इलू इलू १९९८ : पहिल्या प्रेमाच्या आठवणींना स्पर्श करणारी रम्यकथा

    01-Feb-2025
Total Views |
ILU ILU 1998

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं’ असं कवी मंगेश पाडगावकर सांगून गेले आहेतच. पण, तरीही प्रेमाची प्रत्येकाची परिभाषा, त्यामागील भावना या भिन्नच. असं हे प्रेम म्हणजे थोडक्यात, एखाद्या व्यक्तीबद्दल आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, आदर, प्रेमळपणाची तीव्र भावना. या भावनेला ना वयाचं बंधन असतं ना वेळेचं. मुळात म्हणजे कोणत्याही बंधनांच्या ओझ्याखाली न राहता नि:स्वार्थपणे प्रकट केलेली भावना म्हणजे प्रेम! अशाच प्रेमाच्या आठवणीतून प्रत्येकाच्या चेहर्‍यावर येणारे हसू, डोळ्यात तरळलेले पाणी या दोन रसांची उत्तम सांगड घालून प्रेमाचा जुना अध्याय नव्याने दर्शवणारा ‘इलू इलू १९९८’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्याच्याविषयी...

यह इलू इलू क्या हैं, यह इलू इलू...
इलू का मतलब I love you, i love you

मनिषा कोयराला आणि विवेक मुशरान यांच्यावर चित्रीत सुभाष घई दिग्दर्शित ‘सौदागर’ (१९९१) या चित्रपटातील गीताच्या या गाजलेल्या पंक्ती. या गीताने त्याकाळी गाठलेली लोकप्रियता तर आजही अनेकांच्या स्मरणात असेल. म्हणून आजही नुसते ‘इलू इलू’ असे म्हणताच, ’I Love You’ हे शब्द आपसुकच आजही आपल्या तोंडून बाहेर पडतात. अशा या ‘इलू इलू’ प्रेममंत्रावर बेतलेला अजिंक्य फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू १९९८’ हा चित्रपट.

या चित्रपटात प्रेम, मैत्री आणि शालेय आठवणी यांची अगदी सुंदर भट्टी जमली आहे. आजही अनेकांच्या मनाच्या कोपर्‍यात दडलेल्या बालपणीच्या प्रेमळ आठवणींना या चित्रपटाची कथा अलगद स्पर्श करू पाहते. पहिले प्रेम म्हटले की, बर्‍याच जणांची सुरुवात ‘माझ्या शाळेत होती ती’ अशी होते. ‘इलू इलू १९९८’ या चित्रपटाची सुरुवातही शाळेच्या दृश्यापासूनच होते. वर्गातल्या बाकावर कोरलेले तिच्या नावाचे पहिले अक्षर आणि तिच्या नावाच्या अक्षराला खेटून लिहिलेले स्वतःच्या नावाचे पहिले अक्षर, असा हा प्रसंग पुन्हा आपल्या शालेय जीवनातील त्या गुलाबी काळात आपसुकच घेऊन जातो.

बर्‍याच जणांसाठी पहिले प्रेम म्हणजे एक गोड आठवण, तर काही जणांसाठी पहिले प्रेम म्हणजे केवळ वाईट स्वप्न. पण, पहिल्या प्रेमातून मिळालेली शिकवण, अनुभव या गोष्टींचाही अनेकांना बर्‍याचदा विसर पडतो. ‘प्रेमाला वयाचे बंधन नसते’ या वाक्याला अधोरेखित करणारी ‘इलू इलू १९९८’ या चित्रपटाची कथा १४ वर्षीय अनिकेत सुर्वे भोवती फिरते. अनिकेत त्याच्या शाळेत इंग्रजी विषयासाठी शिकवायला आलेल्या शिक्षिका मिस पिंटो यांच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागतो. मिस पिंटो यांनी माझ्याशी बोलावे, वर्गात माझे कौतुक करावे इथून नि:स्वार्थ प्रेमाचा प्रवास सुरू होतो. या प्रवासात अनिकेतकडे ना कोणत्या आशा-अपेक्षांचे ओझे असते, ना वयाच्या बंधनाचे तिकीट. मात्र, हा प्रवास टप्प्या-टप्प्याने न थांबता प्रेमाची गाडी थेट ‘लग्न’ या कल्पनेच्या शेवटच्या स्थानकावर थांबावी, या विचारापर्यंत अनिकेत सुर्वेचा प्रवास कधी विनोदी, तर कधी जुन्या जखमांवर फुंकर मारतो.

‘इलू इलू १९९८’ या चित्रपटातील अशाच काही गोड आणि अगदी साध्या क्षणांचा अनुभव घेताना त्या काळातील आठवणींत आपण रमतो. जुन्या काळात टीव्हीवर केबल पाहण्यासाठी काठीच्या मदतीने अ‍ॅन्टिना सरळ करायचा, जोपर्यंत टीव्हीच्या त्या डब्ब्यातून मुंग्यांचा तो आवाज शांत होत नाही. तसेच, मित्रांसोबत घोडा सायकल घेऊन जातानाच्या गप्पाटप्पा या सगळ्या गोष्टींमुळे ९०च्या दशकाच प्रेक्षकांना डोकावण्याची संधी मिळते. अशा त्या काळातील अगदी बारीकसारिक गोष्टींचे दर्शन होताना चित्रपटाचे दिग्दर्शक अजिंक्य फाळके यांचे विशेष कौतुक करावेसे वाटते. चित्रपटात प्रेम आणि विनोद यांचा समतोल साधण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत. चित्रपटातील कलाकार कमलाकर सातपुते आणि श्रीकांत यादव हे दोघेही घनिष्ट मित्र. त्यांच्या संवादातून निर्माण होणारी विनोदनिर्मिती हलकेफुलके वातावरण निर्माण करते, ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात हास्याची उकळी निर्माण होते. प्रेम, ईर्षा आणि भावनिक गुंतागुंत यांच्या मिश्रणातून चित्रपट एक सजीव रूप घेतो आणि प्रेक्षकांना प्रेमाच्या सर्व पैलूंवर विचार करायला भाग पाडतो.

चित्रपटाचा एक सुंदर भाग म्हणजे, ९०च्या दशकातील साधेपणाची आणि संस्कृतीची आठवण. ९०च्या दशकातले संगीत, डब्बाटीव्ही, रेडिओ, जुने रस्ते, जुन्या इमारती, जुन्या गाड्या, प्रेमाच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेताना ‘इलू इलू १९९८’ प्रेमाच्या प्रत्येक क्षणाची गोडी आणि त्याच्या चढउतारांचा स्पर्श देते. ‘इलू इलू १९९८’ हा चित्रपट ९०च्या दशकातील प्रेम आणि मैत्रीला एक सौम्य आणि हृदयस्पर्शी दृष्टिकोनातून प्रस्तुत करतो. या चित्रपटाचे सर्वच पैलू, विशेषत: त्यातील अभिनय, संवाद आणि वातावरण, प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव देतात. तो काळ, तो अनुभव आणि ते प्रेम, ‘इलू इलू १९९८’ च्या चित्रपटातून जिवंत होते.
या चित्रपटात जरी १९९८ सालचा उल्लेख केला असेल, तरी हा चित्रपट ‘ब्लॅक अ‍ॅण्ड वाईट’ स्वरूपाचा नसून, प्रेमाचा गुलाबी रंग यात उतरलेला दिसून येतो. असे म्हणतात, प्रेमाचे कधी वय वाढत नसते, पण प्रत्येकाचे प्रेम हे त्यांच्याजवळ असेलच असे नाही. त्याला एक काळ लोटून गेला असणार. म्हणजेच, त्या प्रेमाचे वय वाढले असणार आणि गरजेचे नाही, तुमचे ते प्रेम ९०च्या दशकातले असावे. अशाप्रकारे ९०च्या दशकातील प्रेमाचा कळलेला, नकळलेला तो कोवळा अनुभव चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न लेखक नितीन सुपेकर आणि दिग्दर्शक अजिंक्य फाळके यांनी सुबकपणे केला आहे.

चित्रपटातील संगीत मनामध्ये पहिल्या प्रेमाची प्रतिमा उभी राहायला आपसुकच भाग पाडते. कधीच स्वतःला निरखून न पाहिलेला व्यक्ती आरशाजवळ तासभर स्वतःला पाहतो, उघड्या डोळ्यांनी प्रेमाचे स्वप्न रंगवतो, उगीच गालातल्या गालात हसतो काय, लाजतो काय... हे चित्रपटातील चित्रण अत्यंत वास्तवदर्शी आणि मानवी भावनांचे बारकावे सर्वार्थाने टिपणारे म्हणावे लागेल. त्यामुळे चित्रपटात भूमिका साकारणार्‍या प्रत्येक कलाकाराला बघून, प्रसंगाला बघून ‘अरे हा तर मीच!’ अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या तोंडून निघाल्याशिवाय राहणार नाही. चित्रपटातली पात्रं जरी काल्पनिक असली, तरी प्रत्येकाने साकारलेल्या भूमिका या प्रेक्षकांना स्वत:शी, त्यांच्या लहानपणीच्या मित्रपरिवाराशी निगडित आठवणींची सैर घडवून आणतात.

ते म्हणतात ना, आयुष्यातील पहिले प्रेम हे कधीच विसरता येत नाही. त्या व्यक्तीचा आवाज, भास, एखादा सुगंध ज्याने कधी कधी ‘ती’ व्यक्ती अगदी आपल्या आजूबाजूला असल्यासारखे वाटते. अशावेळी कळत-नकळत आपल्या नजरा त्या व्यक्तीला शोधत असतात. असाच काहीसा शेवट या चित्रपटातून पाहायला मिळतो. अनिकेत जरी मोठा झाला असला, तरीही तो मिस पिंटोच्या आठवणींमध्ये रमून कविता लिहितो. त्याचक्षणी बाहेरून मोटार सायकलचा आवाज येतो. त्या दिशेने त्याच्या जुन्या सायकलवरून पाठलाग करणारा अनिकेत मनात एकच आशा ठेवतो आणि त्यांना हाक मारतो, ‘मिस पिंटो...’ मग पुढे चित्रपटातील कथानक कसे उलगडत जाते, यासाठी हा चित्रपट प्रेक्षकांना बघावा लागेल.


अनिरुद्ध गांधी
चित्रपट : इलू इलू १९९८
लेखक : नितीन सुपेकर
दिग्दर्शक : अजिंक्य फाळके
कलाकार : एलि अवराम, वीणा जामकर, श्रीकांत यादव, निशांत भावसार, मीरा जगन्नाथ, कमलाकर सातपुते, वनिता खरात, अंकित लांडे.
रेटिंग : ***