सौदीच्या निमित्ताने प्रश्न!

    31-Jan-2025
Total Views |
PM Mohammad Bin Salman


सौदीअरबमध्ये असलेल्या तेल संपत्तीमुळे, या देशाचे जागतिक राजकारणात महत्त्व आहे. मात्र, इंधन म्हणून तेल वापरण्याऐवजी, इतर पर्याय आता जगभरात शोधले जात आहेत. काही वर्षांनी तेल इंधनाला नवीन पर्यायही उपलब्ध होतील. तसेच कधी ना कधीतरी, सौदीचा तेलसाठाही संपेल. त्यामुळे सौदीचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी, तेलसाठ्याव्यतिरिक्त इतर मार्गांनी आर्थिक संपन्नता साधण्याचे मार्ग अवलंबले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे, मक्का-मदिनामध्ये सर्वधर्मीय विदेशी नागरिक गुंतवणूक करू शकतील. मात्र, गुंतवणूक केलेले विदेशी नागरिक मक्का-मदिनामध्ये घर किंवा तत्सम वास्तू खरेदी करू शकतील का?

कारण याच मक्का आणि मदिनामध्ये आजवर सौदी अरेबियाच्या बाहेरचे नागरिक, वास्तू खरेदी करू शकत नव्हते. अगदी जगभरातल्या कट्टरातल्या कट्टर मुस्लीम देशांमधले कट्टर मुस्लीमही मक्का-मदिना शहरामध्ये, जमीन किंवा वास्तू खरेदी करू शकत नाहीत. मग इस्लामेतर लोकांची तर गोष्टच सोडा! तसेही मक्का-मदिनामधील मुस्लिमांच्या धार्मिक स्थळामध्ये, केवळ मुस्लीमच जाऊ शकतात. इतर धर्मीय तिथे जायचा विचारही करू शकत नाहीत. मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या या शहरातील धार्मिक स्थळांच्या दिशेने जायच्या रस्त्यावर, मुस्लीम आणि मुस्लिमेतरांसाठी वेगवेगळे रस्तेही आहेत. मुस्लिमांसाठीचच्या राखीव रस्त्यांवरून जर गैरमुस्लीम चुकून जरी गेले, तरी त्यांची खैर नाही. या पार्श्वभूमीवर जगभरातले मुस्लीम, देशाची सीमा वगैरे संकल्पना मानत नाहीत, असेच वाटते. कारण, त्यांच्या मते सगळी भूमी अल्लाचीच असून, जगभरातले सगळे मुस्लीम एकमेकांचे भाऊ आहेत. ‘मुस्लीम बद्ररहूड संकल्पना’ मुस्लीम मानतात. पण सौदी अरेबियाच्या मक्का-मदिना शहरांमध्ये मात्र, या ’मुस्लीम ब्रदरहूड’ संकल्पनेअंतर्गत जगभरातले मुस्लीमसुद्धा घर वा वास्तू खरेदी करू शकत नाहीत, असे का? तर इस्लामच्या दृष्टीने केवळ इस्लामच श्रेष्ठ आहे. त्यामुळे काफिरांची छायाही तिथे नको. मग विदेशी मुस्लिमांवर, वास्तू खरेदीसाठी निर्बंध का? तर सौदी अरेबियाचे विशेषत्व. स्वतः सौदी अरेबियाच नाही, तर जगभरातले मुस्लीमही सौदी अरेबियाला अतिविशेष भूमी मानतात. कारण इथे त्यांच्या नबीचा जन्म झाला. शिवाय मक्का-मदिनाही याच सौदी अरेबियामध्ये. त्यामुळे सौदीमधले नागरिक म्हणजे साक्षात, नबीच्या देशातले नागरिक. त्यामुळे तेच मक्का-मदिना शहरात, जमीन घर किंवा तत्सम वास्तू खरेदी करू शकतात.

असो! मक्का-मदिनामधील रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये जरी विदेशी नागरिक गुंतवणूक करू शकत असले, तरीही त्यांच्या गुंतवणुकीचा टक्का हा 49 टक्केच असणार आहे. त्यामुळे गुंतवणूक करणारा, कधीही रिअल इस्टेटच्या संपत्तीचा मालक होऊ शकत नाही. असे असले तरीही, या निर्णयाचे स्वागतच! इतर धर्मीयांचा या शहरामध्ये, या ना त्या मार्गाने प्रवेश तरी झाला. तसेही सौदी अरेबियाच्या युवराजाने यापूर्वीही सौदीच्या आजपर्यंतच्या कट्टरतावादी इतिहासाला छेद देत, आधुनिकतेची कास धरली. कट्टरतावाद्यांच्या दृष्टीने अघटित, भयंकर असलेल्या मुद्द्यांवर, सौदीच्या युवराजाने धडाकेबाजपणे निर्णय घेतले.
या धडाकेबाज निर्णयाच्या पाठीमागे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे संयुक्त अरब अमिराती देश म्हणजे ‘युएई.’
‘युएई’ आणि सौदी या दोघांचे आपसात शीतयुद्धच. ‘मीच मुस्लीम देशांचा कैवारी’ हे सिद्ध करण्याच्या चढाओढीमुळे, या देशांतून विस्तवही जात नाही. ‘युएई’ हासुद्धा मुस्लीम देश, पण तिथे दुबई शहर म्हणजे जागतिक मॉलच झाला आहे. जगभरातले लोक दुबईची सफर करतात. त्यामुळे ‘युएई’च्या आर्थिक सधनतेत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच सौदीच्या प्रिन्सनेही ‘युएई’च्या पाऊलावर पाऊल टाकत, आधुनिकतेची कास धरली आहे.


आधुनिकता स्वागताहार्य असली तरीसुद्धा पुन्हा प्रश्न आहे की, नबीच्या मक्का-मदिनामध्ये विदेशी नागरिक घर किंवा इतर वास्तूचे मालक होऊ शकतील का? हिंदूंच्या अतिपवित्र कुंभमेळ्यात हिंदू नसलेले आणि विशेषतः मुस्लिमांना व्यापाराचा हक्क द्या, असे सांगणारे याबाबत काही प्रकाश टाकतील का? नबीच्या भूमीत नबीचेच लोक महत्त्वाचे आहेत हे 100 टक्के मान्यच, पण मग प्रभू श्रीरामकृष्णांच्या जन्मभूमीत आणि गंगामातेच्या पवित्र नगरीत कोण महत्त्वाचे असायला हवे, याचे उत्तर काय आहे?