हिदूंमध्ये फूट पाडून त्यांच्यावर राज्य गाजविणे सोपे होते, हे ब्रिटिशांना ठावूक होते. पण हेच हिंदू एकवटले, तर ते काय करू शकतात, त्याची जाणीव जगाला आता होऊ लागली आहे. या हिंदूंच्या जागृतीचा धसका घेतलेल्या ब्रिटनने हिंदू राष्ट्रवादाला नामोहरम करण्यासाठी, त्याचे सांस्कृतिक खच्चीकरण करण्याचे धोरण स्वीकारले आहे.
प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभमेळ्याने, भारतात सर्वच विरोधी पक्षांची झोप उडविली आहे. या महाकुंभला लोटलेल्या अमाप जनसागराने, विरोधी पक्षांचे सारे राजकारणच उलटेपालटे करून टाकले आहे. हिंदू समाजात जातीपातींच्या आधारावर फूट पाडून आणि मुस्लिमांचे लांगूलचालन करून, निवडणूक जिंकण्याची विरोधकांची स्वप्ने हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्येच भंगली होती. पण तरीही, अंधुक आशेवर आपले फाटाफुटीचे राजकारण करणार्या विरोधकांच्या नाकातोंडात महाकुंभला लोटलेल्या हिंदूंच्या प्रचंड त्सुनामीने, पाणी घालून त्यांना गुदमरून टाकले आहे. दररोज प्रयागराजच्या गंगातीरावर कोट्यवधी हिंदू श्रद्धापूर्वक डुबकी मारताना पाहिल्यावर, त्यांच्यात जातींच्या आधारावर फूट पाडणे यापुढे जमणार नाही, याची जाणीव या विरोधकांना झाली आहे. त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ‘बटेंगे तो कटेंगे’ हा संदेश आजही हिंदू विसरलेले नाहीत, हेही त्यांना ठावूक आहे. त्यामुळे महाकुंभने भारतातील राजकारणाला नवी पण विधायक दिशा दिली आहे.
हिंदूंच्या या विश्वशक्तीने केवळ भारतातील विरोधकच बिचकले आहेत असे नव्हे, तर जगभरातील डाव्या इकोसिस्टीमचेही त्यामुळे धाबे दणाणले आहे असे दिसते. भारतातील बहुसंख्य हिंदू समाजात फूट पाडणे सोपे आहे, ही गोष्ट आजवर सिद्ध झाली होती. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी भारतात हिंदूंचे जे सांस्कृतिक उत्थान केले आहे, त्याची व्यापकता आणि सखोलता किती आहे, ते या कुंभमेळ्याने दाखवून दिले आहे. केवळ प्रयागराजलाच हिंदू श्रद्धाळू जमत आहेत असे नव्हे, तर तेथून ते अयोध्या आणि वाराणसी या अन्य पवित्र तीर्थस्थळांकडेही रवाना होत असल्याचे, गेल्या दोन दिवसांतील चित्र आहे. हिंदू केवळ एकवटतच आहेत असे नव्हे, तर त्यांचे आत्मभानही जागृत होत आहे. हिंदू किंबहुना सनातन संस्कृतीचे महत्त्व आणि महत्ता किती आहे, त्याची जाणीव भारतातील हिंदूंना होत आहे. त्याचबरोबर जगभरातील अहिंदूंनाही या मेळ्याने आकर्षित केले असून, हजारो ख्रिस्ती लोकही या मेळ्यात सहभागी होऊन आत्मशांती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
हिंदूंच्या या शक्तीने, जगभरातील डावी इकोसिस्टीम हादरली आहे. त्यांना हिंदूंचे हे पुनरुत्थान म्हणजे नवे आव्हान वाटू लागले आहे. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे, ब्रिटिश सरकारने आपल्या देशात यापुढील काळात ज्या शक्तींपासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे त्याची यादी केली असून, त्यात खलिस्तानी अतिरेकी आणि हिंदू राष्ट्रवादाचा समावेश केला आहे. म्हणजे ब्रिटनमधील राष्ट्रवादी हिंदू त्या देशात हिंसाचार घडवून आणतील, अशी तेथील गृहखात्याची समजूत झाली आहे.
ब्रिटनच्या गृहखात्याने येत्या वर्षात देशात कोणत्या विघातक शक्तींकडून हिंसाचार होऊ शकतो, याचा सखोल आढावा घेतला आहे. त्यात खलिस्तानी दहशतवादाबरोबरच हिंदू राष्ट्रवादाचाही समावेश केला आहे. हिंदू राष्ट्रवादाची तुलना खलिस्तानी विघातक शक्तीशी करून, ब्रिटनने आपली बौद्धिक दिवाळखोरी जाहीर केली आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, डाव्या इकोसिस्टीमचे प्रतिनिधी असलेल्या पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या सरकारचा सूप्त अजेंडाही त्यातून दिसून आला आहे.
जगभर भारतीयांनी, आपल्या बुद्धिकौशल्याने अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची सर्वोच्चपदे पटकाविली आहे. इतकेच काय, ब्रिटनचे यापूर्वीचे पंतप्रधान ऋषी सूनक हेही भारतीय वंशाचेच होते. विविध क्षेत्रांत भारतीयांच्या वाढत्या प्रभावात, प्रामुख्याने हिंदूंचेच वर्चस्व आहे. त्यातच भारतातही हिंदू राष्ट्रवादाला उचित सन्मान देणार्या भाजपचे सरकार, सलग तिसर्यांदा सत्तेवर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक दबावाला भीक न घालता, भारताच्या राष्ट्रीय हिताचे निर्णय घेण्यास मागेपुढे पाहात नाहीत, हेही रशिया-युक्रेन युद्धातील तेल खरेदीवरून दिसून आले आहे. तसेच त्यांनी, भारतातील हिंदूंमध्ये आत्मभान आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद जागा केला आहे. भारत ही जगातील सर्वात आकर्षक आणि प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. पाश्चिमात्य देशांतील बहुसंख्य बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत, भारताची बाजारपेठ हाच आहे.
परदेशात स्थायिक झालेल्या अनेक भारतीयांनाही, आपले वाढलेले महत्त्व जाणवत आहे. परदेशात भारतीयांकडे पाहण्याच्या गोर्यांच्या दृष्टिकोनात खूपच चांगला बदल झाला आहे. म्हणूनच पाश्चिमात्य आणि त्यातही युरोपीय वर्चस्ववादाला आव्हान मिळू लागले आहे. यापुढील काळात भारताची जसजशी प्रगती होईल, तसतसे त्याचे भू-राजकीय महत्त्वही वाढत जाईल आणि हेच अनेक युरोपीय व अमेरिकी नेत्यांना खुपत आहे.
वास्तविक हिंदू कधीच हिंसक नव्हते. आजही आपली शक्ती ओळखल्यावरही, हिंदू हे सनदशीर मार्गानेच आपले इप्सित साध्य करीत आहेत. राम जन्मभूमीवर राम मंदिराची उभारणी ही न्यायालयीन लढाईनंतरच झाली होती, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळेच ब्रिटनला हिंदू राष्ट्रवादात हिंसक शक्ती कोठून दिसली, हे कोडेच आहे. पण हे कोडे सोडविणे, वाटते तितके अवघडही नाही. गेल्या काही वर्षांत, ब्रिटन आणि अमेरिकेत हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले करण्यात आले होते. तसेच हिंदूंवरही हल्ले करण्यात आले होते. बांगलादेशातील घटना तर ताज्याच आहेत. इतके होऊनही, हिंदूंनी मुस्लीम किंवा ख्रिस्ती धर्मस्थळांवर कधीच हल्ले केलेले नाहीत. या स्थितीत ब्रिटिश गृहखात्याकडून हिंदू राष्ट्रवादाचा समावेश हिंसक सूचित करणे, हा त्या सरकारच्या न्यूनगंडाचे द्योतक आहे. हिंदूंना नामोहरम करण्यासाठी त्यांच्या सांस्कृतिक आत्मभानाचे खच्चीकरण करणे, हाच त्यामागील हेतू दिसतो. खलिस्तानी किंवा इस्लामी अतिरेकाची अनेक हिंसक उदाहरणे देता येतील. पण हिंदू राष्ट्रवादामुळे दंगल उसळल्याचे, एकही उदाहरण सापडणार नाही. तरीही त्याचा समावेश भावी धोका म्हणून केला गेला आहे. राहुल गांधी यांनी काही वर्षांपूर्वी भारताला दहशतवादापेक्षा हिंदू राष्ट्रवाद्यांकडून मोठा धोका आहे, असे म्हटले होते. ब्रिटनचा नवा निर्णय त्या वक्तव्याचेच साकार स्वरुप आहे. ब्रिटिश पंतप्रधान स्टार्मर आणि राहुल गांधी यांच्यातील वैचारिक साम्य त्यातून उघड होईल.
राहुल बोरगांवकर