‘स्टॅव्हॅन्जर युनिव्हर्सिटी’चा हा अहवाल कुणी नाकारण्याची शक्यता फार कमीच. 20व्या आणि 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्माला आलेल्या ‘जनरेशन झेड’चा जन्मापासूनच प्रगत तंत्रज्ञानाशी संबंध आला. त्यांचे लेखन कौशल्य प्रगल्भ व्हायच्या आतच त्यांचा टंकलेखनाशी संबंध आला. अगदी कमी वयातच त्यांच्या हातातील लेखणीची जागा संगणक आणि मोबाईलच्या कीबोर्डने घेतली. बदलत्या काळात फक्त ‘जेन झी’ नाही, तर मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपशी संबंध आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा लिखाणाशी संबंध हळूहळू कमी होत आहे, हे मान्य करणे अयोग्य ठरणार नाही.
माणूस लिहिणेचं विसरला तर? तुम्ही म्हणाल असा अकल्पित, अतार्किक बदल कसा शक्य आहे? पण, आता या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. नॉर्वेमधील ‘स्टॅव्हॅन्जर युनिव्हर्सिटी’ने केलेल्या एका सर्वेक्षणाचा चिंताजनक अहवाल काही दिवसांपूर्वीच समोर आलेला आहे. ‘जनरेशन झेड’ किंवा ‘जेन झी’ म्हणजेच 20व्या शतकाच्या उत्तरार्धात ते 2010 या कालावधीत जन्माला आलेली पिढी हळूहळू आपली लेखनकला विसरत चालली आहे. प्रत्यक्ष लिखाणाशी त्यांचा संबंध हळूहळू तुटत चालला असून, बदलत्या युगात ‘हस्तलिखित’ तर हरवत चाललेली कला आहे, असे या अहवालात म्हटले आहे. ‘स्टॅव्हॅन्जर युनिव्हर्सिटी’च्या केलेल्या या सर्वेक्षणात एकूण ‘जेन झी’पैकी 40 टक्के मुलांनी आपले लिखाणकौशल्य गमावल्याचे निदर्शनात आले आहे. एवढेच नाही, तर एका तुर्की वर्तमानपत्राने विविध विद्यापीठांमध्ये झालेल्या संशोधनाचा आधार घेऊन दिलेल्या एका वृत्तात ‘नव्या पिढीतील लोकांना प्रत्यक्ष हाताने काही लिहायला सांगितले, तर त्यांना आश्चर्य वाटते. लिहिण्याची सवय आणि सराव कमी झाल्यामुळे त्यांना काहीही लिहिताना त्यांना अडचणी येतात,’ असे म्हटले आहे.
‘स्टॅव्हॅन्जर युनिव्हर्सिटी’चा हा अहवाल कुणी नाकारण्याची शक्यता फार कमीच. 20व्या आणि 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्माला आलेल्या ‘जनरेशन झेड’चा जन्मापासूनच प्रगत तंत्रज्ञानाशी संबंध आला. त्यांचे लेखन कौशल्य प्रगल्भ व्हायच्या आतच त्यांचा टंकलेखनाशी संबंध आला. अगदी कमी वयातच त्यांच्या हातातील लेखणीची जागा संगणक आणि मोबाईलच्या कीबोर्डने घेतली. बदलत्या काळात फक्त ‘जेन झी’ नाही, तर मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपशी संबंध आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा लिखाणाशी संबंध हळूहळू कमी होत आहे, हे मान्य करणे अयोग्य ठरणार नाही.
मानवाला लेखनकला नेमकी कधी अवगत झाली, याविषयी निश्चितपणे सांगता येत नाही. पण, आजवर झालेल्या संशोधनावरून आणि उपलब्ध माहितीच्या आधारे ही कला पाच हजार वर्षांपूर्वीही मानवाला अवगत होती, असेच म्हणता येईल. म्हणजेच ही एक प्राचीन कला आहे. मानवाला भाषा अवगत झाली आणि आपल्या मनातील भावना मानव मौखिकरित्या व्यक्त करू लागला. पुढे हीच भाषा विविध लिपींमधून आकार घेऊ लागली. त्यातूनच जन्म झाला तो लेखनकलेचा! पूर्वीच्या काळी लिहिल्या गेलेल्या याच ताम्रपट, भूर्जपत्रे आणि शिलालेखांमुळे आपल्याला आपला इतिहास जाणून घेता आला. थोडक्यात काय, तर भूत आणि भविष्याचा दुवा जोडण्याचे एक महत्त्वाचे काम लेखनकलेने केले. पण, कीबोर्डचा शोध लागल्यानंतर या महत्त्वाच्या आणि प्राचीन लेखनकलेसमोरच अस्तित्वाचे आव्हान उभे ठाकले आहे. कारण, आजच्या पिढीला लिहिण्यापेक्षा ‘टाईप’ करणे हे अधिक नैसर्गिक आणि सोयीचे वाटते.
20व्या शतकाच्या उत्तरार्धात हळूहळू बंद पडत चाललेली पत्र पाठविण्याची पद्धत ही लेखनकला संपुष्टात येण्याचा एक प्रकारे इशाराच होता. पाटीवर अक्षरे गिरवणार्या बोटांना हळूहळू लॅपटॉप आणि मोबाईलच्या कीबोर्डची, टचची सवय झाली आणि लेखनातील ‘टच’ कालौघात हरवत चाललेला दिसतो. ‘कोरोना’ने तर या लेखनकलेवर खूप मोठा घाला घातला. या काळात शाळा-महविद्यालये बंद असल्यामुळे मुलांचा वही-पेनापेक्षा अधिक डिजिटल माध्यमांशी संबंध आला. ‘कोरोना’ संपल्यानंतरही अनेक शाळांमध्ये गृहपाठ किंवा इतर उपक्रम ऑनलाईन पद्धतीनेच सुरु होते. मुलेच काय, तर लिखाण या गोष्टीशी सगळ्यात घनिष्ट संबंध असलेल्या बहुतांश लेखकांचीसुद्धा हीच अवस्था. पूर्वी मोठमोठ्या कादंबर्या, मोठमोठाले ग्रंथ लेखक हातात लेखणी घेऊनच लिहायचे; पण आता ग्रंथ किंवा कादंबर्याच काय, तर लहानशी कवितासुद्धा लिहिण्याऐवजी टाईपच केली जाते.
प्रत्यक्ष हाताने लिहिणे हे मेंदूच्या विकासासाठी उपयोगाचे असते, असे सांगितले जाते. माणूस जे लिहितो, ते त्याच्या अधिक स्मरणात राहते. त्यामुळे लिखाण कमी झाले, तर मानवी मेंदूची कार्यक्षमतासुद्धा कमी होण्याची शक्यता नाकाऱता येत नाही. त्यामुळे लेखनकला धोक्यात येणे हा मानवी भवितव्यासाठी धोकाच. इतिहासाला प्रकाशझोतात आणणारी लेखनकलाच इतिहासजमा झाली, तर भविष्यही अंधारमय होणार, हे नक्की!
दिपाली कानसे