मुंबई : भारतीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. या अर्थसंकल्पातून अर्थव्यवस्थेला दिलासादायक असे निर्णय घेतले जाण्याच्या अपेक्षेने गुंतवणुकदारांमध्ये उत्साह दिसून आला. गुरुवारी २२६ अंशांची उसळी घेत बाजार ७६,७५९ अंशांवर थांबला. याउलट निफ्टीमध्ये ८६ अंशांची किंचितशी वाढ होऊन २३,२४९ अंशांवर स्थिर झाला. बाजारातील गुंतवणुक दारांच्या उत्साहामागे खनिज तेलाच्या घटत्या किंमती, अमेरिकी फेडरल रिझ्रर्व्ह बँकेच्या धोरणांमुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांकडून भारतात गुंतवणुकवाढीची अपेक्षा यांमुळेही बाजारात उत्साहाचे वातावरण होते. जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये उत्साह दिसून आला.
भारती एअरटेल, पॉवर ग्रीड, बजाज फायनान्स, नेस्टले, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. त्याउलट आयटीसी हॉटेल्स, बजाज फिनसर्व्ह, अदानी पोर्ट्स, कोटक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. गुरुवारी आयटी, वाहन निर्मिती, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू या क्षेत्रांतील कंपन्या जास्त फायद्यात राहील्या.
बाजारातील चढ-उतारांच्या हेलकाव्यातही बाजाराने सलग तिसऱ्या दिवशीही उसळीच घेतली याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे भारतीय अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षा हे होय. येणाऱ्या अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती, त्यानंतर मध्यमवर्गीयांची क्रयशक्ती वाढावी यासाठी करसवलत या प्रमुख अपेक्षा खासगी क्षेत्राकडून होत आहेत असे मत तज्ज्ञ नोंदवत आहेत. रुपयातील चढ- उतारांकडेही बाजार लक्ष ठेवून आहे. ट्रम्प यांच्याकडून आयातशुल्क वाढीची सततची टांगती तलवार, तिचे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम या सर्वच गोष्टींना बाजार भविष्यात कशी प्रतिक्रिया देतो याकडे तज्ज्ञांसह देशाचेही लक्ष लागले आहे,असे मत खासगी क्षेत्राकडून नोंदवण्यात येत आहे.