चंदीगढ महापौरपदी भाजपच्या हरप्रीत कौर बाबला

बहुमत असूनही आप – काँग्रेस आघाडीचा पराभव

    30-Jan-2025
Total Views |
 
chandigarh
 
नवी दिल्ली : (Chandigarh Mayoral Polls) हरियाणा आणि पंजाबची राजधानी असलेल्या चंदीगडमधील महापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस आघाडीस बहुमत असूनही पराभव पत्करावा लागला आहे. महापौरपदाची निवडणूक भाजपने जिंकली असून हरप्रीत कौर बाबला महापौरपदी निवडून आल्या आहेत.
 
चंदीगडमधील महापौर निवडणुकीत काँग्रेस आणि आप आघाडीच्या उमेदवार प्रेमलता यांना पराभव पत्करावा लागला आहे. बहुमत असूनही आप - काँग्रेस आघाडीचा महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली होती आणि महापौरपदासाठी हरप्रीत कौर बाबला यांना उमेदवारी दिली होती. महापौर निवडणुकीत काँग्रेस आणि आपच्या तीन नगरसेवकांनी बंडखोरी केली आणि त्यांनी क्रॉस व्होटिंग केले, ज्याचा फायदा भाजपला झाला आणि बाबला महापौरपदाची निवडणूक जिंकल्या.
 
वरिष्ठ उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार जसबीर सिंग बंटी यांनी भाजपच्या उमेदवार बिमला दुबे यांचा पराभव केला. येथे भाजपला १७ आणि काँग्रेसला १९ मते मिळाली. तथापि, येथेही क्रॉस व्होटिंग दिसून आले आणि आप आणि काँग्रेसमधील एका नगरसेवकाने भाजपला मतदान केले.