बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नॅशनल हायवेवर तिसऱ्या पुलाचे काम पूर्ण

08 Jan 2025 13:39:42

gujrat

मुंबई, दि.८: प्रतिनिधी 
भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एनएचएसआरसीएलच्या माध्यमातून रेल्वे अहोरात्र काम करत आहे. नुकताच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील NH-48 वर २१० मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील पंचलाईजवळील वाघलधारा गावात राष्ट्रीय महामार्ग-48 (दिल्ली-चेन्नई) ओलांडण्यासाठी २१० मीटर लांबीच्या प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट पुलाचे बांधकाम २ जानेवारी २०२५ रोजी पूर्ण झाले. या पुलामध्ये ७२ प्रीकास्ट सेगमेंट आहेत आणि त्याचा विस्तार ४०मीटर + ६५ मीटर + ६५ मीटर + ४० मीटर आहे. हे संतुलित कँटिलीव्हर पद्धती वापरून तयार केले आहे, जे मोठ्या स्पॅनसाठी योग्य आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम नोव्हेंबर २०२१मध्ये सुरू झाले आणि तेव्हापासून या प्रकल्पावर सातत्याने काम सुरू आहे. या मार्गावरील पहिला ५० किमीचा भाग - बिलीमोरा ते सुरत - ऑगस्ट २०२६पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यादरम्यान सुरत आणि बिलीमोरा बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान नवसारी जिल्ह्यात NH-48 ओलांडणारे दोन पूल आधीच पूर्ण झाले आहेत. या पुलांची लांबी अनुक्रमे २६० मीटर आणि २१० मीटर आहे.
वाघलधाराजवळ हा नव्याने बांधलेला पूल वापी आणि बिलीमोरा बुलेट ट्रेन स्थानकादरम्यान आहे. NH-48 हा भारतातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी एक आहे. हे लक्षात घेत वाहने आणि कामगार दोघांच्याही सुरक्षिततेसाठी वाहतूक प्रवाह राखून आणि सार्वजनिक गैरसोय कमी करण्यासाठी बांधकाम काळजीपूर्वक नियोजित केले गेले. बांधकामादरम्यान, हायवेच्या दोन्ही बाजूला अतिरिक्त लेन बांधण्यात आल्या होत्या. महामार्गावरील वाहतुकीत कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने वाहतूक वळवण्याची योजना लागू करण्यात आली, ज्यावर सतत लक्ष ठेवण्यात आले.
Powered By Sangraha 9.0