ताडोबातील 'एन-१०' गिधाड करणार परिक्रमा पूर्ण; पाच राज्यांमधून प्रवास करुन पुन्हा ताडोबा...

    29-Jan-2025
Total Views |
tatoba N10 vulture



मुंबई (अक्षय मांडवकर) -
'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) 'जीपीएस टॅग' लावून चंद्रपूरातील 'ताडोबा व्याघ्र प्रकल्पा'त सोडलेले गिधाड पाच राज्यांच्या प्रवासानंतर आपली परिक्रमा पूर्ण करण्याच्या तयारीत आहे (tatoba N10 vulture). चार राज्यांमधून प्रवास केल्यानंतर हे गिधाड सध्या तेलंगण राज्यात असून त्याने चंद्रपूरच्या दिशेने आपला प्रवास सुरू ठेवला आहे (tatoba N10 vulture). या गिधाडाने गेल्या तीन महिन्यांमध्ये ३ हजार १८७ किमी अंतर कापले आहे. (tatoba N10 vulture)
 
 
देशातून नामशेष होण्याच्या वाटेवर असणाऱ्या गिधाडांच्या संवर्धनासाठी 'बीएनएचएस' गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहेत. याअंतर्गत हरिणायातील पिंजोर येथे 'बीएनएचएस'ने गिधाड प्रजनन केंद्र उभारले आहे. या केंद्रात प्रजनन करण्यात आलेली एकूण २० गिधाडे ही जानेवारी महिन्यात ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्यात आली होती. ताडोबात १० पांढऱ्या पुठ्ठ्याची गिधाडे आणि पेंचमध्ये १० लांब चोचीची गिधाडे हलवण्यात आली. त्यांना याठिकाणी उभारण्यात आलेल्या जटायू संवर्धन केंद्रामध्ये ठेवण्यात आले होते. यामधील १० पांढऱ्या पुठ्ठ्याच्या गिधाडांंना 'जीपीएस टॅग' लावून ३ आॅगस्ट रोजी ताडोबामधील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले होते. यामधील 'एन-१०' असा सांकेतिक क्रमांक असणाऱ्या मादी गिधाडाला सोडल्यानंतर ती ताडोबातील परिसरामध्ये वावरत होती. १ नोव्हेंबर रोजी या गिधाडाने ताडोबातून उड्डाण केले आणि १० नोव्हेंबर रोजी ते कर्नाटकातील कारवार शहरात आढळले होते.
 
 
ताडोबातून उड्डाण केल्यानंतर हे गिधाड यवतमाळ, अमरावती, अकोला असा प्रवास करुन मध्यप्रदेशात गेले. त्यानंतर मध्यप्रदेशातून पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करुन जळगाव, सातारा, कोल्हापूर मार्गे पुढे जात गोव्यात प्रवेश करुन पणजी आणि मडगावदरम्यानच्या प्रदेशातून त्याने १० नोव्हेंबर रोजी कर्नाटक गाठल्याची माहिती 'बीएनएचएस'चे जीवशास्त्रज्ञ भास्कर दास यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. १,२०० किलोमीटरचा प्रवास करुन कर्नाटकातील कारवार शहामधील नवदलाच्या तळाजवळ हे गिधाड उतरले. पाठीवर टॅग लावलेले गिधाड उतरल्याने काहीकाळ परिसरात संवेदनशील वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कर्नाटक वन विभागाने या गिधाडाची माहिती काढून त्याला पकडून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले. त्यानंतर हे गिधाड आता तेलंगण राज्यातील वस्तापूरला पोहोचले असून त्याची उडण्याची दिशा ही चंद्रपूरच्या दिशेने असल्याची माहिती दास यांनी दिली आहे. त्यामुळे तेलंगणमधून हे गिधाड पुन्हा महाराष्ट्रात त्यातही चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करुन आपली परिक्रमा पूर्ण करणार का, याकडे शास्त्रज्ञांचे डोळे लागले आहेत.