भारतीय सुलेखन सौंदर्याचे दर्शन घडवणार्या अच्युत पालव यांना भारत सरकारच्यावतीने नुकताच ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. अक्षरचित्रांचे भावविश्व उलगडून दाखवणार्या निवडक चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालनात दि. २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांना पाहता येईल. अच्युत पालव व त्यांच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली अक्षरचित्रं ही विविध भारतीय भाषा व लिपी यांच्या अंतरंगातील विविधतेची साक्ष देणारी आहेत. त्याचेच हे अक्षरदर्शन...
ब्राह्मणे बाळबोध अक्षर। घडसूनी करावे सुंदर। जे देखताचि चतुर। समाधान पावती॥
वरील श्लोकांत अक्षरमाहात्म्य समर्थांनी अगदी सुयोग्य शब्दात मांडले आहे. माणसाच्या अभिव्यक्तीचा कागदावर उमटलेला स्वर म्हणजे अक्षर! या अक्षरांचे सामर्थ्य, वैभव ओळखणार्यांची ही भूमी. हे वैभव जतन करताना दर वेळेस यातील नावीन्याचा साक्षात्कार इथल्या कलाकारांना होत गेला. आपली भाषा, त्यातील शब्द, साहित्य हा जसा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, अगदी तितकाच महत्त्वाचा भाग म्हणजे या भाषेची लिपी. भारतीय भाषांचे वेगळेपण हे त्या त्या भाषांच्या लिपीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. या अनुभवासाठी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलात्मक दृष्टी. भारतीय भाषांमधील लिपींचे वेगळेपण ज्यांना कळले आणि ज्यांनी त्यातील कलात्मकता सिद्ध करून दाखवली, त्यापैकी एक नाव म्हणजे अच्युत पालव.
सुलेखन आणि अक्षरचित्रांना आपल्या जीवनाचा ध्यास मानणार्या अच्युत पालव यांना नुकताच भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. मोडी लिपी संवर्धन व सुलेखन कलेतील त्यांच्या अद्वितीय कामगिरीबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार बहाल केला जाईल. अच्युत पालव हे नाव केवळ महाराष्ट्रात अथवा देशातच नाही, तर अगदी जगाच्या पाठीवरसुद्धा सुलेखनासाठी गौरवले जाते. अच्युत पालव यांच्या अक्षरचित्रांवर नजर फिरवल्यास एक गोष्ट लक्षात येते की, त्यांनी या अक्षरांना अक्षरश: जिवंत केले. आपल्या दैनंदिन जीवनात एका ठराविक साच्यात ही अक्षरे आपल्याला बघायला मिळतात. एका विशिष्ट रांगेत ही अक्षरे पुढे पुढे सरकत असतात. परंतु, हीच अक्षरे जेव्हा अच्युत पालव यांच्या सहवासात येतात, तेव्हा त्यांचे खरोखरचं सोने झालेले असते. या अक्षरांना त्यांचा असा स्वतंत्र अवकाश मिळतो. रंगांच्या मिश्रणातून एक वेगळेच चित्र आपल्या नजरेसमोर उभे राहते. प्रयोगशीलता नसेल, तर कलाही निरस होते. अच्युत पालव आपल्या अक्षरयज्ञामध्ये हीच प्रयोगशीलता जपताना दिसतात. त्यांची ही प्रयोगशीलता त्यांच्या चिंतनातील निर्मिती आणि ते चिंतन त्यांच्या कलेतून साकार होत असते.
अच्युत पालव यांच्या अक्षरचित्रांनी भाषेच्या, लिपीच्या सगळ्या मर्यादा केव्हाच ओलांडल्या आहेत आणि त्यामुळेच आपल्याला अक्षरसौंदर्याचे निखळ दर्शन वेळोवेळी घडते. कुठल्याही चौकटीमध्ये बंदिस्त न राहता, सातत्याने अक्षरांचे हे नवीन, मनमोहक रूप मोहून टाकते. एकाच वेळेस बघणारा हा भाषेशी आणि त्या अक्षरचित्रातील रंगांशी जोडला जातो. अक्षरचित्रांसोबत दर्शकाने समरस होणे हेच या कलेचे सामर्थ्य.
अच्युत पालव यांनी अक्षरचित्रांचा हा ठेवा एक कलाशास्त्र म्हणून विकसित केला. सुलेखनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण त्यांनी विद्यार्थ्यांना प्रदान करायला सुरूवात केली. अक्षरचित्रातील सौंदर्यस्थळे, त्यांच्यातील वेगळेपण याचा सातत्याने शोध घेण्याचे काम ते आणि त्यांचे विद्यार्थी नित्यनेमाने करत असतात. एकाप्रकारे अक्षरांमधील सुप्त ऊर्जा जागृत करण्याचे काम अच्युत पालव करीत असतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
अच्युत पालव यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेले त्यांचे विद्यार्थी त्यांच्या कार्याची कमान अतिशय यशस्वीरित्या सांभाळत आहेत. भारतीय सुलेखन सौंदर्याचे दर्शन घडविणारे हे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कला दालनात दि. २८ जानेवारीपासून सुरु झाले असून, दि. ३ फेब्रुवारी रोजीपर्यंत खुले आहे. या प्रदर्शनातील चित्रांचा मागोवा घेतल्यास आपल्याला लक्षात येईल की, अक्षरचित्रांची व्याप्ती किती मोठी आहे. भारतीय भाषांमधील देवनागरी, ब्राह्मी, शारदा आदी लिपींमधील अक्षरचित्रेही भाषेचा एक वेगळा ठसा उमटवणारी. अच्युत पालव यांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूप्रमाणेच प्रयोगशीलता आणि कल्पकता यांची सांगड घालत अक्षरचित्रांची सुबक मांडणी केली आहे. अक्षरातील प्रवाहीपणा, शब्दांची लय, मांडणीतील विषयाचे नेमकेपण या सगळ्याची प्रचिती आपल्याला ही अक्षरचित्रे बघताना येते. विविध धर्मांतील तत्त्वांचे अंतरंग आपल्याला या अक्षरचित्रांमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसतात. धर्मतत्त्वे ही जशी माणसाला एक नितळ दृष्टी प्रदान करतात, अगदी त्याचप्रकारे अक्षरचित्रांचे हे प्रदर्शन एक नितळ भाव आपल्या मनामध्ये तयार करतात. अच्युत पालव यांचे कार्य गेली ४० वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. महाराष्ट्रात लोप पावत चाललेल्या मोडी लिपीचे संवर्धन करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा. अक्षरांचे नवविश्व उलगडून सांगणारी त्यांची ‘अक्षरानुभव’, ‘अक्षराकृती’, ‘ऊर्जाक्षरे’ इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. नुकतेच प्रकाशित झालेल्या ‘अक्षरभारती’ या पुस्तकात प्राचीन ब्राह्मी, खरोष्ठी, ग्रंथी, शारदा, मोडी, अवेस्तन, सिद्धमपासून ते देवनागरी, गुजराती, उर्दू, गुरमुखी, कन्नड, तेलुगू, मल्याळम या लिपींविषयी कलात्मक आढावा घेण्यात आला असून, देशातील ३६ सुलेखनकारांची २३६ अक्षरचित्रे या पुस्तकात आहेत. या पुस्तकाची संकल्पना अच्युत पालव यांनी मांडली आणि त्याचबरोबर त्याच्या प्रकाशनाची जबाबदारीसुद्धा घेतली.
पाऊस हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग. पावसातील गाणी आणि कविता सगळ्यांच्याच आवडीची, मग या पावसाचे स्वागत एखाद्या काळ्या छत्रीने का करायचे? पावसाचे स्वागत करताना, रंगीबेरंगी छत्र्यांनी त्या पावसाचे स्वागत करावे, असा एक रंगाग्रही विचार मांडणार्या या माणसाच्या संवेदनशीलतेला दाद द्यावीशी वाटते. अक्षरांच्या सान्निध्यात तर आपण रोजच वावरत असतो. आपल्या भाषेतील अक्षरे ही आपले रोजचे सोबती. परंतु, या अक्षरांमागचे खरे सौंदर्य तेव्हाच उमगते, जेव्हा आपण या अक्षरचित्रांच्या सहवासात येतो. अच्युत पालव हे या अक्षरचित्रांचे वारकरी. त्यांच्या निमित्ताने ही वारी आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळाली, हे आपले भाग्यच!