वंगभूमीतील दोन बांगला रामायणे (1)

कृत्तिवास ओझाचे ‘श्रीराम पांचाली’

    25-Jan-2025
Total Views |
 
 
Shriram Panchali
 
पश्चिम बंगालची भूमी म्हणजे साहित्य, संगीत, कलेचे माहेर आहे. बंगाली भाषेला फार मोठी देदीप्यमान साहित्य परंपरा आहे. ‘गीत गोविंद’ लिहिणारे कवी जयदेव, मालाधर बसु, विप्रदास, विजयगुप्त, चंडीदास, चैतन्य प्रभु, लोचनदास, रवींद्रनाथ टागोर अशी कवी-महाकवींची थोर परंपरा हे बांगला भाषेचे वैभव आहे. या कवींच्या मांदियाळीमधील 14 शतकाच्या अखेरीस होऊन गेलेला, कृत्तिवास ओझा यास ‘आदि महाकवी’ म्हणून ओळखले जाते. या थोर पंडित महाकवीचे रामायण, ‘कृत्तिवास रामायण’, ‘श्रीरामपांचाली’ अशा विविध नावाने विख्यात आहे. बंगालमधील घराघरात हे रामायण गायले जाते. हे रामायण, गोस्वामी तुलसीदासांच्या ‘रामचरितमानस’च्या आधी लिहिले गेलेले आहे.
 
आपल्या देशाला साहित्याचे पहिले ‘नोबेल’ पारितोषिक कवीवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी मिळवून, भारतीय काव्याचा झेंडा विश्वपटलावर फडकवला. बांगला भाषेला वैभवशाली प्राचीन साहित्य परंपरा आहे. संगीत, कला, आणि साहित्याचे वंगभूमी हे माहेर आहे. येथील निसर्गामध्ये संगीत चराचरात भरलेले आहे. कालीमातेचे उपासक असलेल्या बंगालमध्ये, जयदेवांच्या ‘गीत गोविंद’ने राधाकृष्ण भक्तीचा मळा फुलवला आणि चैतन्यमहाप्रभूंनी कृष्ण भक्तीला कळसास पोहोचवले. कृष्णभक्तीने भारलेल्या वंगभूमीत, प्रभू रामचंद्रांच्या गुणवर्णनपर पहिले बांगला रामायण लिहिण्याचे अपूर्व कार्य महाकवी कृत्तिवास ओझा याने केले. कृत्तिवासला बांगला ‘आदि महाकवी’चा मान दिला जातो. त्याने लिहिलेले बांगला रामायण, त्याच्या नावानेच ‘कृत्तिवास रामायण’ म्हणून ओळखले जाते. पण, त्या रामायण महाकाव्याचे मूळ नाव ‘श्रीराम पांचाली’ आहे.
 
आदि कवी म्हणून गौरवप्राप्त कृत्तिवास ओझा हा, थोर विद्वान व व्यासंगी पंडित होता. खूप वर्षे त्यांच्या विषयी फारशी माहितीच नव्हती. त्याच्या काव्यात त्याने स्वतःबद्दल फारसे स्पष्टपणे, सविस्तरपणे कोठेही लिहिलेले नाही. हा त्याकाळच्या संतकवींचा आत्मलोपी स्वभावच होता. अलीकडेच डॉ.दिनेशचंद्र सेन यांनी, कृत्तिवास ओझाच्या चरित्राचा शोध करून काही माहिती प्राप्त केलेली आहे. कवी कृत्तिवास ओझा यांचा कार्यकाळ इ.स.1381 ते 1461 असा, 80 वर्षांचा मानला जातो. प. बंगालमधील नदिया जिल्ह्यातील ‘फुलिया’ येथे ते राहात होते. त्या गावात त्यांचे स्मृतीस्थळ-स्मारक आहे. त्याच्या वडिलांचे नाव श्री वनमाली ओझा आणि आईचे नाव मानिका होते. त्यांचे आजोबा धर्मांध मुस्लिमांच्या अत्याचारास कंटाळून, मूळगावातून पलायन करून ‘फुलिया’ येथे आश्रयाला आले होते. कृत्तिवासला चार भाऊ होते. चौघेही विद्वान होते. पद्मा नदी पार एक आश्रम होता. तेथील आचार्य पू. चुडामणी हे कृत्तिवासाचे गुरू होते.
 
कृत्तिवास हे उपजत व्युत्पन्न कवी, ज्योतिषतज्ज्ञ, व्याकरणी, नीतिशास्त्र पारंगत विद्वान होते. त्यांनी पाच श्लोक लिहून, ते त्यावेळच्या गौडेश्वर राजास सादर केले होते. ते काव्य, त्यातील भाव आणि शब्दरचना वाचून राजा एवढा प्रभावित झाला की, त्याने कृत्तिवासाला राज दरबारी पाचारण करून, त्याचा सत्कार-सन्मान केला. त्याला राजकवी म्हणून दरबारी राजमान्यता दिली. बहुतेक राजे, अशा दरबारी कवीकडून स्वतःचीच स्तुती गाऊन घेतात. पण, हा राजा त्यास अपवाद होता. राजाने कृत्तिवासाला, रामकथा बांगला भाषेत लिहिण्याची विनंती केली आणि या विनंतीनुसार कृत्तिवासाने रामकथा लिहिली-गायली. अवतारी दिव्य महापुरुष म्हणून, ‘श्रीराम’ हे कृत्तिवासाचे आवडते दैवतच होते. तिच रामकथा म्हणजे ‘कृत्तिवासाचे रामायण’, ‘श्रीराम पांचाली’ होय!
 
कृत्तिवासाचे हे रामायण म्हणजे, वाल्मिकी रामायणाचा बांगला भाषेतील अनुवाद नाही, तर रामकथेवर आधारित कृत्तिवासाचे स्वतंत्र काव्यरचना-ग्रंथ आहे. वाल्मिकी रामायणात सात कांडे आहेत, तर कृत्तिवासाचे रामायण फक्त सहा कांडाचे आहे. ‘आदिकांड’, ‘अयोध्याकांड’, ‘अरण्यकांड’, ‘किष्किंधाकांड’, ‘सुंदरकांड’ आणि ‘लंकाकांड’ अशी त्या सहा कांडांची नावे आहेत. वाल्मिकी रामायणातील ‘उत्तरकांड’ कृत्तिवासाने टाळले आहे. तसेच ‘युद्धकांडाचे’ नाव, ‘लंकाकांड’ केलेले आहे. हा केवळ नाम बदल नाही, तर कृत्तिवासाच्या विशेष वेगळ्या दृष्टिकोनाचे दर्शन आहे.
 
कृत्तिवासाच्या रामायणातील राम हा करुणामूर्ती, कोमल, मृदु, सुकुमार आहे. बंगालचा निसर्ग, ऋतु, सण, उत्सव, चालीरिती, परंपरा याचे विलोभनीय, उत्कट, मनमोहक शब्ददर्शन, हे कृत्तिवासाच्या रामायणाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. हे रामायण दार्शनिक विचाराने क्लिष्ट न करता, आमोद-प्रमोद अल्हाद अशा रंजकतेने फुललेले आहे. म्हणूनच कृत्तिवासाचे रामायण, बंगाली माणसाच्या गळ्यातील ताईत झालेले आहे. या रामायणाला बांगला साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृतीचा सर्वोच्च मान लाभलेला आहे.
 
कृत्तिवासाचे रामायण हे स्त्री शक्तीला प्राधार्य देणारे आहे, हे त्याचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य आहे. अन्य रामायणात राम युद्धापूर्वी शिवाची पूजा करतात, अशी शिवभक्तीची वर्णने आहेत. परंतु, कृत्तिवास श्रीरामाला शक्ती उपासक, दुर्गादेवी पूजक म्हणतो. बंगाल भूमीही माँ कालीची, शक्ती उपासकांची भूमी आहे. त्याचा प्रभाव आपणास कृत्तिवासाच्या रामायणात स्पष्टपणे दिसतो. राम आणि रावण दोघेही दुर्गादेवी पूजक असलेले दाखवून, शाक्तपंथाचा, देवी उपासनेचा पुरस्कार कृत्तिवास करतो. ‘शाप’आणि ‘वर’ या संकल्पलनांचाही पगडा, कृत्तिवास रामायणावर आहे. सीता, तारा आणि मंदोदरी या तिघीही महान होत्या. त्यांच्या शापातूनच रामकथा घडत जाते, असे कृत्तिवास म्हणतो. सीता रावणाला शाप देते की, ‘तुझा कुलनाश होईल’, तो होतो. तारा वाली वधानंतर श्रीरामाला शाप देते की, ‘सीतेचा त्याग व शोक करशील, तिच्यापासून तुलाही सुख लाभणार नाही’ आणि मंदोदरी पती रावणाला शाप देते की, ‘तुला साध्वी असलेली सीता कधीच भोगता येणार नाही.’ अशा अनेक शापांतूनच रामकथेचा उद्भव झालेला आहे, असे कृत्तिवास म्हणतो.
 
अशा प्रकारे कृत्तिवास ओझा यांचे बांगला रामायण, ‘श्रीराम पांचाली’ हे नायिकाप्रधान महाकाव्य आहे. सीतेचा शक्ती अवतार म्हणून श्रेष्ठत्व तो वर्णन करतो. स्त्री ही केवळ भोग्य नसून, ती सर्जक, पौषक आणि भाग्यविधाती आहे. तशीच ती संहारकही आहे. अशी स्त्री शक्तीची विविध रूपे, हेच कृत्तिवास रामायणाचे वैशिष्ट्य आहे. शाक्तपंथीय देवी उपासनेचा श्रीरामकथेद्वारे पुरस्कार असे या, ‘श्रीराम पांचाली’ रामायणाचे थोडक्यात स्वरूप आहे.
 
॥ जय श्रीराम ॥
 
 
 
विद्याधर ताठे