दिल्ली विधानसभा : ५ फेब्रुवारी रोजी मतदान तर ८ फेब्रुवारीला मतमोजणी, आदर्श आचारसंहिता लागू

07 Jan 2025 19:05:02

delhi
 
नवी दिल्ली : (Delhi Assembly Elections 2025) दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवार, दि. ७ जानेवारी रोजी  पत्रकारपरिषदेत केली आहे. दिल्लीमध्ये मंगळवारपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
 
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यावेळी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू उपस्थित होते. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणूक प्रक्रियेवरील सर्व शंकांनाही उत्तरे दिली.
 
दिल्लीमध्ये एकूण ७० विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी ५८ मतदारसंघ हे खुले तर १२ मतदारसंघ हे अनुसूचित जातींसाठी (एससी) राखीव आहेत. दिल्लीमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून त्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी मतजदान होणार आहे, तर मतमोजणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ जानेवारी आहे. अर्जांची छाननी करण्याची तारीख १८ जानेवारी आहे. उमेदवारी माघारीची तारीख २० जानेवारी आहे.निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेसह, राष्ट्रीय राजधानीत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहील.
 
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, दिल्लीत एकूण १.५५ कोटी नोंदणीकृत मतदार आहेत आणि त्यापैकी ८३.४९ लाख पुरुष आणि ७१.७४ लाख महिला आहेत. तरुण मतदारांची (२० ते २१ वर्षे) संख्या २८.८९ लाख आहे, तर प्रथमच मतदान करण्यास पात्र तरुणांची संख्या २.०८ लाख आहे. राजधानीत २६९७ ठिकाणी एकूण १३,०३३ मतदान केंद्रे असतील आणि त्यापैकी २१० मॉडेल मतदान केंद्र असतील. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात, विविध कायदा अंमलबजावणी संस्थांशी व्यापक चर्चा करण्यात आली आहे, ज्यामध्ये सुरक्षेशी संबंधित बाबींचाही समावेश आहे.
 
पोटनिवडणुकीचीही घोषणा
 
केंद्रीय निवडणुक आयोगाने उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे, त्याचप्रमाणे तामिळनाडूतील इरोडे पूर्व विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. दोन्ही ठिकाणी ५ फेब्रुवारी रोजी मतदान तर ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0