९०च्या दशकात औद्योगिक प्रशिक्षणासारखी वेगळी वाट निवडून शेकडो आदिवासी विद्यार्थिनींना लघुउद्योजिका बनविण्यासाठी प्रयत्न करणार्या दिपाली कुलकर्णी यांच्याविषयी...
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातल्या मालुंजे गावचा दिपाली कुलकर्णी यांचा जन्म. वडिलांचा शेती व्यवसाय, तर आई गृहिणी. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, ए. के. औटी विद्यालयात पूर्ण झाले. दिपाली अभ्यासात अत्यंत हुशार. इयत्ता दहावीपर्यंत त्यांनी वर्गातील क्रमांक एकची जागा कायम ठेवली. विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये त्या अव्वलच ठरल्या. वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची इच्छा असल्याने, त्यांनी श्रीरामपूरमधल्या बोरावके महाविद्यालयात, विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. पुढे इयत्ता बारावीनंतर, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण थांबले. आजी अत्यंत आजारी असल्याने, जवळपास एक वर्ष त्यांनी आजीची सेवा केली. लग्नानंतर शिक्षण पुढे सुरू राहील याच विचाराने त्यांच्या वडिलांनी, दिपाली यांचे लग्न लावून दिले. पती आर्किटेक्ट, तर सासरे मुख्याध्यापक होते. दिपाली यांनी पुन्हा विज्ञान क्षेत्रात जाण्याऐवजी, कौशल्य विकास क्षेत्र निवडले.
१९९४ साली नाशिकमधील सातपूर येथील, ‘औद्योगिक प्रशिक्षण संस्थे’त त्यांनी ड्रेसमेकिंगचे प्रशिक्षण घेतले. लागलीच ‘कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट’मधून, ‘टेलिकॉम ऑपरेटर’चेही प्रशिक्षण घेतले. यानंतर त्यांनी स्थानिक वृत्तपत्रात टेलिफोन ऑपरेटर म्हणून, एक वर्ष नोकरी केली. पुढील दोन ते तीन वर्षे त्यांनी, मुलांसाठी दिली. नंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. अनेक ठिकाणी परीक्षाही दिल्या. निवड मंडळाकडून झालेल्या परीक्षेत, उत्तम गुणांनी त्या उत्तीर्ण झाल्या. १९९९ साली इगतपुरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतच, त्या प्रशिक्षक म्हणून रूजू झाल्या. अगदी तीन वर्षांचे बाळ असतानाही त्यांनी, आदिवासीबहुल इगतपुरीत तीन वर्षे नोकरी केली. विद्यार्थ्यांना ड्रेसमेकिंगचे धडे दिले. नाशिकहून त्या बस किंवा रेल्वेने जात असत. त्यावेळी मोबाईल वगैरे नसल्याने, संपर्कासंदर्भात अनेक अडचणी येत असत. नाशिकला बदली झाल्यानंतर त्यांनी, सात वर्षे विद्यार्थिनींना ड्रेसमेकिंगचे धडे दिले. वयाचे बंधन नसल्याने, त्यांनी अगदी ५० हून अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांनाही शिकवले. यादरम्यान अनेक जबाबदार्या त्यांच्यावर सोपविण्यात आल्या. ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’तून त्यांनी दुरस्थ मार्गाने, ‘बीए’ पूर्ण केले. फॅशन डिझायनिंगचे शिक्षणही घेतले. यानंतर निफाडमध्येही त्यांनी, सात वर्षे काम केले. निफाडहून पुन्हा नाशिकला बदली झाली. विविध प्रदर्शन भरविणे, कल्पना प्रत्यक्षात उतरविणे, विद्यार्थिनींकडून उत्कृष्ट प्रात्यक्षिके तयार करून घेणे, अशी अनेक आव्हाने त्यांच्यासमोर होती. ‘कोरोना’ काळात संपूर्ण शिक्षण ऑनलाईन पद्धतीनेच झाले. विद्यार्थ्यांना शिकवणे सोयीचे व्हावे, याकरिता त्यांनी १२ व्हिडिओ तयार केले. विद्यार्थिनींनी बनविलेले मास्क, पंचवटी परिसरात वितरित करण्यात आले. ‘कोरोना’ काळात जनजागृती करण्यात आली. गुजरात सीमेजवळील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोरीपाडा याठिकाणी बदली झाल्यानंतर, दिपाली यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी होती. बोरीपाडा हे नाशिकपासून ७० किमी दूर. शिकणे आणि शिकवणे, या दोन्ही गोष्टी तशा अवघडच होत्या. कारण, १०० टक्के विद्यार्थिनी या आदिवासी होत्या. बेबी, लेडीज, जेन्ट्स गारमेंट्स, यासह इंडस्ट्रीज पॅटर्न, मेथड अशा अनेक विषयांचे प्रशिक्षण ड्रेसमेकिंगमध्ये देण्यात येते. प्रात्याक्षिकातून वस्तूनिर्मिती केली जाते. विद्यार्थिनींची विविध कंपन्यांमध्ये भेट घडवून आणली जाते. आदिवासीबहुल आणि दुर्गम भाग असल्याने, याठिकाणी रेंजची अडचण होत होती., तेव्हा टेलिकॉम कंपन्यांशी पत्रव्यवहार केल्यानंतर, ही अडचणही बर्यापैकी दूर झाली. विद्यार्थ्यांना दिपाली केवळ कपड्यांची निर्मिती आणि उत्पादन इथपर्यंतच शिकवत नाही, तर त्या वस्तू विकून अर्थार्जन कसे होईल, याविषयीही मार्गदर्शन करतात. राष्ट्र सेविका समितीत दिपाली सक्रिय आहेत. श्री गुरूजी रूग्णालयाच्या सेवा संकल्प समितीच्या माध्यमातून, त्या विविध सामाजिक कार्यक्रमात सहभागी होतात. दिपाली यांच्या प्रयत्नातून, ‘रोटरी क्लब’ आणि ‘लायन्स क्लब’ यांच्या माध्यमातून, शिलाई मशीनदेखील आयटीआयला भेट मिळाल्या. आदिवासी विद्यार्थ्यांना, प्रशिक्षणाबरोबरच त्यांना सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न केले जातात. विद्यार्थी कमी बोलत असल्याने, त्यांना व्यक्तिमत्त्व विकास गरजेचा असतो. यासाठी अनेक शिबिरेही आयोजित केली जातात. अध्यापनाच्या कार्यात त्यांना, पती दिलीप कुलकर्णी आणि सासू-सासरे यांचे मोलाचे सहकार्य लाभते. दिपाली यांच्या अनेक विद्यार्थिनी, सध्या स्वतः व्यवसाय सुरू करून स्वयंपूर्ण झाल्या आहेत.
‘शिका आणि कमवा’ हे ध्येय समोर ठेवून, शिक्षण घेण्याचे आवाहन त्या करतात. विद्यार्थिनींना ज्या-ज्या अडचणी येतात, त्या दूर करण्यासाठी दिपाली यांचा नेहमी पुढाकार असतो. अनेक संस्थांच्या सहकार्यातून, आदिवासी विद्यार्थ्यांना शक्य होईल ती मदत करण्याचा प्रयत्न त्या करतात. अगदी ८०-९०च्या दशकात, मुलींना शिक्षणाची वाट अवघड होती. त्या काळात, दिपाली यांनी जिद्दीने शिक्षणाची कास धरली. औद्योगिक प्रशिक्षणासारखी वेगळी वाट निवडून, शेकडो आदिवासी विद्यार्थिनींना लघुउद्योजिका बनविण्याचा प्रयत्न करणार्या दिपाली कुलकर्णी यांना आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!