मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील सिंह सफारीमध्ये काही दिवसांपूर्वी पाळणा हलल्यानंतर आता गुजरातवरुन सिंहाच्या जोडीचे आगमन झाले आहे (sgnp brought new lion pair). रविवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी गुजरातच्या सक्करबाग प्राणिसंग्रहालयामधून सिंहाच्या जोडीला राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले (sgnp brought new lion pair). याबदल्यात राष्ट्रीय उद्यानाकडून सक्करबाग प्राणिसंग्रहालयाला वाघाची जोडी देण्यात येणार आहे. (sgnp brought new lion pair)
राष्ट्रीय उद्यानातील सिंह आणि व्याघ्र सफारी हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. यातील सिंह सफारीमध्ये १६ जानेवारी रोजी छाव्याचा जन्म झाला होता. डिसेंबर, २०२२ साली गुजरातमधून 'मानस' आणि 'मानसी' या सिंहाच्या जोडीला राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. या जोडीने छाव्याला जन्म दिल्यानंतर आता राष्ट्रीय उद्यानात गुजरातमधून आशियाई सिंहाची नवी जोडी आणण्यात आली आहे. जगात आशियाई सिंह हे भारतामधील केवळ गुजरात राज्यात शिल्लक राहिले आहे. गुजरातच्या सक्करबाग प्राणिसंग्रहालयामध्ये या सिंहांचे प्रजनन होते. त्यामुळे देशात कोणत्याही प्राणिसंग्रहालयास सिंह पाहिजे असल्यास त्यांना सक्करबाग प्राणिसंग्रहालयाकडे मागणी करावी लागते. अशा प्रकारे 'मानसी' आणि 'मानस' या सिंहाच्या जोडीनंतर राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने सिंहाची अजून एक जोडी देण्यासंदर्भात सक्करबाग प्राणिसंग्रहालयाला विनंती केली होती. या विनंतीवरुन गुजरातने राष्ट्रीय उद्यानात सिंहाची जोडी पाठवली आहे.
रविवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी गुजरातवरुन ही जोडी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली. ही जोडी तीन वर्षांची असून तिला सध्या निरीक्षण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. येत्या काही दिवसात या जोडीला सिंह सफारीमध्ये सोडण्यात येईल. राष्ट्रीय उद्यानात २००९ साली बन्नेरगट्टा राष्ट्रीय उद्यानातून 'रविंद्र' आणि 'शोभा' नामक सिंहाची एक जोडी आणण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबर, २०२२ साली गुजरातमधून 'मानस' आणि 'मानसी' या सिंहाच्या जोडीला राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले. 'रविंद्र' आणि 'शोभा' या जोडीने राष्ट्रीय उद्यानात २०११ साली तीन छाव्यांना जन्म दिला. यातील एक छावा नर, तर दोन मादी होत्या. त्यांचे नाव 'गोपा', 'जेस्पा' आणि 'लिटील शोभा' असे ठेवण्यात आले. 'रविंद्र' आणि 'शोभा'सोबत सिंह सफारीत नांदणारे हे तिन्ही छावे पाहण्यासाठी त्यावेळी पर्यटकांची मोठी गर्दी होत असे. 'शोभा' देखील या छाव्यांना घेऊन सफारीच्या बससमोरुन ऐटीत चालत असे. कालांतराने 'शोभा' आणि 'लिटील शोभा'च्या मृत्यूनंतर हे कुटुंब त्रिकोणी झाले. 'रविंद्र'ला देखील आजाराने घेरले. 'गोपा' आणि 'जेस्पा' यांच्या बळावर सिंह सफारी सुरू होती. मात्र, त्यानंतर 'गोपा'ही आजारी पडली. २०२१ साली तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आॅक्टोबर,२०२२ महिन्यात १७ वर्षीय 'रविंद्र' देखील मृत पावला आणि त्याच महिन्यात 'जेस्पा' देखील मृत्यू झाल्याने राष्ट्रीय उद्यानातील सिंहाच्या या कुटुंबाचा करुण अंत झाला होता. 'मानस' आणि 'मानसी'च्या या नव्या छाव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारीला उमेदीचे दिवस येणार आहेत.