वक्फ जेपीसी अहवाल लोकसभा अध्यक्षांना सादर

30 Jan 2025 18:22:36

WAQF
 
नवी दिल्ली : (Waqf Amendment Bill Report) वक्फ सुधारणा विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) गुरुवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना आपला अंतिम अहवाल सादर केला आहे. यावेळी जेपीसी अध्यक्ष जगदंबिका पाल आणि समिती सदस्य निशिकांत दुबे, तेजस्वी सूर्या, संजय जयस्वाल व अन्य उपस्थित होते. अहवाल सादर करताना विरोधी पक्षाचे कोणतेही सदस्य उपस्थित नव्हते.
 
गेल्या पाच महिन्यांत जेपीसीने ३८ बैठका घेतल्या, २५० शिष्टमंडळे आणि सदस्यांची भेट घेतली. विविध राज्यांचे दौरेही करण्यात आले. त्याचप्रमाणे माजी न्यायाधीश, कुलगुरूंच्याही भेटी घेतल्या. सर्व भागधारकांशी सविस्तर चर्चा करून अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल आता लोकसभा अध्यक्षांना सादर करण्यात आला आहे. जेपीसीच्या सर्व सदस्यांनी विधेयकाच्या निर्मितीत आपले योगदान दिले आहे. गरीबांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी आणलेले हे विधेयक ते पूर्ण करेल असा आपला विश्वास असल्याचे जेपीसीचे अध्यक्ष जगदंबिका पाल म्हणाले.
 
३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकार वक्फ सुधारणा विधेयक मांडण्याची शक्यता आहे. यासाठी स्थापन झालेल्या जेपीसीमध्ये वादळी कामकाज घडले. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचेही प्रसंग यावेळी घडले. त्याचप्रमाणे वक्फशी संबंधित सर्व घटकांशी सविस्तर चर्चा करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0