कौशल्य विकास विभागाच्या बळकटीकरणासाठी दक्ष प्रकल्प

24 Jan 2025 15:19:19
Skill Development Department


मुंबई
: कौशल्य विकास विभागाच्या ( Skill Development Department ) बळकटीकरणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने सुरू होणारा 'दक्ष' (डेव्हलपमेंट अंडर अपलाईड नॉलेज ॲण्ड स्कील्स फॉर हुमन डेव्हलपमेंट इन महाराष्ट्र) या प्रकल्पासाठी शासनाकडून गतीने कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा व मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींना दिली.

मंत्रालयात 'दक्ष' या प्रकल्पाबाबत जागतिक बँकेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा,मुख्य सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, जागतिक बँकेचे भारताचे पथक प्रमुख प्रद्युम्न भट्टाचार्य, वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञ डेनिस निकोलेव्ह यावेळी उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले की, कौशल्य विकास विभागातील महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, राज्य कौशल्य विकास सोसायटी, राज्य कौशल्य आयुक्तालय, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ या सर्वांच्या कौशल्य विकासाच्या कामामध्ये एकसुत्रता येईल व काळानुरूप आवश्यक असलेले कौशल्य अभ्यासक्रम विकसीत करून जागतिक दर्जाचे कुशल मनुष्यबळ करण्याचा मानस 'दक्ष' या प्रकल्पातून घडेल, महिला व समाजातील प्रत्येक व्यक्तीला काळानुरूप कौशल्य विकसित करण्यावर या प्रकल्पातून भर देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नाविन्यता व कौशल्य विकास या संकल्पनावर भर देण्यासाठी सूचना केले आहे त्या अनुषंगाने जागतिक कौशल्य केंद्र विकसित करणे आणि नाविन्यता नगर वसविणे याबद्दल देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली.या प्रकल्पासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींसाठी कौशल्य विभागाचे संकेतस्थळ अद्ययावत करण्यासाठी उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत याबाबतीत निर्णय घेणे, 'दक्ष'प्रकल्प अंमलबजावणी कक्षासाठी तात्काळ ४५ मनुष्यबळाला मंजुरी देणे व या प्रकल्पासाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक आहे, अशी चर्चा मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याशी मंत्री श्री.लोढा यांनी यावेळी केली.

मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या की, कौशल्य विकास विभागाला गती देणाऱ्या 'दक्ष'प्रकल्पासाठी सर्व विभागामध्ये समन्वय साधून उद्योगांच्या मागणीप्रमाणे काळानुरूप कौशल्य विकास करण्यासाठी शासन आग्रही आहे.या प्रकल्पाच्या अनुषंगाने सर्व निर्णयांना गती देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

जागतिक बँकेचे भारताचे पथक प्रमुख प्रद्युम्न भट्टाचार्य म्हणाले की, कौशल्य विकास विभागाच्या बळकटीकरणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने सुरू होणारा 'दक्ष' प्रकल्प हा देशातील सर्वात उत्कृष्ट प्रकल्प ठरेल.काळानुरूप समाजातील शेवटच्या घटकाला उद्योगांच्या मागणीप्रमाणे शिक्षण देवून कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे. कौशल्य विकास विभाग व यामध्ये सहभागी सर्वांचा सक्रीय सहभाग आवश्यक असेल असेही त्यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0