मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित!

    30-Jan-2025
Total Views |
 
Manoj Jarange
 
जालना : मराठा आरक्षणाबाबतच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी गुरुवार, ३० जानेवारी रोजी सहाव्या दिवशी आपले उपोषण स्थगित केले.
 
राज्य सरकारच्यावतीने भाजप आमदार सुरेश धस यांनी अंतरवली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेत त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी खासदार बजरंग सोनवणेदेखील उपस्थित होते. मनोज जरांगे यांनी यावेळी एकूण आठ मागण्या मांडल्या. दरम्यान, राज्य सरकारने मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतानाच यापुढे उपोषण करणार नसल्याचेही स्पष्ट केले.
 
हे वाचलंत का? -  मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजितदादांची भूमिका अधिकृत! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
 
दरम्यान, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वातील समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्याची कार्यवाही सुरु केली. हैदराबाद गॅझेट तपासून शिंदे समितीकडून त्याबाबतचा अहवाल घेऊन उचित कारवाई करण्यात येईल. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि शासन निर्णयानुसार मराठा आंदोलकांवरील गुन्हे तपासून मागे घेण्याबाबत उचित कारवाई करण्यात येईल. मराठा आंदोलकांवरील गंभीर स्वरुपाचे गुन्हे वगळता सर्व गुन्हे तपासून मागे घेण्याबाबत सरकारने सकारात्मकता दर्शवली आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर स्थापन झालेल्या कक्षामार्फत कार्यवाही सुरु राहिल आणि त्यात गती देण्यात येईल, असे आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केले.