युवासेनेचा युवा विजय महाराष्ट्र दौरा; यंदा चांदा ते बांदा दौरा
11-Feb-2025
Total Views | 15
ठाणे : महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातुन शिवसेना (शिंदे गट) ५७ जागा मिळवत उबाठापेक्षा वरचढ ठरला. त्यानंतर शिवसेनेत इनकमिंग वाढले असतानाच आता सेनेची युवा सेनाही कंबर करून मैदानात उतरली आहे. त्यानुसार 'घर तिथे शिवसैनिक, गाव तेथे शिवसेना' हे ब्रीद घेऊन युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश प्रताप सरनाईक यांनी युवा विजय महाराष्ट्र दौरा आयोजित केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे, युवासेना सचिव किरण साळी यांनी दि. १४ फेब्रुवारी ते दि. ३० एप्रिल दरम्यान युवा विजय महाराष्ट्र दौरा आयोजित केला आहे.
दौऱ्याच्या अनुषगांने तयार करण्यात आलेल्या रथाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवून युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याला शुभेच्छा दिल्या. शिवसेनेची संघटनात्मक बांधणी, युवासेनेचा विस्तार, महाविद्यालयीन युनिट्स तयार करणे हे या दौऱ्याचे उद्दिष्ट आहे. 'घर तिथे शिवसैनिक, गाव तेथे शिवसेना' या संकल्पनेद्वारे गावोगावी शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यात येणार आहे, अशी माहिती राहुल लोंढे यांनी दिली.