मुंबई (अक्षय मांडवकर) - देवरुखच्या 'सह्याद्री संकल्प सोसायटी'ने रत्नागिरीतील पाच तालुक्यांमधून धनेशाच्या जवळपास ६० घरट्यांच्या (ढोल्या) नोंदी केल्या आहेत (hornbill conservation project in konkan). सध्या कोकणात सुरू असणाऱ्या धनेश पक्ष्यांच्या विणीचा हंगाम सुरू आहे (hornbill conservation project in konkan). या घरट्यांच्या निरिक्षणाचे काम संस्थेचे कार्यकर्ते स्थानिक धनेशमित्रांच्या मदतीने करत असून त्यामधून जन्मास येणाऱ्या पिल्लांच्या नोंदीही घेण्यात येणार आहेत (hornbill conservation project in konkan). गेल्या काही वर्षांमध्ये कोकणातील धनेश पक्ष्यांच्या घरट्यांच्या संख्येत आणि विणीच्या यशाच्या दरात प्रचंड घट झाली आहे. (hornbill conservation project in konkan)
महाराष्ट्रात महाधनेश, मलबारी कवड्या धनेश, मलबारी राखी धनेश आणि राखी धनेश या धनेश पक्ष्याच्या चार प्रजाती आढळतात. धनेश पक्ष्यांना कोकणात गरुड, माडगरुड, ककणेर अशा विविध नावांनी ओळखले जाते. धनेश पक्ष्यांच्या जीवनकालामध्ये त्यांच्या विणीचा हंगाम खूप महत्वाचा असतो. विणीचा हा हंगाम जवळपास चार महिन्यांचा असतो. डिसेंबरपासून सुरू होणारा हा हंगाम सध्या कोकणात सुरू आहे. धनेश पक्ष्यांच्या विणीचे निरीक्षण आणि त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या अधिवासाच्या निर्माणाचे काम 'सह्याद्री संकल्प सोसायटी'च्या माध्यमातून सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे लोकसहभागातून हे काम सुरू करण्यात आले आहे. सद्यपरिस्थितीत संस्थेने चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर मिळून धनेशाच्या ६० घरट्यांच्या नोंदी केल्या आहेत. यामध्ये चिपळूणमधून ११, संगमेश्वरमधून २७ आणि रत्नागिरी, लांजा, राजापूर मिळून २२ घरट्यांची नोंद करण्यात आली आहे. ही घरटी महाधनेश आणि मलबारी कवड्या धनेश या प्रजातींची आहेत.
यामधील काही घरट्यांच्या ठिकाणी सध्या धनेशाची जोडी वावरत असून काही ढोल्यांमध्ये मादी धनेशाने प्रवेश करुन प्रजननास सुरुवात देखील केली आहे. या ढोल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक धनेश मित्रांची फौज तयार करण्यात आली असून काही ढोल्यांवर संस्थेचे कार्यकर्ते आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहेत. गेल्यावर्षी दक्षिणेकडील पश्चिम घाटात धनेशाचा प्रजनन हंगाम उशिराने सुरु झाल्याचे आढळून आले होते. तसेच अनेक ठिकाणी सुरु झालेल्या घरट्यातून माद्या या विहीत प्रजनन काळापेक्षा खूपच लवकर बाहेर पडल्याचेही निदर्शनास आले होते. म्हणूनच अधिवास नष्टतेमुळे ढोल्यांचे कमी झालेले प्रमाण आणि तापमान वाढीमुळे जर धनेशाच्या नैसर्गिक जीवनक्रमात काही बदल होत असतील, तर त्यावर सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.
नोंदी असल्यास संपर्क साधा
धनेश पक्ष्यांच्या प्रजननामध्ये होणारे बदल अभ्यासण्याकरिता अधिकाधिक घरट्यांच्या निरिक्षणाची गरज आहे. कोकणात धनेशाच्या चारही प्रजातींची घरटी आढळतात. या घरट्यांच्या नोंदी तुमच्याकडे असल्यास आम्हाला 77982 33243 या क्रमांकावर संपर्क साधावा. - प्रतीक मोरे, सदस्य, हाॅनर्बिल स्पेशालिस्ट ग्रुप - आययूसीएन
ढोलीत घरटे
डिसेंबर ते एप्रिल महिन्यादरम्यान या पक्ष्याचा विणीचा हंगाम असतो. या काळात धनेश हे झाडांमधील नैसर्गिक ढोलींमध्ये घरटे तयार करतात. त्यांचा प्रजनन हंगाम हा साधारण १२० ते १४० दिवसांचा असतो. महाधनेशाच्या जोडीची मिलनाची क्रिया झाल्यानंतर मादी स्वत:ला साधारण १०० ते १०५ दिवसांसाठी झाडाच्या ढोलीत कोंडून घेते. या काळात ती अंडी उबवण्याचे काम करते. मादी ढोलीतून बाहेर पडल्यानंतर साधारण दोन आठवड्यानंतर त्यामधून पिल्लू बाहेर पडते.