नेहरू नगरातील चाळकरी ते यशस्वी उद्योजक

14 Feb 2025 11:00:12

kings buiders & developers
 
मुंबईतील प्रत्येक मराठी माणसाचे स्वप्न असते की, मुंबईत आपले हक्काचे घर असावे. परंतु, जागतिकीकरणाच्या रेट्यात मुंबईचा चेहरामोहरा इतका बदलत गेला की, या स्पर्धेत टिकून राहणे मराठी माणसाला अशक्य होऊ लागले. त्यामुळे आपली हक्काची मुंबई सोडून मराठी माणूस बाहेर पडला. मराठी माणसाची हीच गरज ओळखून त्याच्या आवाक्यातील, त्याला परवडेल अशा किमतीत त्याला त्याच्या हक्काचे छप्पर मिळवून देण्याचा ध्यास घेतला आहे ‘किंग्स बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स’च्या निलेश कुडाळकर यांनी. त्यांच्या व्यावसायिक प्रवासाबद्दल त्यांची घेतलेली ही सविस्तर मुलाखत.
 
 
  • बांधकाम व्यवसाय हेच आपले कार्यक्षेत्र असावे, असे आपल्याला कधी वाटले?
 
लहानपणापासूनच बांधकाम क्षेत्रात काहीतरी करावे, आपणही एखादी इमारत बांधावी, असे माझ्या मनात सातत्याने घोळत होते. त्यानुसारच महाविद्यालयीन शिक्षणातही अभियांत्रिकी शिक्षण म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगकडे जावे, असे मनात होते. परंतु, सिव्हिल इंजिनिअरिंगला प्रवेश घेणे, बारावीनंतर लगेच शक्य झाले नाही. त्यामुळे सुरुवातीचे जवळपास सहा महिने मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यावा लागला. परंतु, आपल्याला एखाद्या गोष्टीवर खरेच प्रेम असेल आणि तुमच्या ध्येयाबद्दल तुम्ही प्रामाणिक असाल, तर ते ध्येयच तुमचा पाठलाग करते, असे म्हणतात. तसेच काहीसे माझ्याबाबतीतही घडले आणि मला सिव्हिल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला आणि तिथूनच माझा बांधकाम क्षेत्राच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
 
  • कुठल्याही मध्यमवर्गीय कुटुंबात व्यावसायिकाला ज्या अडचणींचा सामना करावा लागतो, तसा तुम्हालाही करावा लागला का?
 
होय, सुरुवातीच्या काळात कुठल्याही मध्यमवर्गीय कुटुंबात असते, तशी परिस्थिती माझ्याही घरात होती. कुठलाच अनुभव गाठीशी नाही, त्यातून काहीच भांडवल नाही, अशा परिस्थितीत सुरुवातीची पाच-दहा वर्षे मी ‘मटेरियल सप्लाय’चे काम करायचो. त्यातूनही माझे मन हे व्यावसायिकतेकडेच ओढ घेत होते. आपले शिक्षण इंजिनिअरिंगचे आणि आपण वेगळेच काम करत आहोत, ही गोष्ट खटकतही होती. पण, तेव्हा इलाज नव्हता.
 
  • प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या स्वप्नाच्या दिशेने टाकलेली पहिली उडी, पहिला प्रकल्प खूप महत्त्वाचा असतो. तर आपला हा पहिला अनुभव कसा होता?
मी कुर्ल्याच्या नेहरू नगर परिसरात वास्तव्यास असल्याने तिथे बर्‍याच इमारतींचे पुनर्विकास प्रकल्प सुरु होते. त्यातच माझ्या एका बालमित्राकडून मला ही संधी मिळाली. त्याच्याशी मी कायमच बर्‍याच गोष्टींबद्दल बोलायचो. तेव्हा त्याने त्याच्याच राहत्या इमारतीच्या पुनर्विकासाची संधी माझ्याकडे आणली; ही खूप मोठी गोष्ट होती त्यावेळी. याच प्रकल्पापासून माझी बांधकाम व्यवसायात सुरुवात झाली.
 
  • बांधकाम क्षेत्रातील सातत्याने होणार्‍या बदलांना आपण कसे सामोरे गेलात आणि कसे सामोरे जात आहात?
 
पूर्वी या क्षेत्रात आजच्याइतकी तीव्र स्पर्धा नव्हती, फार कमी बांधकाम व्यावसायिक असायचे. त्यातही मराठी व्यावसायिक तर फारच कमी. मग त्यात सर्व झोपडपट्टी पुनर्विकास यांसारख्या शासनाच्या योजनांनी अनेक बांधकाम व्यावसायिक उभे राहिले आणि व्यवसाय करू लागले. परंतु, त्यातून ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढले होते. आता शासनाने आणलेल्या ‘रेरा’ वगैरेसारख्या कायद्यांनी या गोष्टींना चाप बसला आहे. बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक वाढले आहेत. या कायद्यांमुळे प्रकल्पांचे सुसूत्रीकरण शक्य होते. भांडवल उभारणीसाठीही उपयोग होतो. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील बदल पथ्यावरच पडले आहेत.
 
 
  • ‘किंग्स बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स’च्या मार्फत ग्राहकांचे आपल्या परवडणार्‍या घरांचे स्वप्न कसे पूर्ण केले जाते आणि त्यांना कशा पद्धतीने सुविधा पुरवल्या जातात?
 
मुळात मी स्वतः कामगारांच्या वसाहतींतून आलेलो असल्याने प्रारंभीपासूनच त्यांच्यासाठीच किंवा त्याच कामगारवर्गाला परवडतील, अशी घरे बांधण्याचेच मी ठरवले होते. यामुळे जेव्हा बांधकाम व्यवसायाला सुरुवात केली, त्यावेळी त्याच वर्गाला समोर ठेवून काम चालू केले. त्यातही मोठ्या प्रकल्पांसाठी कर्ज मिळवणे, हाही खूप संघर्षाचा भाग होता. यामुळे मी छोट्या आणि परवडणार्‍या घरांवरच लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. त्यात मला यशदेखील आले. पूर्ण प्रकल्पातील सर्व घरे लवकर विकली जायची. हीच गोष्ट मी यापुढे कायम ठेवली आणि याच प्रकल्पावर मी आजही काम करतो.
 
  • महामुंबईची ओळख हळूहळू ‘सर्वसामान्यांना न परवडणारे शहर’ अशी होत गेली. अशा परिस्थितीत या क्षेत्रात सामान्यांना परवडणारी घरे बांधणे आणि ती लोकांपर्यंत पोहोचविणे किती कठीण आहे?
 
महामुंबईत खरोखरच बांधकाम करणे, त्यात जागेची उपलब्धता, बांधकाम खर्च या सर्व गोष्टी खरोखरच महाग झाल्या आहेत. त्यामुळे परवडणारी घरे उपलब्ध करून देणे, हे खरोखरच एक कसब आहे. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासामुळे, तसेच शासनाकडून यामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्यामुळे आता परवडणारी घरे प्रत्यक्षात आणणे, हे शक्य होणार आहे. त्यासाठी विकासकाच्या इच्छाशक्तीची जोड मिळणे गरजेचे आहे. मी आतापर्यंत याच इच्छाशक्तीने काम केले आहे. त्यासाठी मला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
  • सरकारने बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत. त्यातच यंदाच्या अर्थसंकल्पात करमुक्त उत्पन्नाची मर्यादादेखील सरकारने वाढवली आहे. या सर्व गोष्टींचा बांधकाम क्षेत्राला कसा फायदा होईल, असे वाटते?
 
याचा सर्वाधिक लाभ हा निश्चितच मध्यमवर्गीयांना होणार आहे. साधारणपणे या गटात ज्यांचे उत्पन्न महिन्याला 40-50 हजार आहे, असे लोक येतात. त्यांना करातून बतच होणार्‍या पैशांमधून ‘ईएमआय’ भरणे शक्य होणार आहे. त्यामुळे परवडणार्‍या घरांचे स्वप्न पूर्ण होणे शक्य आहे. यात आता लक्झरी घरे म्हणजे ज्यांना एक लाख किंवा अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींनाही आता जास्त चांगले पर्याय उपलब्ध होतील. आमच्यासारखे जे व्यावसायिक आहेत की जे परवडणारी घरे निर्मितीसाठी काम करतात, त्यांच्यासाठी ही फार मोठी संधी आहे.
 
  • महामुंबईत आता अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेगाने राबविले जात आहेत. या प्रकल्पांचा बांधकाम व्यवसायावर कसा परिणाम होईल?
 
निश्चितच, या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा खूपच चांगला परिणाम होणार आहे. यामुळे महामुंबईची कनेक्टिव्हिटी वाढत आहे. त्यामुळे महामुंबईतील वाहतुककोंडी, प्रदूषण यांसारख्या समस्या दूर होणार आहेत. ही खूप मोठी उपलब्धी आहे. याचा बांधकाम व्यावसायिकांनी जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे आणि त्यानुसार ग्राहकांनाही त्याचा लाभ मिळवून दिला पाहिजे, हे सर्वांत महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे.
 
  • बांधकाम क्षेत्रात नव्याने पदार्पण केलेल्या किंवा भविष्यात करु इच्छिणार्‍या व्यावसायिकांना काय संदेश द्याल?
 
या क्षेत्रात येणार्‍या सर्वच नवीन बांधकाम व्यावसायिकांना मी एकच सांगू इच्छितो की, या क्षेत्रात सर्वात महत्त्वाचे म्हणजे सचोटीने काम करणे, आपला दिलेला शब्द पाळणे. लोकांना काय हवे आहे आणि त्यातूनच लोकांना त्यांच्या पसंतीचे, त्यांच्या स्वप्नातील घर साकार करणे शक्य होईल. शून्यातून विश्व उभारणे कायमच कठीण असते, पण त्यावेळी आपल्याला लाभलेले मदतीचे हात कधीच विसरायचे नाहीत. या गोष्टी लक्षात ठेवल्या, तरच आपण यशस्वी उद्योजक होऊ शकू!
 
 
 
हर्षद वैद्य
 
Powered By Sangraha 9.0