भाजप सदस्य नोंदणी अभियानाला अल्पसंख्य समाजाचा प्रतिसाद! जमाल सिद्दिकी यांची माहिती

    30-Jan-2025
Total Views |

Jamal Siddique
 
 
मुंबई : भाजप सदस्य नोंदणी अभियानाला अल्पसंख्य समाजाचा प्रतिसाद असल्याची माहिती भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी गुरुवार, ३० जानेवारी रोजी दिली.
 
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अल्पसंख्याक मोर्चा मुंबई अध्यक्ष वासीम खान, सुफी संवाद महाअभियान राष्ट्रीय सह प्रभारी आबीद अली चौधरी, सिकंदर शेख, मुनव्वर शेख, अकील अहमद शेख, भाजपा प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.
 
जमाल सिद्दिकी म्हणाले की, "मोदी सरकार, महायुती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असल्याने मुस्लीम तसेच अन्य अल्पसंख्याक समाजातील अधिकाधिक लोकांना भाजपमध्ये सामील व्हायचे आहे. यातूनच भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाला अल्पसंख्य समाजाकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. भाजपमुळे केवळ वोट बँकेच्या राजकारणासाठी अल्पसंख्य समाजाचा वापर होण्याचे दिवस संपले आहेत. या समाजातील नागरिक पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्यामुळे देश आणि राज्याच्या विकासात भरीव योगदान देतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
ते पुढे म्हणाले की, "सर्व अल्पसंख्याक समुदायांशी संवाद साधत तिथल्या नागरिकांना आम्ही भाजपा सदस्य बनवत आहोत. सदस्य नोंदणीच्या माध्यमातून ते भाजपामध्ये सामील झाल्यास आपापल्या समुदायाच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग निश्चित करू शकतील. ही गोष्ट त्यांना पटवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारतासाठी १ लाख कार्यकर्त्यांची फौज निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून या फौजेत अल्पसंख्य समाजाचा समावेश असेल. पंतप्रधान मोदींनी केलेल्या १० लाख नव्या कार्यकर्त्यांना राजकारणात सक्रीय करण्याच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या अभियानादरम्यान उत्तर प्रदेशातील ६ लाख, मध्य प्रदेशमधील ३ लाख, अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, त्रिपुरा, पंजाब आणि जम्मू काश्मीर मध्ये ७० हजार सदस्यांची नोंदणी झाली. मशिदींसमोर, दर्ग्यांसमोर धर्मगुरू सदस्य नोंदणी अभियानात पुढाकार घेत आहेत," असे त्यांनी सांगितले. तसेच या अभियानात देशभरात ४४ लाख मुस्लिम भाजपचे सदस्य झाले असून राज्यात ३० जानेवारीपर्यंत १ लाख मुस्लिम सदस्य झाले असल्याची माहिती अल्पसंख्याक मोर्चाचे मुंबई अध्यक्ष वासीम खान यांनी दिली.