विकी कौशलचा अभिनय ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून ‘संभाजी महाराज असावेत तर ते असेच,’ ही दाद द्यायला भाग पाडतो. तो रुबाब, ती तीक्ष्ण नजर ज्याने संपूर्ण मुघल सलतनतचा थरकाप उडायचा, ते नेतृत्वगुण यावर विकीने घेतलेली मेहनत आज फळाला आली, असे म्हटले तर अजिबाच वावगे ठरणार नाही. केवळ विकीच नाही, तर रश्मिका मंडाना हिने येसुबाईंची भूमिका उत्तम साकारली आहे. येसुबाईंच्या मराठमोळ्या थाटाचे सर्वत्र कौतुक होत असून, रश्मिकाने या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे. तसेच या चित्रपटामध्ये दमदार भूमिकेतून ‘कम-बॅक’ करणारा अक्षय खन्ना यांचा औरंगजेबाचा अभिनय चिड आणायला लावतो. इतिहासातला औरंगजेब असावा तर तोही असाच क्रूर, निर्दयी. मात्र, अक्षयने या पात्रात आवाजाची जरब, नजरेत थकवा, पण हिंदवी साम्राज्य संपवण्याची भूक, अशा अगदी बारकाव्यांचा उत्तम विचार करून औरंगजेब हे पात्र उभे केले, त्यासाठी त्याच विशेष कौतुक करावेसे वाटते.
 
कोणत्याही चित्रपटात जसा अभिनय, संहिता, छायाचित्रण महत्त्वाचे असते, तसेच या सगळ्यांना जोडून एका उंच शिखरावर ठेवणारे संगीतदेखील तितकीच महत्त्वाची भूमिका निभावते. त्यात ए. आर. रहमान यांचे संगीत म्हणजे चित्रपटाच्या प्रत्येक प्रसंगाला एक प्रेमळ स्पर्श देते. युद्धप्रसंगीच्या पार्श्वसंगीताचा स्पर्श थेट आपल्या मनाला भिडतो. त्याने प्रत्येक प्रसंग अंगावर येतोच; त्यासोबत प्रेक्षकांच्या अंगावर येणारा शहारा आणि डोळ्यांत तरळणारे पाणी, ही त्या पार्श्वसंगीताची ताकद ठरते.
‘छावा’ हा चित्रपट म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील मराठ्यांचा पराक्रम, सुसंस्कृती आणि ऐश्वर्याचा मिलाप म्हणता येईल. त्यावेळी मराठा योद्ध्यांचा पोशाख केवळ सौंदर्यदृष्ट्या आकर्षक नव्हता, तर तो रणांगणातील गरजा आणि महाराष्ट्राच्या हवामानालाही तितकाच साजेसा होता. छत्रपती संभाजी महाराज हे तर शौर्य आणि विद्वत्तेचे प्रतीक. त्यांची वेशभूषादेखील त्यांच्या कर्तृत्वाला, उंचीला साजेशी अशीच झाली आहे. त्यांच्या शिरावर रत्नजडित मुकुट किंवा टोकदार पागोटे, अंगावर रेशमी किंवा सुती सदरा, कमरबंधाने घट्ट केलेले काठाचे उपरणे आणि श्रीमंती झळाळी असलेली धोतरधारणा, यातून चित्रपटाच्या टीमने केलेल्या सूक्ष्म निरीक्षणांचा विचार दिसून येतो.
 
चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा मूळ इतिहास जरी दाखवला गेला नसला, तरीही चित्रपट परिपूर्ण वाटतो. चित्रपटाच्या शेवटाला शंभूराजांवर केलेले अमानुष अत्याचार मनाला स्वस्थ बसू देत नाहीत. त्यांच्या शरीरातून निघालेल्या रक्ताच्या थेंबाप्रमाणे आपल्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. तीव्र वेदना होत असतानाही आई जगदंबेचे केलेले नामस्मरण शंभूराजांना जणू शंभर हत्तींचे बळ देत होते. पण, अखेर तो दिवस, दि. ११ मार्च १६८९ रोजी शंभूराजेंचा इहलोकीचा प्रवास सुरु झाला. मात्र, चित्रपटाचा शेवट वेगळ्या पद्धतीने दाखवला असून, त्यात महाराजांचे कान जो शब्द ऐकण्यासाठी आयुष्यभर आसुसले होते, तो शब्द कानी पडतो ‘शंभूऽऽऽ....’ आणि इथेच त्या वीरपुरुषासोबत चित्रपटाचा शेवट होतो.
 
दिग्दर्शक : लक्ष्मण उतेकर
कलाकार : विकी कौशल, रश्मिका मंधाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंग, संतोष जुवेकर
संवाद : ऋषि विरमाणी
रेटिंग : ⭐⭐⭐⭐
 
 
अनिरुद्ध गांधी 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121