भारताची व्याख्या करतानाच ज्ञानाच्या प्रकाशात रममाण असलेला देश अशी अनेकदा केली जाते. या देशात ज्ञान, कला, कौशल्य यांची कधीही वानवा नव्हती. मात्र, इंग्रजांनी कुटिल बुद्धीने केलेल्या शिक्षण क्षेत्रातील बदलांमुळे, आत्मविश्वास गमावलेली एक मोठी पिढी निर्माण झाली. भारत आणि युरोपातील शिक्षण आणि सामाजिक स्थितीचा हा तुलनात्मक आढावा...
मुंबई विद्यापीठ’ हे भारतातले पहिले विद्यापीठ. त्याची स्थापना १८५७ साली झाली. यथावकाश आणखी विद्यापीठे निघाली, महाविद्यालये निघाली. त्या त्या विभागातली महाविद्यालये, नजीकच्या विद्यापीठाला जोडण्यात आली. शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार व्हावा, अगदी खेडोपाडीसुद्धा शिक्षणाची गंगा पोहोचावी, यादृष्टीने असे करण्यात आले. शिक्षण स्वस्त आणि सोपे झाले. ब्रिटिशांनी भारतात शिक्षणाचा प्रसार केला, तो भारतीयांनी शिकून शहाणे व्हावे, ज्ञानी व्हावे, यासाठी नव्हे. त्यांना कारभार चालवायला रंगाने काळे, पण आचारविचाराने पक्के ब्रिटिश असे कारकून हवे होते म्हणून! तीच शिक्षणपद्धती चालू ठेवल्याची फळे, आज आपल्यासमोर आहेतच. भारतातल्या शेकडो विद्यापीठांमधून दरवर्षी लाखो कारकुनी मनोवृत्तीचे तरुण बाहेर पडत आहेत. कारकुनी मनोवृत्ती म्हणजे, जे परकीय गोर्यांचे ते सगळे चांगले आणि जे आमचे ते सगळे वाईट, असा भयंकर न्यूनगंड बाळगणारी खुजी, कोती मनोवृत्ती.
युरोपीय देश किंवा अमेरिकेत असा प्रकार नाही. तिथे शिक्षण सोपे आहे पण, स्वस्त नाही. तिथे राजकारणासहित, जीवनाची सर्व क्षेत्रे शिक्षणाशी जोडलेली आहेत. शिक्षणावर समाजधुरिणांचे बारीक लक्ष असते. सर्व क्षेत्रांना लागणारे हुशार लोक, नेमके हेरून उचलले जातात. त्यांच्या ज्ञानाचा, शिक्षणाचा समाजाला नीट उपयोग होईल, हे पाहिले जाते.
समाजाचा, राष्ट्राचा मूलाधार शिक्षण असणे, ही संकल्पना मुळात भारताचीच आहे. उदाहरणार्थ, तक्षशीला विद्यापीठ घ्या. येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी ८०० वर्षे या विद्यापीठाची स्थापना, तत्कालीन गांधार देशातल्या तक्षशीला या राजधानीच्या नगरात झाली. भारतीय शिक्षण म्हणजे, सर्व ऐहिक गोष्टींकडे पाठ फिरवून, मृत्यूनंतर मोक्ष मिळवण्याचे शिक्षण, असा एक गैरसमज आहे. तो अर्थातच इंग्रजांनी मुद्दाम निर्माण केलेला आहे. तक्षशीला विद्यापीठात, मुख्यतः १८ विषय शिकवले जात असत. म्हणजे आधुनिक भाषेत बोलायचे, तर प्रत्येक विषयाचे एक, याप्रमाणे १८ विषयांची १८ महाविद्यालये तिथे होती. वेद, इतिहास, पुराणे, गणित, नक्षत्रविद्या, भूतविद्या, सर्पविद्या, शरीरविज्ञानचिकित्सा, हस्तिविद्या, मृगया, आयुर्वेद, धनुर्वेद, मूर्तिकला, चित्रकला, शिल्पकला, युद्धकला अशा मुख्य विषयांबरोबरच, असंख्य आनुषंगिक विषयही इथे शिकवले जात असत. पाश्चिमात्य विद्यापीठांमध्ये शिक्षणक्रमात, ‘प्युअर सायन्सेस्’ आणि ‘अॅप्लाईड सायन्सेस्’ यांचा उत्कृष्ट समन्वय घातलेला असतो. तक्षशीला विद्यापीठातल्या विषयांच्या वरील यादीकडे पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, तिथेही तसाच समन्वय उत्तम रीतीने साधण्यात आला होता. तिथली शिल्पकला म्हणजे दगडाची, मातीची शिल्पे बनवण्याची कला नव्हे, ती मूर्तीकला. तो वेगळा विषय होताच, पण शिल्पकला म्हणजे, आधुनिक भाषेत अभियांत्रिकी. म्हणजे तक्षशीला विद्यापीठाचा पदवीधर शिल्पज्ञ हा अभियंता किंवा इंजिनिअर असायचा. साहजिकच तक्षशीलेच्या दिशेने, सतत विद्यार्थ्यांचा ओघ वाहात असे. यात संपूर्ण भरतखंडातले विद्यार्थी तर असायचेच, पण किंपुरुषवर्ष आणि हरिवर्ष इथूनही विद्यार्थी यायचे. किंपुरुषवर्ष म्हणजे आफ्रिका खंड नि हरिवर्ष म्हणजे युरोपखंड.
इसवी सन ५००च्या सुमारास, तक्षशीला विद्यापीठहूण आक्रमकांनी उद्ध्वस्त केले. ही उद्ध्वस्त नगरी सध्या पाकिस्तानात आहे. तक्षशीलेइतकीच ख्यातकीर्त अशी मगध राज्यातली, म्हणजे आजच्या बिहार प्रांतातली नालंदा आणि विक्रमशीला ही विद्यापीठे होती. इसवी सन १२०० मध्ये, मुहम्मद तुघलखाचा सरदार बखत्यार खलजी याने, ती दोन्ही जाळून नष्ट केली.
भारतात विद्येचा असा विध्वंस होत असताना, तिकडे इंग्लंडमध्ये एका विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली जात होती. केम नावाच्या नदीवर केंब्रिज नावाचे एक टुमदार गाव होते. इ. स. १२८४ मध्ये, तिथे एक कॉलेज स्थापन झाले. ख्रिश्चन धर्मात शिक्षण हे धार्मिक बाबींना जोडूनच असते. प्रथम चर्च येते. मग शाळा नि नंतर कॉलेज. या कॉलेजचे नाव ख्रिश्चनांचा सर्वश्रेष्ठ संत जो सेंट पीटर, त्याच्यावरून ‘सेंट पीटर्स कॉलेज’ असे ठेवण्यात आले. मग हळूहळू आणखीही कॉलेजे निघाली आणि त्या सर्वांना जोडणारे असे, केंब्रिज विद्यापीठ उभे राहिले. त्याची कीर्ती आज ७०० वर्षे उलटून गेल्यावरही जगभर दुमदुमते आहे.
म्हणजे पाहा, प्रथम एक कॉलेज निघाले. मग अनेक कॉलेजे निघाली आणि मग हळूहळू त्या सर्वांचा समन्वय साधणारी, ‘विद्यापीठ’ ही संस्था उत्क्रांत होत गेली. हीच प्रक्रिया अत्यंत नैसर्गिक आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे की, “ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात असतेच. ते बाहेर काढणे, प्रकट करणे म्हणजे शिक्षण. ही प्रक्रिया जो घडवून आणतो, तो शिक्षक.” ’टु एज्युकेट’ या इंग्रजी क्रियापदाचा मूळ अर्थ, ‘टु ड्रॉ आऊट’ म्हणजे ‘बाहेर काढणे’ असाच आहे. म्हणजे शिक्षणाची जी मूळ हिंदू संकल्पना स्वामी विवेकानंदांनी सांगितली, तीच इंग्रजी भाषेचे जे कुणी आद्य रचनाकार असतील त्यांनाही अभिप्रेत होती.
पण बहुधा म्हणूनच, इंग्रजांनी भारतात मुद्दाम उफराटा प्रकार केला. प्रथम शाळा, मग कॉलेज आणि नंतर विद्यापीठ, अशी नैसर्गिक प्रक्रिया घडू देण्याऐवजी, एकदम धाडकन विद्यापीठ स्थापन केले. नंतर कॉलेजे आणि शाळा काढून, स्वतःच्या सोईची शिक्षणपद्धती भारतीयांच्या डोक्यावर थोपली. स्वतंत्र भारतात आजही तेच चालू आहे. मुलांच्या अंतरंगातले देवदत्त ज्ञान बाहेर काढून, त्यांच्या कलाकलाने त्यांना उमलू देण्याऐवजी, बाहेरून त्यांच्या डोक्यात तथाकथित ज्ञान, ज्ञान नव्हे माहिती; कोंबण्याचे कारखाने सर्वत्र सुरू आहेत.
‘हिंदू धर्माने स्त्रियांना कायम दुय्यम मानले; किंबहुना त्यांना माणूस मानायलाच नकार दिला,’ असा इंग्रजांचा आणि आता इंग्रजी शिक्षित हिंदूंचा, एक लाडका आरोप असतो. हिंदू धर्माने म्हणे स्त्रियांना दुर्बल, अशिक्षित आणि पुरुषांची आश्रित बनवून ठेवले.
ठीक आहे. मग आता ग्रीक इतिहासकार काय म्हणतात पाहा. मॅसिडोनियाचा राजा सम्राट अलेक्झांडर हा अनातोलिया, पॅलेस्टाईन, फिनिशिया, अरेबिया इत्यादी प्रदेश जिंकत इराणमध्ये घुसला. अत्यंत बलाढ्य अशा ससानियन राजवंशाचा चुराडा उडवून त्याने, इराणी साम्राज्य उद्ध्वस्त केले. आता तो भारतवर्षाच्या सीमेवर येऊन उभा ठाकला. तिथे त्याच्या प्रतिकारासाठी उभे होते ‘आश्वकायन’ नावाचे चिमुकले हिंदू गणराज्य. ३० हजार घोडेस्वार, ३८ हजार पायदळ आणि ३० हत्ती असलेल्या ‘आश्वकायन’ सैन्यदलाची प्रमुख होती कृपा नावाची स्त्री. या सैन्याने प्रचंड पराक्रम गाजवला. खुद्द अलेक्झांडरला प्राणघातक वार लागला. सेनापती कृपासहित एकूण एक सैनिक ठार झाल्यानंतरच, आश्वकायन गणराज्याने पराभव मान्य केला. शहाजीराजे भोसल्यांची पत्नी जिजाऊसाहेब आणि बाळाजी विश्वनाथ पेशव्यांची पत्नी राधाबाई या स्त्रिया, आपल्या पतींच्या नि विश्वविख्यात पुत्रांच्या राजकारणात सक्रीय भाग घेत असत.
राणी अहिल्याबाईंनी तर, कित्येक वर्षे राज्यशकटच हाकला. बाईंच्या बुद्धीला आणि शिस्तीला शत्रू तर वचकून होतेच, पण अटकेपार झेंडे फडकवणारे राघोभरारीसुद्धा बाईंच्या स्त्री सेनेसमोर हतबल झाले होते. त्याच राघोभरारींची नंतरच्या काळात उगीचच बदनाम झालेली पत्नी आनंदीबाई हिला, वाचनाचा अतिशय नाद होता. तिच्या खासगी ग्रंथालयात, अनेक उत्तमोत्तम ग्रंथ होते. दुसर्या बाजीरावांच्या घरातल्या नानासाहेब, रावसाहेब, तात्या टोपे इत्यादी मुलांबरोबर, मनू तांबे हिलाही सर्व प्रकारचे उत्तम शिक्षण मिळाले होते. याच मनूने पुढे, झांशी संस्थानची राणी बनून राज्य इतक्या उत्तम रीतीने चालवले की, इंग्रजांना तिच्या राज्यात बोट शिरकावता येईना. तिने स्त्रियांचे सैन्यही तयार केले होते आणि या स्त्री सैन्याने, आधुनिकदृष्ट्या प्रशिक्षित समजल्या जाणार्या इंग्रज सैन्याच्या तोंडाला फेस आणला होता. हिंदू धर्माने स्त्रियांना दुर्बल बनवले, असे म्हणणार्या इंग्रजी शिक्षितांनी आणि त्यांच्या म्हणण्याला ब्रह्मवाक्य समजण्याचा भोटपणा करणार्या तुम्ही-आम्ही, इंग्रजपूर्व भारतातल्या शिक्षण परिस्थितीचा खराखुरा अभ्यास करण्याची फार आवश्यकता आहे.
या उत्तर ख्रिश्चन धर्मानेच स्त्रियांना कायम दुय्यम स्थान दिले आहे. रोमन कॅथलिक पंथाचा सर्वोच्च प्रमुख पोप, ग्रीक ऑर्थोडॉक्स पंथाचा प्रमुख पेट्रिआर्क आणि प्रोटेस्टंट पंथाचा प्रमुख कँटरबरीचा आर्चबिशप, ही ख्रिश्चन धर्मपंथांमधली तीन सर्वोच्च पदे. आजवर त्या पदांवर कधीही स्त्री आलेली नाही. ख्रिश्चानिटीत सुमारे १ हजार, ४०० उपपंथ आहेत. त्यापैकीही कुणाच्या प्रमुखपदी, आजवर स्त्री आलेली नाही. ब्रिटनच्या ७०० वर्षांच्या लोकशाही राज्यात फक्त एकमेव स्त्री पंतप्रधान झाली, ती म्हणजे मार्गारेट थॅचर. अमेरिकेच्या २२५ वर्षांच्या लोकशाहीत, अजूनतरी कुणी स्त्री राष्ट्राध्यक्ष झालेली नाही. ब्रिटन हा देश लोकशाहीचा जन्मदाता. पण, तिथे स्त्रियांना साधा मतदानाचा अधिकार मिळायला, विसाव्या शतकाचे दुसरे दशक उजाडावे लागले आणि तो अधिकार मिळाला, आंदोलन केल्यावरच!
भारतात १८५७ सालच्या स्वातंत्र्यसमरात स्त्रिया होत्या. १९०५ ते १९११ सालापर्यंत चाललेल्या ‘वंगभंग आंदोलना’त स्त्रिया होत्या. क्रांतिकारकांमध्ये स्त्रिया होत्या. महात्मा गांधींनी तर आपल्या चळवळीत, सुरुवातीपासूनच अगदी कटाक्षाने स्त्रियांना सहभागी करून घेतले होते. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अगदी सहजपणे, स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार मिळाला. त्यासाठी वेगळे आंदोलन करावे लागले नाही. १९६६ साली इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर, सर्वसामान्य हिंदू जनतेला त्यांचे अतिशय कौतुकच वाटले. उलट स्वतःला हिंदू न म्हणवणार्या तथाकथित पुरोगामी समाजवाद्यांनी मात्र त्यांची, ‘गूंगी गुडिया’ म्हणून टिंगल उडवली होती. १८५७ साली स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. मेहरु बेंगॉली, डॉ. स्नेहलता देशमुख या कर्तबगार स्त्रिया येऊन गेल्या. त्या स्त्रिया होत्या म्हणून तो विशेष बातमीचा विषय झाला, असे नव्हे.
१२८४ साली स्थापन झालेल्या केंब्रिज विद्यापीठाच्या प्रमुखपदी मात्र एक स्त्री यायला, २००३ साल उजाडले होते. केंब्रिजमधल्या अनेक कॉलेजांपैकी, ‘गर्टन’ आणि ‘न्यूनहॅम’ ही कॉलेजे खास स्त्रियांसाठी होती. पण, तरीही अधिकृतपणे ती विद्यापीठात आहेत, असे समजले जात नसे. पदवी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या स्त्रियांना, पदवीदान समारंभात भाग घेण्याची परवानगी नव्हती. ही स्थिती तेराव्या शतकातली नव्हे, १९४५ सालापर्यंत हा नियम होता. मग तो बदलण्यात आला.
२००३ साली प्राध्यापिका अॅलिसन रीचर्ड या केंब्रिज विद्यापीठाच्या, कुलगुरू बनणार होत्या. त्याबरोबर अनेकांच्या भुवया उंचावल्या. खरे तर प्रा. रीचर्ड मूळच्या केंब्रिजच्याच पदवीधर. १९६८-६९ साली त्यांनी, केंब्रिजमधून मानववंशशास्त्राची पदवी घेतली होती. पण, मग त्या अमेरिकेतल्या येल विद्यापीठात गेेल्या. म्हणजे एक स्त्री आणि त्यातून, आता केंब्रिजबाहेरची असणारी स्त्री कुलगुरू होणार, हे अनेक विद्वान इंग्रजांना मनोमन आवडले नव्हते. अर्थात ते रोखणेही त्यांना शक्य नव्हते.
तेव्हा आता कारकुनी मनोवृत्ती झुगारून देऊन आपणच विचार करूया की, कोण प्रतिगामी नि कोण पुरोगामी, कोण प्रागतिक आणि कोण मागास, कोण बुरसटलेले नि कोण आधुनिक!