स्मरण ‘चांगला मार्ग दाखवणार्‍या’ नागा राणीचे...

    25-Jan-2025
Total Views |

 Naga Rani
 
हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे की, या धर्मात महिलादेखील धर्मगुरू असतात आणि दुसरे वैशिष्ट्य आहे की, हिंदू धर्मगुरू हे लढवय्येही असू शकतात. ही दोन्ही वैशिष्ट्ये ज्या थोर व्यक्तिमत्त्वामध्ये एकवटली आहेत, ते व्यक्तिमत्त्व आहे, नागा राणी गाइदिन्ल्यू यांचे. त्यांच्या नावाचा अर्थ आहे ‘चांगला मार्ग दाखवणारी.’ आज त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण...
 
दि. 26 जानेवारी 1915 रोजी या दिवशी निसर्गाने भयंकर रूप धारण केलेले असताना, ‘नागा रान्गमई’ जमातीत लांगकाओ गावामध्ये एका दैवी मुलीचा जन्म झाला. तिच्या जन्मानंतर निसर्ग पुन्हा प्रेमळ स्वरूपात आला. ज्योतिषी आणि गावकर्‍यांचे एकमत झाले की, ही कन्या ‘चेराचानदिल्यू’ या देवीचा अवतार आहे. अगदी लहानपणापासून तिला चंद्राकडे पाहता पाहता ध्यानावस्था प्राप्त होत असे. तिच्या हाताचे पाणी ग्रहण केले की, आरोग्याच्या समस्या दूर होत असत. संपूर्ण नागा समाजात तिचे स्थान अतिशय सन्मानाचे होते. भुवन नावाच्या एका गुहेमध्ये तिने यात्रा केल्या. या गुहेमध्ये भगवान विष्णूचा वास आहे. गुहेमध्ये तिला देवीचे दर्शन होत असे आणि पुढे काय करायचे याबद्दल देवी तिला मार्गदर्शन करीत असे. ती सर्पराजाची उपासनासुद्धा करीत असे. जीवनाच्या या काळात ती समाजाच्या परंपरेनुसार, पशुबळीसुद्धा देत असे. संपूर्ण समाजाला तिच्या या विशेष प्रभावी आणि दैवी व्यक्तिमत्त्वाची जाणीव होती. त्यामुळे सर्वजण तिच्याकडे अत्यंत भक्तिभावाने पाहत.
 
हा काळ नागा समाजासाठी अत्यंत कठीण होता. इंग्रज सरकार आणि ख्रिस्ती मिशनरी हातात हात घेऊन नागा समाजावर आक्रमण करीत होते. ‘तुम्ही आदिम आहात, तुम्ही पापी आहात, तुम्हाला धर्म नाही, तुम्ही येशूची प्रार्थना करा,’ असे सांगणारे ख्रिस्ती धर्मगुरू भावनिक आक्रमण करीत होते. ‘तुमच्या जंगलातील लाकडावर आमचा अधिकार आहे, आम्ही ज्या झाडाकडे बोट दाखवू ते झाड तोडून आम्ही जिथे सांगू तिथे तुम्ही आणून पोहोचवले पाहिजे,’ असा आदेश देणारे आणि प्रत्येक घरावर कर बसवणारे इंग्रज अधिकारी आर्थिक आणि राजकीय आक्रमण करीत होते. यामुळे त्रस्त नागा समाजाला आधाराची गरज होती आणि तो आधार गाइदिन्ल्यूच्या रूपाने समाजाला मिळाला.
 
जादोनांग हा तरुण यावेळी इंग्रजांना कर देऊ नका, वेठबिगारी करू नका, असे आवाहन करून समाजाला आंदोलनाच्या आघाडीवर घेऊन गेला होता. गाइदिन्ल्यू त्या आंदोलनात सहभागी होऊन जादोनांगची सहकारी झाली. जादोनांगसुद्धा आजार्‍यांवर उपचार करीत असे. नागा समाजातील धर्मांतरित लोकांनी एकदा त्याला उपचार करण्यासाठी बोलावले आणि फसवून इंग्रज सैनिकांच्या ताब्यात दिले. गाइदिन्ल्यू त्याला भेटायला तुरुंगात गेली आणि तिच्या मागे इंग्रज सरकारचे गुप्तहेर लागले. इंग्रज तुरुंगातच जादोनांगच्या जीवनाचा अंत झाला. आंदोलनाचे नेतृत्व आपोआप गाइदिन्ल्यूकडे आले आणि ती जणू काही राणी झाली.
 
लांगकाओ गावात गावकर्‍यांनी राणीसाठी मंदिर आणि घर बांधले. राणीने सर्वांना समाजावले की, आपला सनातनी संसारी नावाचा धर्म हाच श्रेष्ठ आहे. ख्रिस्ती धर्म आणि इंग्रज सरकारची वेठबिगारी आपण करायची नाही. आपल्या धर्मात ज्या अनिष्ट प्रथा निर्माण झाल्या आहेत, त्या आपण दूर करू. समाजाने या मतांचा स्वीकार केला आणि अनेक कुप्रथा नष्ट झाल्या.
 
मिशनरी आणि सरकार मात्र यामुळे तिच्या विरोधात उभे राहिले. पाच हजार जण राहू शकतील, अशा अभेद्य लाकडी किल्ल्याची उभारणी राणीने पुलोमी या गावी सुरू केली. इंग्रज गुप्तहेर तिच्या भोवती वावरत असल्याने ही गोष्ट इंग्रज सरकारला समजली. किल्ला पूर्ण होण्याआधीच त्यांनी मोठी सैनिकी कारवाई केली आणि राणीला पकडून कोहिमा तुरुंगात बंदिस्त केले. दोन महिने तिथे तुरुंगात ठेवून नंतर हातात बेड्या घालून इंफाळ तुरुंगात नेले. खटला चालवण्याचे नाटक सुरूच होते. 1931 ते 1947 सालचा हा पूर्ण काळ राणी तुरुंगातच बंदिस्त राहिली. इंग्रज अधिकारी आणि मिशनरी अशा दोघांनी मिळून तिच्या सुटकेचे सर्व प्रयत्न हाणून पाडले.
 
स्वातंत्र्य मिळाल्यावर राणीची सुटका झाली. मात्र, भारतातून फुटून नवा ख्रिस्ती देश निर्माण करू पाहणारे मिशनरी आणि फुटीर गट तिच्या विरोधात उभे राहिले. तिला स्थानबद्ध करण्यात आले. यावर उपाय म्हणून राणी भूमिगत राहून कार्य करू लागली. काही काळाने केंद्र सरकारला राणीचे महत्त्व समजले आणि सरकारने तिला संरक्षण दिले.
 
जीवनाच्या अंतापर्यंत राणीने सनातनी धर्माचे रक्षण आणि भारताशी नागा समाजाची एकनिष्ठता यासाठी काम केले. सनातनी संसारी धर्माचे आधुनिक रूप म्हणजे हराक्का पंथाचा प्रचार केला. ‘हराक्का असोसिएशन’ स्थापन करून पंथाला संघटनेचे स्वरूप दिले. संघ, कल्याण आश्रम, विद्या भारती अशा राष्ट्रीय विचारांच्या संस्था आणि संघटना यांच्या कामात सहकार्य केले. याबाबतचे देशप्रेमी विचार त्यांनी नागा समाज आणि देशातील सर्व समाजासमोर सतत आणि स्पष्टपणे मांडले.
 
राणीचे जीवन आपण अभ्यासले, तर आपल्या लक्षात येते की, राणी खरेतर सर्वोच्च आध्यात्मिक अवस्था प्राप्त झालेली धर्मगुरू होती. परंतु, देश, काळ, परिस्थिती पाहून तिने आध्यात्मिक कार्य करतानाच राजकीय कार्यसुद्धा केले. तिच्यामुळे नागा समाजात भारतीय राष्ट्रीय विचार जीवंत राहिला.
 
दि. 26 जानेवारी हा राणीचा जन्मदिवस भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. हा एक दैवी योगायोगच म्हणावा लागेल. यानिमित्ताने या थोर देशभक्त राणीला शत शत नमन!
 नरेंद्र पेंडसे