चॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्घाटन सोहळा कधी होणार? भारताचा कर्णधार रोहित शर्मा सहभागी होणार?

    30-Jan-2025
Total Views |

Champions Trophy 2025
 
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy 2025) ची सुरुवात १९ फेब्रुवारीपासून होणार आहे. याच चॅम्पियन्स ट्रॉफीआधी उद्घाटनसोहळा कधी आणि कुठे होणार? यासंबंधित अधिकृत ठोस माहिती समोर आलेली नाही. गुरुवारी ३० जानेवारी रोजी उद्घाटनसमारंभ रद्द झाला असल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमाने सांगितले आहे. या चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत.
 
दरम्यान या ट्रॉफीपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा कोणत्याही कार्यक्रमासाठी भारतात जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनेकदा भारताला पाकिस्तानात खेळण्याचे आवाहन केले. मात्र भारतीय क्रिकेट बोर्डाने खेळण्यास नकार दिला आहे.
 
अशातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीच्या सहकार्याने १६ फेब्रुवारी २०२५ रोजी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमचे उद्घाटन करणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी अध्यक्ष म्हणून मोहसीन नक्वी यांची उपस्थिती राहणार आहे. पाहुणे म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.
 
दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळणाऱ्या संघांच्या कर्णधारांचे फोटोशूट पाकिस्तानातील लाहोरमधील ऐतिहासिक हुजूरी बाग किल्ल्यावर पार पडणार आहे. मात्र, यासाठी रोहित शर्मा जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचे प्रत्येक सामने दुबईमध्ये खेळणार आहे. तर पाकिस्तानातील रावळपिंडी, कराची आणि लाहोर या तीन शहरांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत.