राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीचे मूल्यमापन करा!

09 Jan 2025 13:43:31
 
Chandrakant Patil
 
मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात महाविद्यालये आणि विद्यापीठांचे मुल्यमापन करावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. बुधवार, ८ जानेवारी रोजी चर्चगेट येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात (SNDT) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात गठीत केलेल्या सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
 
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपरमुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्य सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, सदस्य अनिल राव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  मोहल्ला वाचविण्यासाठी ठाकरे गट रस्त्यावर!
 
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, "नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक यांच्यात अधिकाधिक संवाद वाढवावा. नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणारी महाविद्यालये आणि विद्यापीठे निवडून त्यांच्या कार्यपद्धतीचा एकत्रित अहवाल तयार करावा. राज्यातील शैक्षणिक संस्थांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणींवर हा अहवाल मार्गदर्शक ठरेल. सुकाणू समितीच्या अभ्यास गटाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भातील सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करावा. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून येणाऱ्या सूचनांसंदर्भात राज्याचा अहवाल तयार करून आयोगाला कळवावे," अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0