बांगलादेशात शेख हसीना यांच्या सत्तांतर नाट्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. मात्र, बांगलादेशची परिस्थिती अद्यापही ‘जैसे थे’च आहे. मोहम्मद युनूस स्वतः बांगलादेश ग्रामीण बँकेचे संस्थापक आणि महत्त्वाचे म्हणजे अर्थशास्त्रात ‘नोबेल’ पारितोषिक विजेते असतानाही, त्यांना आता बांगलादेश सांभाळणे कठीण जात आहे. बांगलादेशातील रेल्वे कर्मचारी संपावर गेल्याने येथील रेल्वे व्यवस्था ठप्प झाली असून, देशभरातील रेल्वेगाड्या बंद असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. एकीकडे हे, तर दुसरीकडे युनूस सरकारच्या विरोधात विद्यार्थी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास देशव्यापी आंदोलन करू, असा इशारा त्यांनी युनूस सरकारला दिला आहे. ‘द डेली स्टार’च्या वृत्तानुसार, रेल्वेचालक आणि त्यांच्या साहाय्यक कर्मचार्यांनी सेवानिवृत्तीनंतर विशेष भत्ता आणि इतर मागण्यांसाठी मंगळवारपासून अनिश्चित काळासाठी देशव्यापी संप सुरू केला आहे. त्यामुळे बांगलादेशची संपूर्ण रेल्वे व्यवस्था ठप्प झाली आहे. याबाबत रेल्वे अधिकारी आणि चालक संघटनेचे नेते यांच्यात बैठकही झाली, मात्र ती अनिर्णित राहिली.
वास्तविक बांगलादेशात गर्दीने भरलेल्या गाड्या सामान्य आहेत. येथील लोक रेल्वेगाड्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी अक्षरशः धडपडतात. ट्रेनमध्ये चढण्याच्या त्यांच्या निरनिराळ्या क्लृप्त्याही आपण पाहिल्या असतील. विचित्र प्रकार म्हणजे गाडीच्या आत जागा नसेल, तर लोक गाडीच्या छतावरही बसायला कमी करत नाहीत. हा प्रवास जरी जोखमीचा वाटत असला, तरी बांगलादेशात असा प्रवास करणे सामान्य आहे. एका भारतीय युट्युबरने रेल्वे इंजिनवर बसून केलेल्या प्रवासाचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. ब्रिटिश राजवटीदरम्यान १८६२ मध्ये, ‘बंगाल-आसाम रेल्वे’ या नावाने स्थापन झालेली बांगलादेश रेल्वे, आजच्या घडीला बांगलादेशात सर्वाधिक वापरली जाते. बांगलादेश रेल्वेमध्ये कर्मचारी संख्या साधारण २७ हजार, ५३५ इतकी आहे. २०१४ सालच्या आकडेवारीनुसार, रेल्वेच्या माध्यमातून होणारे महसूल उत्पन्न अंदाजे ८० लाख टाका, म्हणजे भारतीय रुपयांनुसार साधारण ५६ लाख रुपये इतके आहे. हे सांगण्यामागचे तात्पर्य हेच की, बांगलादेशच्या भवितव्यासाठी ‘रेल्वे’ महत्त्वाची असून, अशा पद्धतीने रेल्वे कर्मचारी संपावर जाऊन रेल्वे सेवा ठप्प होणे चिंताजनक आहे.
रेल्वे कर्मचार्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. संपामुळे एकही गाडी रेल्वेस्थानकात पोहोचली नाही. मार्गावर असलेल्या गाड्याही गंतव्यस्थानी नेल्या जातील, असे रेल्वे अधिकार्यांनी आधीच जाहीर केले होते. या संपामुळे सुमारे ४०० प्रवासी गाड्यांवर परिणाम झाला असून, ज्यात १००हून अधिक शहरांतर्गत सेवा पुरवतात. याशिवाय तीन डझनहून अधिक मालवाहू गाड्यांचाही समावेश आहे. यातून दररोज अंदाजे १८ दशलक्ष प्रवासी वाहतूक करते. प्रत्यक्षात मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे लोको पायलट, पायलट, गार्ड असे अनेक रेल्वे कर्मचारी, त्यांच्या नियमित वेळेपेक्षा जास्तवेळ काम करतात. मधल्याकाळात अतिरिक्त कामावर आधारित, पेन्शन लाभ देण्यास नकार देण्यात आला होता. रेल्वे कर्मचार्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी, सरकारला सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम दिल्याची माहिती आहे.
दुसरीकडे, ढाका विद्यापीठाशी संलग्न असलेल्या, सात महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी गेल्या सोमवारी म्हणजे दि. २७ जानेवारी रोजी मोठी निदर्शने केली आणि सरकारसमोर सहा मागण्या मांडल्या. एवढेच नाही, तर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुदतही दिली. विद्यार्थ्यांच्या मागण्या निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्यास, विद्यार्थ्यांचे हे आंदोलन देशव्यापी होऊ शकते. ही सात महाविद्यालये ढाका विद्यापीठातून वेगळी करून स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. याबाबत त्यांनी सरकारचे प्रमुख युनूस यांची भेट घेण्याची मागणीही केली होती. परंतु, ढाका विद्यापीठाचे विद्यार्थी आणि या आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान, अनेक विद्यार्थी जखमी झाले. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी, सरकारने बॉर्डर गार्ड बांगलादेशचे जवान तैनात केले आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. युनूस सरकार रेल्वे कर्मचार्यांच्या संपाबाबत आता काय निर्णय घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.