कोल्हापूर : विरोधकांना चितपट करत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाची कुस्ती जिंकले, असे प्रतिपादन भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी केले.
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील ससेगाव येथे आयोजित 'देवाभाऊ केसरी २०२५' या कुस्ती स्पर्धेत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार डॉ. विनय कोरे, उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, डॉ. यश प्रविण दरेकर हे उपस्थित होते.
हे वाचलंत का? - व्यक्तीला बदनाम करून राजीनामे घेण्याची काँग्रेसची प्रथा चुकीची! खासदार अशोक चव्हाण यांचे मत
प्रविण दरेकर म्हणाले की, "कुस्तीचा खेळ हा शक्ती, बुद्धी आणि सहनशक्तीचा आहे. हे सगळे गुण तंतोतंत देवेंद्र फडणवीस यांच्यात आहेत. विरोधकांनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असतानाही ते कुणाच्याच तावडीत सापडले नाहीत. त्यांनी सर्वांना चारीमुंड्या चित करून महाराष्ट्राच्या राजकारणाची कुस्ती जिंकली आणि आज मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत."
"शाहू महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीतून राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पैलवान झाले पाहिजे. आबा पाटील यांनी कुस्तीचा प्रारंभ केला आहे. याठिकाणी तालीम तयार करा. त्यासाठी लागणारा माझा आमदार निधी शासनाच्या माध्यमातून तुम्हाला दिला जाईल. कुस्तीक्षेत्रात चांगले बदल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असून पैलवानांना खुराक देण्यासाठी राज्य सरकार भुमिका घेईल. याबाबत येणाऱ्या अधिवेशनात राज्य सरकारकडे ही मागणी घेऊन जाईल," असे आश्वासनही प्रविण दरेकर यांनी दिले.