मुंबई : महाराष्ट्रातील छोट्या - मोठ्या सर्वच उद्योजकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून, त्यांना त्यांच्या उद्योगांसाठी पूरक वातावरण निर्माण करण्यात यावे असे आवाहन, महाराष्ट्र औद्योगिक विकास असोसिएशन आणि एमएसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संचालक चंद्रकांत साळुंखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. चंद्रकांत साळुंखे यांनी या मागणी साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी मंत्रालय मुंबई येथे भेट घेतली व निवेदन दिले. उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न सोडविण्यासाठी पोलिस आणि उद्योजक यांच्यात पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पोलिस उद्योग आणि व्यापारी समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे उद्योजकांना त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी खूपच मदत होणार आहे.
महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने १४ फेब्रु. २०२५ रोजी महाराष्ट्र इंडस्ट्रीज आणि एमएसएमई समिट यांच्यावतीने उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीची संकल्पना ' अनस्टॉपेबल महाराष्ट्र - शाश्वत औद्योगिक आणि आर्थिक वाढ, महाराष्ट्राची विकसित भारताकडे वाटचाल ही आहे'. या परिषदेचे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांना या प्रसंगी देण्यात आले. या परिषदेत शहरांमधील औद्योगिकीकरण, राज्यातील निर्यात वाढीसाठी कृती आराखडा, उद्योजकांसाठी असलेल्या शासनाच्या असलेल्या उपक्रमांच्या फायदा जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धोरण निर्मिती करणे या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यात येणार आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्यावरही या परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकार आणि उद्योजक यांच्यात परस्पर सहयोग साधून महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक आणून विकसित महाराष्ट्राकडे वाटचाल करण्यासाठी महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्र सक्षम करणे हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे असे प्रतिपादन चंद्रकांत साळुंखे यांनी केले आहे.