मुंबई : (Ladki Bahin Yojana) 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने' मधील लाभार्थी महिलांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेली लाभाची रक्कम परत करण्यासंदर्भात शासकीय पातळीवर विचार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. तसेच सरकार या रकमेचा परतावा घेणार या भीतीने अनेक महिलांनी आधीच या योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज करण्यास सुरु केले होते.
याच पार्श्वभूमीवर, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने' मधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीस धरून नाहीत, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी केले आहे. लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही, असे सांगण्यात आले.