भारताला गतीने पुढे नेणारा अर्थसंकल्प! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

    01-Feb-2025
Total Views |
 
Fadanvis
 
मुंबई : २१ व्या शतकातील हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंकल्प असून भारताला गतीने पुढे नेणारा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
 
शनिवार, १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच महाराष्ट्राला काय मिळाले याबाबत लवकरच आकडेवारी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  काँग्रेसच्या राजघराण्याने राष्ट्रपतींसह संपूर्ण देशाची जाहीर माफी मागावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गाकरिता ड्रीम बजेट दिलेले आहे. इन्कम टॅक्सची लिमिट त्यांनी थेट ७ लाखांवरून १२ लाखांपर्यंत नेली आहे. त्यामुळे आता १२ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही, अशी रचना करण्यात आली आहे. मध्यमवर्गीय, नोकरदार आणि नव तरुणांना याचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे एक मोठे डिस्पोजेबल उत्पन्न मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे. हे उत्पन्न खर्च केल्यामुळे देशात मागणी वाढणार असून याचा उपयोग देशाच्या एमएसएमई क्षेत्राला होणार असून यातून रोजगारनिर्मितीसुद्धा होणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात अतिशय धीराने निर्णय घेतला असून हा निर्णय भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड ठरेल."
 
"यासोबतच शेती क्षेत्रात १०० जिल्ह्यांची निवड करुन त्यात शेती विकासाची मोठी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तेलबियांसंदर्भात जी मूल्य साखळी तयार होईल त्यात केंद्र सरकार १०० टक्के हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. मासेमारी करणाऱ्यांसाठी ३ लाखांची क्रेडीट लिमिट ५ लाखांपर्यंत बिनव्याजी करण्यात आली आहे. याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तसेच शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सरकारने घोषित केली आहे. यासोबतच एमएसएमईच्या क्षेत्रात लिमीट वाढवल्यामुळे मोठा फायदा होईल. एकूण उत्पादन क्षेत्राच्या ३६ टक्के एमएसएमईचे क्षेत्र हे पण सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र असल्याने विशेष फायदा होणार आहे," असे त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्र हे देशाचे स्टार्टअप कॅपिटल झाले असून स्टार्टअपमधून सर्वाधिक रोजगारांची निर्मिती होते. या स्टार्टअपकरिता २० कोटी रुपयांपर्यंतची क्रेडिट लिमिट तयार करण्यात आली आहे. याचा आमच्या नव तरुणांना आणि स्टार्टअप्सला मोठा फायदा होणार आहे."
 
"पायाभूत सुविधेच्या क्षेत्रात नवीन पायाभूत सुविधा पाईपलाईन तयार करण्यात आली आहे. पीपीपी प्रकल्पांकरिता घोषित करण्यात आलेल्या नवीन योजनेमुळे पायाभूत सुविधेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खाजगी क्षेत्राची गुंतवणूक वाढेल आणि त्यातून रोजगाराची निर्मिती होईल. यासोबतच मालमत्ता मुद्रीकरणाच्या नवीन फ्रेमवर्कमुळे ज्या मालमत्तेत गुंतवणूक केली आहे त्यातून पैसा घेऊन तो दुसरीकडे डिप्लॉय करण्याला मोठी चालना मिळणार आहे," असेही त्यांनी सांगितले.
 
युवकांच्या स्वप्नांना भरारी देणारे निर्णय!
 
"विशेषत: युवांकरिता घोषित करण्यात आलेले वेगवेगळे मिशन महत्वाचे असून त्यांच्या स्वप्नांना भरारी देणारे आहेत. २१ व्या शतकातील हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंकल्प आहे. भारताला गतीने पुढे नेणारा आहे आणि भारत प्रगल्भ आणि सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे चालला असल्याचे या अर्थसंकल्पातून दिसते," असे सांगत मुख्यंत्र्यांनी या चांगल्या कामाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले.
 
महाराष्ट्राला मोठा निधी मिळेल!
 
"अर्थसंकल्पात राज्यांना काय दिले याची घोषणा करण्याची पद्धत बंद झाली आहे. मागच्या वर्षीसुद्धा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर तो वाचण्याच्या आधीच आमच्या विरोधकांनी महाराष्ट्राला काय दिले ही घोषणा सुरु केली. पण दुपारपर्यंत महाराष्ट्राला काय काय मिळाले याचे आकडे मी घोषित केल्यानंतर त्यांची तोंडं बंद झाली. आजही संध्याकाळपर्यंत माझ्या हातात फाईलप प्रिंट आल्यानंतर महाराष्ट्राला काय मिळाले हे मी घोषित करेल. महाराष्ट्राला दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात निधी मिळेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.