नवी दिल्ली : (HMPV) केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीमार्फत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत झालेल्या बैठकीत देशातील श्वसनाच्या आजारांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
चीनमध्ये ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) प्रकरणांमध्ये वाढ झाल्याच्या प्रसार माध्यमातील वृत्तानंतर एचएमपीव्ही संसर्गाच्या रुग्ण स्थितीचा आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी अमलात आणल्या जात असलेल्या सार्वजनिक आरोग्य उपाय योजनांचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला. एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमाच्या माहितीनुसार देशात कोठेही इन्फ्लुएंझा प्रकरणांमध्ये कसलीही असामान्य वाढ झाल्याचे दिसून येत नाही याचा या बैठकीत पुनरुच्चार करण्यात आला.
2001 पासून जागतिक स्तरावर उपस्थित असलेल्या एचएमपीव्हीबद्दल जनतेने चिंता बाळगण्याचे कोणतेही कारण नाही, यावर केंद्रीय आरोग्य सचिवांनी भर दिला. राज्यांनी इन्फ्लुएंझा आजाराबाबत निगराणी आणखी बळकट करण्याचा आणि स्थितीचे वारंवार पुनरावलोकन करावे, असा सल्ला त्यांनी दिला. श्वसन संस्थेच्या आजारांमध्ये हिवाळ्याच्या काळात सर्वसाधारण वाढ दिसून येत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. श्वसन संस्थेच्या आजाराच्या प्रकरणांमध्ये कोणत्याही संभाव्य वाढीला तोंड देण्यासाठी देश सज्ज आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.