किटकावर वाढणाऱ्या दुर्मीळ कवकाचा सिंधुदुर्गातून पुनर्शोध; ३९ वर्षांनी केली जगातील दुसरी नोंद

३९ वर्षांनी केली जगातील दुसरी नोंद

    27-Jan-2025   
Total Views |
 rare fungi
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधून 'ओरॅक्युलोसायफा अनाकर्डिकोला' (Auriculoscypha anacardiicola) या दुर्मीळ कवकाची नोंद करण्यात आली आहे (rare fungi). या प्रजातीची पहिली नोंद ही १९८५ मध्ये केरळ राज्यातून झाली होती (rare fungi). ३९ वर्षाच्या कालावधीनंतर सिंधुदुर्गातून केलेली जगातील दुसरीच नोंद आहे. (rare fungi)
 
 
प्राणी आणि वनस्पती या दोन्ही गटांचे गुणधर्म ज्याच्यामध्ये आढळून येतात तरीही एक स्वतंत्र गट म्हणून विकसित झालेला, प्रकृतीतील विघटनाची महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक म्हणजे कवक किंवा बुरशी. अशाच एका अत्यंत दुर्मीळ कवकाच्या प्रजातीची नोंद दोडामार्ग तालुक्यातील कुडासे येथील 'वानोशी फॉरेस्ट होमस्टे' आणि कसाल या दोन गावातून करण्यात आली आहे. 'ओरॅक्युलोसायफा अनाकर्डिकोला' हे या कवकाचे नाव असून 'बेसिडीओमायसीटीसी' या गटातील हा कवक आहे. ही एक दुर्मिळ आणि प्रदेशनिष्ठ कवकांची प्रजाती आहे. 'ओरॅक्युलोसायफा' या कुळातील आजपर्यंत शोध लावलेली ही एकमेव प्रजात आहे. या प्रदेशनिष्ठ आणि दुर्मिळ कवकाच्या प्रजातीचा शोध 'वानोशी फॉरेस्ट होमस्टे'मधील शितल देसाई, अभिषेक राणे आणि 'आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट' येथील संशोधक राजेशकुमार.के.सी आणि त्यांचा विद्यार्थी अन्सिल यांनी लावलेला आहे. या प्रजातीसंदर्भात शोधनिबंध हा "मायकोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया"च्या संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाला आहे. या संशोधनामध्ये संशोधकांनी कवक, किटक आणि वनस्पती हे तिन्ही घटक एकमेकांवर कसे अवलंबून राहतात, याचाही शोध घेतला आहे.
 
 
आंबा, काजू आणि रानबिंबा या तीन वनस्पतींवरच 'अनाकर्डियेसी' या कुळातील कवकाची आजपर्यंत नोंद आढळून आलेली आहे. यामधील रानबिंबा या झाडावर प्रथमच या कवकाची नोंद आढळली आहे. 'नियोग्रिनिया झेल्यानिका' म्हणजेच ज्याला 'स्केल कीटक' किंवा 'खवले कीटक' या नावांनीही ओळखले जाते, ते किटक काजू आंबा आणि रानबिबा या झाडांच्या खोडात वावरताना दिसतात. या झाडांच्या खोडाची साल ही फटीयुक्त असल्याने कीटक या झाडाची निवड करत असावेत. पोशकतत्व मिळविण्यासाठी या झाडाच्या रसाचा उपयोग किटक अन्न म्हणून करतात. म्हणजेच हे किटक या वनस्पतीवर परजीवी म्हणून जीवन जगतात. वनस्पतींवर परजीवी म्हणून जगणाऱ्या या किटकांवर ओरॅक्युलोसायफा अनाकार्डिकोला हे कवक किटकांच्या वाढीवर ताबा मिळवते. झाडांच्या खोडावर शाखायुक्त तंतूच्या सहाय्याने कवक एक सूक्ष्म गाठ तयार करून किटकांना त्यात अडकून ठेवतात. एका गाठीत एक ते दोन किटक आढळून येतात. कवकांचे सूक्ष्म तंतू किटकांच्या शरीरावरील छिद्रामार्फत त्यांच्या शरीरात प्रवेश करतात.या प्रक्रियेत कवक पूर्णपणे किटकांच्या वाढीवर नियंत्रण ठेवतो. किटकांची वाढ एका विशिष्ट अवस्थेत मर्यादित ठेवून त्यांच्या शरीरातील पोषक घटकांचा वापर कवक स्वतःच्या वाढीसाठी करतो.
 
 
किटकावर काय परिणाम होतो ?
 कवकांच्या विळख्यात अडकलेले 'नियोग्रिनिया झेल्यानिका' हे किटक प्रौढ अवस्थेत रूपांतर होऊ शकत नाहीत आणि त्यांचे प्रजनन सुद्धा थांबते.अर्थातच कवक त्यांना स्वतःसाठी अनुकूल असलेल्या अवस्थेत स्थिर ठेवतात. कवक आणि वनस्पतीचा अप्रत्यक्षपणे किटकांमार्फत संबंध येतो. कवक किटकाच्या शरीरातील पोषक तत्त्वावर वाढते तर किटक वनस्पतीतून आपले अन्न मिळवतात म्हणूनच कवकाला झाडांचा खोटा किंवा छद्म वनस्पती-परजीवी म्हटले जाते. संशोधनातून हे सिद्ध झालेले आहे की हे त्रिसूत्री परस्पर संवेदन 'ओरॅक्युलोसायफा अनाकार्डिकोला' हे कवक 'नियोग्रिनिया झेल्यानिका' हा किटक आणि विशिष्ट प्रकारची वनस्पती मुख्यत अनाकर्डियेसी या कुळातील झाडांशीच मर्यादित आहे. झाडावर परजीवी असणाऱ्या 'नियोग्रिनिया झेल्यानिका' या किटकांची संख्या नियंत्रण ठेवण्याचे कार्य हे कवक करत असल्याचा अंदाज संशोधक वक्त करतात.
 
 
कवक किटकांची निवड कशी आणि कोणत्या अवस्थेत करतात? किटकांच्या वाढीवर स्वतःला अनुकूल असलेल्या पद्धतीने नियंत्रण कसे ठेवतात? आणि या किटकांचा वनस्पतींवर नेमका काय परिणाम होत असेल? या सर्व गोष्टींची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आम्ही करत आहेत. - शीतल देसाई, संशोधक

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.