कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग आणि आवश्यकता...

    31-Jan-2025
Total Views |
Artificial Intellegence

तंत्रज्ञान सतत बदलत असते, त्यात काळानुरुप नवनवे बदल होत असतात. सध्याचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचे आहे. जगातील अनेक देश या तंत्रज्ञानावर आपले प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतानेसुद्धा याबाबत गती घेतली असून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विविध क्षेत्रात केला आहे. त्याचा घेतलेला हा आढावा...

गेल्या वर्षाअखेर म्हणजेच दि. २ ते दि. ४ डिसेंबर २०२४ दरम्यान, बेलग्रेड येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘जागतिक कृत्रिम बुद्धिमता परिषद’ आयोजित करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा वैचारिक परिषदेचे आयोजन केल्याने, आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘कृत्रिम बुद्धिमता : उपयोग आणि त्याची व्यावसायिक आवश्यकता’ या विषयावर व्यापक चर्चा झाली. याचाच पाठपुरावा म्हणून, केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान व उच्च शिक्षण विभागातर्फे २०२५ हे वर्ष, ’कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा व त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्याचा महत्त्वपूर्ण व धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या विषयाचे महत्त्व नव्या संदर्भात अधोरेखित झाले आहे.

त्याचाच एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून केंद्र सरकारच्या वाणिज्य, उद्योग व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे, ‘कृत्रिम बुद्धिमता-सर्वांसाठी’ नावाचे अभिनव अभियान हाती घेण्यात आले आहे. यामध्ये केवळ उद्योग-व्यापार व व्यवसाय यांच्याशीच नव्हे, तर समाजातील सर्व क्षेत्रांना समाविष्ट करून घेतले जाणार आहे, हे विशेष. यामध्ये मेट्रो-महानगरांपासून, शहर-गाव आणि ग्रामीण क्षेत्रांचाही अंतर्भाव केला जाणार आहे.

त्यामुळेच भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता प्रसार-प्रचार व उपयोग करताना, आरोग्य व वैद्यकसेवा, कृषी व संबंधित क्षेत्र, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने विशेषतः ग्रामीण भागात प्रभावी संवाद आणि संपर्क निर्माण करणे, तसेच वैद्यकीय सेवांसह विविध साधनांना बळकटी देणे शक्य होणार आहे.

यासंदर्भात कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडित व नुकताच साध्य झालेला उपक्रम म्हणून, ‘किसान-ई-मित्र’चा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. यामध्ये विविध भौगोलिक क्षेत्रात, विविध प्रकारे केली जाणारी विविध प्रकारची शेती व फलोत्पादन, भाजीपाला लागवड विविध प्रकारचे वातावरण, शेतजमीन व पर्जन्यमानासह शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था निर्माण झाली आहे, हे विशेष. मुख्य म्हणजे, असा सल्ला मिळवण्यासाठी शेतकर्‍याचे आधारकार्ड वा तत्सम ओळखपत्र पुरेसे ठरणार असल्याने, त्याच्या वापरामध्ये संबंधित शेतकर्‍याला सुलभता लाभणार आहे. त्याशिवाय, या पद्धतीला प्रशासनिक सुधारणेची जोडसुद्धा निश्चितच मिळेल.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे इच्छित व अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे जी विशेष उपाययोजना केली आहे, त्यामधील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे-

कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी क्षमता विकास उपाययोजना :

कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिकाधिक स्वरुपात वापर करण्यासाठी, आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, तंत्रज्ञान व कौशल्य उपलब्ध करून, त्याद्वारा क्षमता विकास साधणे.

कृत्रिम बुद्धिमत्तेला कल्पकतेची जोड

कुत्रिम बुद्धिमत्तेला भारतीय व देशी शिक्षण संशोधनाची जोड देण्यासाठी, कल्पकतापूर्ण विकासकेंद्रांची स्थापना करणे.

माहिती संचय संग्रहाचा प्रगत वापर

संगणकीय पद्धती व माहिती-तंत्रज्ञानाच्या आधारे प्रगत कार्यपद्धतीचा विकास व वापर करणे.

कृत्रिम बुद्धिमत्तेची विकासाशी सांगड घालणे

भारताची सध्याची विकसनशील स्थिती व नजीकच्या काळातील, विकासाचा वेग याचा अद्ययावत ताळमेळ घालणे.

कौशल्य विकासात वाढ साधणे

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने, नव्या व प्रगतिशील कौशल्य विकासाला गतिमान करणे.

नवागतांना वित्तीय साहाय्य

कृत्रिम बुद्धिमत्ता हे मुळातच नवे क्षेत्र असल्याने त्यामध्ये नव्याने प्रवेश करून, काम करणार्‍यांना ‘स्टार्ट-अप’च्या स्तरावर वित्तीय साहाय्य उपलब्ध करून देणे.

सुरक्षित व विश्वासार्ह बनविणे

प्रगत माहिती तंत्रज्ञान व संगणकीय पद्धती यांना संशोधनाची जोड देऊन, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला भारतात सुरक्षित व सर्वांसाठी विश्वासार्ह असे साधन करणे.

केंद्र सरकारच्या वरील विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांचे परिणाम, योजनाकारांच्या मते पुढीलप्रमाणे अपेक्षित आहेत -

आर्थिक क्षेत्रातील लवचिक स्वायत्तता

कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा व्यापार-व्यवसाय पद्धती अधिक गतिमान होऊन, त्याचा परिणाम उद्योग-व्यवसायाच्या आर्थिक प्रगतीच्या संदर्भात अधिक सकारात्मक व पूरक स्वरुपात होऊ शकतो. यातून या क्षेत्रातील वाढत्या गुंतवणुकीलाही चालना मिळू शकते.

कौशल्य विकासातून कर्मचारी व कामाचा विकास

नव्याने विकसित होणारे क्षेत्र म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता व त्याच्याशी निगडित क्षेत्रांमध्ये, कौशल्यविकासाला मोठा वाव राहणार आहे. सध्या उपलब्ध असणार्‍या प्राथमिक आकडेवारीनुसार सुमारे ३.३ लाख जणांना, या क्षेत्राशी निगडित कौशल्यविकासाचा लाभ झाला आहे. अशाप्रकारे कर्मचार्‍यांच्या या नव्या क्षेत्रातील कौशल्यविकासाचा लाभ, कर्मचारी आणि कंपनी या उभयतांनाही मिळत आहे.

सरकारचे धोरणात्मक निर्णय व त्याला उद्योग व्यवसायांची सकारात्मक साथ, यामुळे भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता व त्याच्याशी निगडित क्षेत्रात आघाडी घेतली आहे. याचापण आर्थिक व व्यवसायिक लाभ भारतीयांना होणार आहे. ‘स्टँडफोर्ड’च्या २०२४च्या अहवालात, भारताला ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे मुख्य केंद्र’ म्हणून घोषित करण्यात आले.

आरोग्य सेवेमध्ये विशेष सुधारणा

कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा भारतातील वैद्यक क्षेत्र व रुग्णसेवा क्षेत्रात, लक्षणीय सुधारणा घडवून आणल्या जात आहेत. कोरोना काळाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा क्षेत्रात घडून येणारे हे परिवर्तन, मोठ्या अर्थाने लक्षणीय व परिणामकारक ठरणारे आहे.
देशांतर्गत आरोग्य क्षेत्रात प्रगत स्वरुपात व परिणामकारक बदल करण्यासाठी, ‘राष्ट्रीय आरोग्य संस्था’ व ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कानपूर’ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा विशेष प्रकल्प साकारला जात आहे. यातून रोगनिदानापासून रोगनियंत्रणापर्यंत, अनेक आव्हानांवर मात करण्यात येत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता व शिक्षण क्षेत्र

सरकारचे नवे शैक्षणिक धोरण व त्याच्या अंमलबजावणीला, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगाची परिणामकारक साथ मिळाली आहे. याचे दृश्य व सर्वांत प्रमुख उदाहारण म्हणून ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’द्वारा, सोप्या व दृकश्राव्य स्वरुपातील कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक विशेष अभ्यासक्रमांचा उल्लेख करावा लागेल. यातूनच कर्नाटकमध्ये, ‘शिक्षा पायलट’ या अभिनव योजनेची सुरुवात झाली आहे. याचे श्रेयसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ता व त्याच्याशी संबंधित प्रयत्नांनाच जाते.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कृषी व ग्रामीण विकास

भारत आणि भारताच्या आर्थिक सामाजिक संदर्भात महत्त्वाच्या अशा कृषी व ग्राम विकासाला प्रयत्नांबरोबरच, कृत्रिम बुद्धिमत्तेचीही आता भक्कम आणि परिणामकारक साथ लाभली आहे. यातूनच कृषी व ग्रामीण क्षेत्र अधिक उत्पादक झाले असून, ही विकास ग्रामीण क्षेत्रासाठी अनेक प्रकारे लाभदायी ठरला आहे.

कृत्रिम बुद्घिमत्तेद्वारा परिणामकारक प्रशासन

बदलता काळ, बदलत्या अपेक्षा व जनमानस यांचा योग्य ताळमेळ साधून, परिणामकारक प्रशासन व्यवस्था साकारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर उपयोगी ठरला आहे. यामुळे शासन-प्रशासन व्यवस्था अधिकाधिक प्रभावी होत आहे, हे यशही उल्लेखनीय आहे.

थोडक्यात म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्ता हे नवे क्षेत्र विकसित आणि अधिकाधिक प्रचलित-प्रसारित होत आहे. त्यामुळे त्याचे दृश्य व फायदेशीर परिणाम आता निश्चितपणे दिसू लागले आहेत. भारताची वेगाने विकसित होण्याच्या दिशेकडची वाटचाल, यासाठीच
महत्त्वपूर्ण आणि मार्गदर्शक ठरते.

दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर आणि व्यवस्थापन सल्लागार आहेत.)