किरकसालचा गवताळ प्रदेश होणार 'जैवविविधता वारसा स्थळ'
29-Jan-2025
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील किरकसाल गावातील गवताळ प्रदेशाला 'जैवविविधता वारसा स्थळ' घोषित करण्यासंदर्भात पहिले पाऊल पडले आहे (kiraksal biodiversity heritage site). शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी 'महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळा'च्या अधिकाऱ्यांनी स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत किरकसालला भेट दिली (kiraksal biodiversity heritage site). यावेळी ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन 'जैवविविधता वारसा स्थळ' घोषित करण्यासंदर्भात सहमती दर्शवली. किरकसालला 'जैवविविधता वारसा स्थळा'चा दर्जा मिळाल्यास हा दर्जा मिळणारे सातारा जिल्ह्यातील ते पहिले गाव ठरेल. (kiraksal biodiversity heritage site)
माणदेशमधील आदर्शगाव किरकसाल हे जैवविविधता संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहे. खास करुन गवताळ प्रदेशासारख्या संकटात सापडलेल्या अधिवासाच्या रक्षणासाठी गावकऱ्यांनी एकजूट केली आहे. किरकसालच्या गावकऱ्यांनी वन्यजीव संवर्धनासाठी राबवलेले मॉडेल हे गावपातळीवर राबवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संवर्धनाच्या कामाला दिशा दाखवणारे ठरले आहे. आता गावातील गवताळ प्रदेशाला जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढकार घेतला आहे. यासंदर्भातील पहिली प्राथमिक बैठक शुक्रवारी किरकसालमधील श्रीनाथ मंदिरात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या पुणे उपकार्यालयाच्या प्रभारी अधिकारी तनुजा शेलार, प्रकल्प अधिकारी दौलत वाघमोडे, माणचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित मुळीक, वनपाल बालटे आणि स्थानिक जैवविविधता प्रेमी उपस्थित होते. गावाच्या जैवविविधता संवर्धनासाठी करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेताना जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल काटकर यांनी यावेळ सादरीकरण केले. तर प्रकल्प प्रमुख चिन्मय सावंत यांनी किरकसाल संवर्धन प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली.
गावाला जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्यासाठी होणारे फायदे, प्रक्रिया आणि ग्रामस्थांची भूमिका यावर प्रकल्प अधिकारी दौलत वाघमोडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेलार यांनीही गावाला राज्य जैवविविधता मंडळाचे पूर्ण सहकार्य असेल, असे सांगितले. कार्यक्रमानंतर डांभेवाडी घाट, डांबी डोंगर व वाघजाई तलाव येथे क्षेत्रभेटी घेऊन जैवविविधतेच्या नोंदी व वन्यजीव निरीक्षण करण्यात आले. या कार्यक्रमात जैवविविधता व्यवस्थापन समितीचे सचिव विकास गायकवाड, सदस्य अनुसया रसाळ, प्राजक्ता काटकर, विशाल काटकर, प्रथमेश काटकर, वैभव अवघडे, नितीन काटकर, पोलिस पाटील दत्ता रसाळ, तसेच सुनील काटकर, भगवान सावंत, विष्णू काटकर, धर्मनाथ काटकर, लता कुंभार, शिवा चोरमले, जोतीराम कुंभार आणि अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.