मुंबई (अक्षय मांडवकर) - 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'त प्रथमच 'काळ्या टोपीचा खंड्या' या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे (
sahyadri tiger reserve black capped kingfisher). रविवार दि. १९ जानेवारी रोजी प्रकल्पात पार पडलेल्या 'आशियाई पाणपक्षी गणने'च्या दरम्यान या पक्ष्याचे दर्शन झाले (
sahyadri tiger reserve black capped kingfisher). त्यामुळे व्याघ्र प्रकल्पातील पक्ष्यांचा यादीत भर पडली आहे. (
sahyadri tiger reserve black capped kingfisher)
'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'त साधारण पक्ष्यांच्या २४४ प्रजाती आढळतात. व्याघ्र प्रकल्पातील शिवसागर जलाशय आणि चांदोली धरणातील पाण्याचा उपलब्धतेमुळे याठिकाणी चांगल्या संख्येने पाणपक्षी देखील सापडतात. या पाणपक्ष्यांची गणना करण्यासाठी रविवार दि. १९ जानेवारी रोजी व्याघ्र प्रकल्पात 'आशियाई पाणपक्षी गणने'चे आयोजन करण्यात आले होते. पक्षीनिरीक्षक आणि वनकर्मचाऱ्यांचे चमू तयार करुन त्यांना व्याघ्र प्रकल्पातील वेगवेगळ्या ठिकाणी एकदिवसीय पक्षी गणनेकरिता पाठविण्यात आले. या गणनेच्या माध्यमातून ३५ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. मात्र, यामध्ये लक्षवेधी पक्षी ठरलो तो म्हणजे काळ्या टोपीचा खंड्या. चांदोली राष्ट्रीय उद्यानातून या खंड्याची नोंद करण्यात आली असून व्याघ्र प्रकल्पातील या पक्ष्याची ही पहिलीच नोंद आहे.
'चांदोली राष्ट्रीय उद्याना'चे वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांच्या नेतृत्वातील चमूला या पक्ष्याचे दर्शन झाले. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धाकाळे धबधब्याच्या परिसरात आम्हाला काळ्या टोपीच्या खड्याचे दर्शन झाल्याची माहिती नलवडे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. नलवडे यांनी लागलीच आपल्या कॅमेऱ्यामध्ये या पक्ष्याचे छायाचित्र टिपल्यामुळे त्याच्या अस्तित्वाचा छायाचित्रित पुरावा देखील मिळाला. प्रामुख्याने हा पक्षी किनारी प्रदेशांमध्ये राहणे पसंत करतो. त्यामुळे घाटामाथ्यावरील या पक्ष्याची नोंद महत्त्वपूर्ण आहे.
फार कमी प्रमाणात दिसणाऱ्या काळ्या टोपीच्या खंड्यामधील नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. त्यांच्या डोक्यावरील काळ्या टोपीच्या आकारामुळे त्यांना काळ्या टोपीचा खंड्या हे नाव मिळालयं. हा पक्षी प्रामुख्याने स्थलांतरी आहे. मात्र, काही पक्षी भारतामध्ये कायमस्वरुपी अधिवासही करत असावेत. दक्षिण रशिया, उत्तर आणि दक्षिण कोरिया प्रदेशामध्ये हा पक्षी प्रजनन करतो. हिवाळ्यामध्ये तो भारत, पाकिस्तानचा किनारी प्रदेश, श्रीलंका, नेपाळ, बांग्लादेश, दक्षिण मान्यमार, थायलंड, कंबोडिया, दक्षिण व्हिएतनाम, अंदमान निकोबार बेट, मलेशिया, सिंगापूर, इंडोनिशाया या देशांमध्ये स्थलांतर करतो.