चिनी बनावटीच्या ’डीपसीक’ एआय तंत्रज्ञानाने संपूर्ण जगाची झोप उडवण्याचे काम केले. अमेरिकी दिग्गज कंपन्यांना याचा मोठा फटका बसला. तथापि, खरा धोका हा सायबर सुरक्षेचा आणि राष्ट्रीय संरक्षणाचा आहे. एआय सारखे अतिप्रगत, नवीनतम तंत्रज्ञान चीनसारख्या विस्तारवादी देशाच्या हाती गेले, तर संपूर्ण जगासाठी ही चिंतेची बाब ठरणार आहे.
चिनी डीपसीकच्या बातमीने अमेरिकी शेअर बाजाराला मोठा तडाखा दिला. दिग्गज टेक कंपन्यांचे समभाग त्यामुळे कोसळले आणि त्यांना एकूण, एक ट्रिलियन डॉलर्सचा फटका बसला. ‘एआय’साठी सेमीकंडक्टर बनवणारी ‘एनव्हिडिया’ ही कंपनी तसेच ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘गुगल’ची पेरेंट कंपनी ‘अल्फाबेट’ आणि ‘डेल टेक्नॉलॉजीज’ यांसारख्या टेक दिग्गजांचे मोठे नुकसान झाले. अमेरिकेतच नाही, तर जगभरातील ‘एआय’संबंधित कंपन्यांना याचा फटका बसला. कमी किमतीच्या चिनी बनावटीच्या ‘एआय’ तंत्रज्ञानाने, स्वाभाविकपणे मोठी खळबळ उडाली. जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रच यामुळे चकित झालेले दिसून येते. डीपसीकचे यश हा स्पुटनिक क्षण असल्याचे मानले जात आहे. 1960च्या दशकात रशियाने स्पुटनिकचे प्रक्षेपण केल्यानंतर, अंतराळ शर्यतीला प्रारंभ झाला. म्हणूनच, या घटनेला स्पुटनिक क्षण असे संबोधले गेले. अत्यल्प किमतीत सादर झालेल्या या डीपसीक या ‘एआय’ मॉड्युलने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राची व्याख्याच बदलली आहे. अत्यंत कमी किमतीत सादर करण्यात आलेले चिनी डीपसीक, या क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांसाठी चिंतेची बाब बनली आहे. ‘चॅट जीपीटी’ या प्रथितयश चॅटबॉटला, मागे टाकण्याचा पराक्रम डीपसीकने केला आहे. चीनला रोखण्यासाठी अमेरिका त्याच्यावर कोणते निर्बंध लादणार का? हाही प्रश्न आहेच. त्याचवेळी, ‘एआय’साठी विशेष सेमीकंडक्टरची आवश्यकता आहे, या आपल्या दाव्यावर ‘एनव्हिडिया’ ही कंपनी ठाम आहे. मात्र केवळ सहा दशलक्ष डॉलर्स, इतक्या अत्यल्प किमतीत हे चिनी तंत्रज्ञान सादर झाले आहे. ‘चॅट जीपीटी’साठी हाच खर्च 100 दशलक्ष डॉलर्स इतका होता, हे लक्षात घेतले म्हणजे डीपसीकचा परिणाम जाणवेल.
एकीकडे ‘चॅट जीपीटी’ आणि ‘गुगल एआय’च्या नवनवीन आवृत्ती दाखल करण्याच्या प्रयत्नात असताना, डीपसीकचे झालेले आगमन हे धक्कादायकच आहे. डीपसीकच्या क्षमता अद्याप स्पष्ट झालेल्या नसल्या, तरी ‘एआय’ क्षेत्रात अमेरिकेला चीनने दिलेले आव्हान राष्ट्रीय सुरक्षा तसेच संरक्षण यांसारख्या कळीच्या मुद्द्यांकडे, लक्ष वेधणारे ठरले आहे. ’एआय’चा वापर हाच अद्यापही जगभरातील सर्वांना पचनी पडलेला नसताना, चीनने सादर केलेले हे स्वस्तातील तंत्रज्ञान तज्ज्ञांसाठी डोकेदुखी ठरली आहे. ‘एआय’मध्ये गुंतवणूक करावी का? हा प्रश्न कायम असताना, चीनने ही अनिश्चितता वाढवली असल्याचे नक्कीच म्हणता येते. त्याचवेळी, या चिनी ‘एआय’ मॉड्युलबाबत डेटा, आर्किटेक्चर आणि त्याची कामगिरी याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी, जोखीम पत्करण्याऐवजी ‘एआय’ कंपन्यांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा पर्याय स्वीकारला आहे. नवीनतम तंत्रज्ञान आणि अमेरिका असे समीकरण साधारणपणे रूढ झालेले आहे. या पार्श्वभूमीवर डीपसीक ‘एआय’ तंत्रज्ञान भू-राजकीय चिंता वाढवणारे ठरले आहे. गुप्त माहितीचे संकलन करण्यासाठी चीन याचा वापर करू शकतो, त्यामुळेच जगाची चिंता वाढली आहे.
जागतिक ‘एआय’ क्षेत्रात भारताला भरपूर संधी असल्याचे मानले जाते. अशा वेळी चीनने सादर केलेली ही आवृत्ती, ही संपूर्ण समीकरणे बदलणारी ठरली आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या संभाव्य गैरवापराची काळजी म्हणूनच व्यक्त होत आहे. राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जगभरातील सरकारे एआय अंमलबजावणीबाबत कठोर नियम लागू करू शकतात. त्यामुळे जागतिक सहकार्यावर परिणाम होऊ शकतो. डीपसीकच्या आगमनामुळे ‘एआय’ क्षेत्राच्या मूल्यांकनाचे पुनर्मूल्यांकन सुरू झाले आहे. त्यामुळे शेअर बाजारातील अस्थिरता वाढली आहे. गुंतवणूकदार अधिक सावध होऊ शकतात. ज्यामुळे इतर तंत्रज्ञान उपक्रम आणि नवोद्योगांना निधी मिळण्यास अडचणी येऊ शकतात. अधिक प्रगत ‘एआय’ मॉडेल्स उदयास येत असताना, कंपन्यांवर फायदे दाखविण्यासाठी दबाव येऊ शकतो. डीपसीकने सुरू केलेली स्पर्धा, जागतिक स्तरावर नैतिक ‘एआय’ आणि नियामक चौकटींभोवतीच्या चर्चांना गती देणारी ठरणार आहे. यामुळे ‘एआय’बाबत मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता तीव्र झाली आहे.
भारताने त्याच्या वाढत्या तंत्रज्ञान परिसंस्थेसह, डीपसीकला पर्याय म्हणून स्वतःच्या ‘एआय’ उपक्रमांना चालना देण्याची गरज अधिक आहे. यामुळे ‘एआय’ संशोधन आणि विकासात गुंतवणूक वाढू शकते. त्यामुळे भारताला जागतिक ‘एआय’ लॅण्डस्केपमध्ये एक प्रमुख खेळाडू म्हणून स्थान मिळू शकते. भारतीय नवोद्योग ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून नवोपक्रम राबवू शकतात. चीन आणि भारत यांच्यातील तणाव कायम असल्याने, डीपसीकच्या संभाव्य धोक्यापासून भारताला आपला डेटा आणि सायबरस्पेस संरक्षित करण्यासाठी विशेष उपाययोजना करावी लागेल. भारताचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आणि सेवा क्षेत्र ‘एआय’ क्षेत्राला जी वाढती जागतिक मागणी आहे, त्याचा नेमकेपणाने फायदा उचलू शकतात. चिनी डीपसीक हा जागतिक पातळीवरील महत्त्वाची घटना असून, भारतासाठी ती संधी आणि आव्हाने दोन्ही देणारी ठरली आहे.
अमेरिकेचा विचार केला, तर ‘एआय’ क्षेत्रातील वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान अमेरिकेसमोर असेल. चीनला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी, अमेरिकी तंत्रज्ञान कंपन्या आणि सरकारी संस्थांमध्ये अधिक सहकार्यासाठी दबाव येईल. चिनी डीपसीकमुळे सायबरसुरक्षा धोकेही वाढणार आहेत. आजवरच्या सायबर फसवणुकीत, चिनी कंपन्यांचाच मोठा हात असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले असतानाच, डीपसीकचे झालेले आगमन ही चिंतेची बाब आहे. चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला समान विचारसरणीच्या राष्ट्रांसोबत एकत्रित सहकार्याने, काही ठोस उपाय राबवावे लागतील. ‘एआय’साठी जागतिक मानके स्थापित करण्याची आवश्यकता यातून अधोरेखित झाली आहे, हे नक्की. तांत्रिक स्पर्धा, राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक स्थिरता या सर्वच बाबी चिनी डीपसीकमुळे ऐरणीवर आल्या आहेत. त्यावर ठोस उपाययोजना न केल्यास, भविष्यात स्वस्तातील चिनी ‘एआय’ तंत्रज्ञानाची मोठी किंमत जगाला चुकवावी लागेल.
संजीव ओक