Sky Force Box Office Collection Day 8: अभिनेता अक्षय कुमारचा स्काय फोर्स १०० कोटींच्या उंभरठ्यावर!
01-Feb-2025
Total Views |
मुंबई : लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता वीर पहारिया यांचा 'स्काय फोर्स' हा चित्रपट २४ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला असून, चित्रपट १०० कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. संदीप केवळानी आणि अभिषेक अनिल कपूर दिग्दर्शित या चित्रपटाने भारतात ८ व्या दिवशी २.५६ कोटींची कमाई केली असून, आतापर्यंतची एकूण भारतातील नेट कमाई ८९.०६ कोटींपर्यंत पोहोचली आहे. येत्या शनिवार रविवारी हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. ७ व्या दिवसाच्या शेवटी 'स्काय फोर्स' ने जागतिक स्तरावर १११.५ कोटींची कमाई केली होती. भारतात त्यादिवशी हा आकडा ८६.५ कोटी होता, तर ग्रॉस कलेक्शन १०३.२५ कोटींवर पोहोचले होते. परदेशात या चित्रपटाने ८.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
चित्रपटाच्या कमाईचे उतरते आकडे :
'स्काय फोर्स'ने पहिल्या दिवशी १२ कोटी, दुसऱ्या दिवशी २२ कोटी आणि तिसऱ्या दिवशी २८ कोटी रुपयांची मोठी कमाई केली. मात्र, त्यानंतर दररोजच्या कमाईत घट झाली. चौथ्या दिवशी ७ कोटी, पाचव्या दिवशी ५.७५ कोटी, सहाव्या दिवशी ६ कोटी आणि सातव्या दिवशी ५.५ कोटी रुपये मिळाले.
१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या चित्रपटात वीर पहारिया आय.ए.एफ ऑफिसर टी. विजय याच्या भूमिकेत असून, तो युद्धाच्या वेळी बेपत्ता होतो. अक्षय कुमार याने KO अहुजा यांची भूमिका साकारली असून, ते विजय यांना शोधण्यासाठी मोहीम राबवतात. सारा अली खान आणि निम्रत कौर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे बजेट १६० कोटी रुपये आहे. 'स्काय फोर्स' च्या आठवड्याभरातील कमाई पाहता, हा चित्रपट १०० कोटींचा पल्ला लवकरच गाठेल असे चित्र दिसत आहे.