आचार्य सत्येंद्रदास यांना शरयू नदीत दिली 'जलसमाधी'

14 Feb 2025 11:44:44

Satyendradas Jalsamadhi

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Acharya Satyendradas Jalsamadhi)
श्रीरामललाचे मुख्य पुजारी आणि श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचे अर्ध्वयू आचार्य सत्येंद्रदास (८७) यांचे बुधवार, दि. १२ फेब्रुवारी सकाळी ब्रेन हॅमरेजने निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी, गुरुवारी अयोध्येत लोकांना त्यांचे अंतिम दर्शन घेता यावे यासाठी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर त्यांना रामानंद पंथाच्या परंपरेनुसार शरयू नदीमध्ये जलसमाधी देण्यात आली.

हे वाचलंत का? : किन्नर आखाड्यावर पुन्हा हल्ला; महामंडलेश्वर कल्याणीनंद गिरि गंभीर जखमी


श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, माघ पौर्णिमेच्या पवित्र दिवशी, सकाळी ७ वाजता त्यांनी पीजीआय लखनौ येथे अखेरचा श्वास घेतला. दि. ३ फेब्रुवारी रोजी पीजीआय लखनौ येथील न्यूरॉलॉजी विभागात दाखल करण्यात आले होते, त्यावेळीही त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती. त्यापूर्वी ते उच्च मधुमेह आणि रक्तदाबाच्या विकाराने आजारी होते, अशी माहिती रूग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली.

२० मे १९४५ रोजी उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यात जन्मलेले सत्येंद्र दास हे श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील प्रमुख व्यक्ती होते. १९५८ मध्ये सत्येंद्र दास यांनी घर सोडले आणि संन्यास घेतला आणि रामजन्मभूमीचे तत्कालीन पुजारी अभिराम दास यांचे शिष्य बनले. १९९२ मध्ये सत्येंद्र दास यांची श्रीरामललाचे मुख्य पुजारी म्हणून नियुक्ती झाली होती. गेले ३३ वर्ष ते श्रीरामललाची सेवा करत होते.
Powered By Sangraha 9.0