‘चाईल्ड’ नॉट ‘ब्राईड’!

    24-Jan-2025
Total Views |
Iraq Law for Women


लेकीबाळींचे बालपण म्हणजे निरागस, निष्पाप कळीसारखेच! पण, या कळीला अवेळीच कुस्करण्याचा कायदा मुस्लीम राष्ट्र इराकमध्ये पारित झाला आहे. त्यानुसार शिया मुस्लीम मुलीचे लग्न वयाच्या नवव्या वर्षी करण्याला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. काही कळण्याआधीच या बालिकांसाठी ‘निकाह’च्या नावाने लैंगिक आणि मानसिक शोषणाचा पिंजरा कायदेशीररित्या तयार असणार आहे. हा कायदा पारित करण्याचे कारण काय, तर बालवयात निकाह केल्याने मुली-महिला अनैतिक लैंगिक संबंधापासून वाचतील. भयंकर आणि तितकेच घृणास्पद!

तसेही इराकमध्ये मुलींची लैंगिक इच्छा कमी होण्यासाठी तिचाही खतना केलाच जातो. अगदी खतन्याविरोधात कायदा असला, तरी मुली काय माणूस नाहीत का? पण, छे! इराकच्या त्या फतवा काढणार्‍यांना आणि कायदे बनवणार्‍यांना महिला या माणूसच वाटत नाहीत. बालिका पुढे जाऊन अनैतिकतेनेच वागणारच, असे मानून निकाहसाठी नऊ वर्षांच्या मुलींना योग्य ठरवताना, पुढे जाऊन त्या बालिकेचे शोषण करणार्‍या किंवा करू इच्छिणार्‍या पुरुषाविरोधातला कायदा मात्र इराकमध्ये बनला नाही. शरिया कायद्याद्वारे बलात्कारीला भयंकर शिक्षा मिळते, असे म्हटले जाते. मात्र, हे कधी होणार, तर बलात्कार झाला, हे सिद्ध झाल्यावर. गोषात आणि कोषात राहणार्‍या इराकच्या त्या मुली-महिला अत्याचाराबद्दल बोलणार तरी कुणाला? इराकी कायद्याने तिला फारसे हक्क दिलेच नाहीत. इराकच्या ४१ कायद्यांनुसार, पत्नीला ताब्यात ठेवण्यासाठी पती पत्नीला मारू शकतो. पत्नीने लैंगिक संबंधांसाठी एकदा जरी नकार दिला, तरी पती तिला तलाक देऊ शकतो. जर पुरुषाने इज्जतीसाठी त्याच्या नात्यातील मुली-महिलेचा खून केला, तर त्याला फक्त तीन वर्षांची शिक्षा होणार.

इराकच्या मुली-महिलांच्या जगण्याचा स्तर काय आहे, हे सांगणार्‍या दोन घटना. इराकमधल्या १२ वर्षांच्या सनाचा बाप एकदा जुगार हरला. हरल्याचा मोबदला म्हणून त्याने सनाच्या मोठ्या बहिणीला समोरच्या जुगार्‍याला ‘सेक्स स्लेव्ह’ म्हणजेच ‘लैंगिक गुलाम’ म्हणून विकून टाकले. हे असह्य होऊन त्या मुलीच्या आईने आत्महत्या केली. मग सनाच्या बापानेे दुसर्‍या बाईशी निकाह केला. (जुगारी दुष्ट व्यक्तीला निकाहसाठी दुसरी बाईही मिळाली.) तिने त्याच्या पहिल्या पत्नीच्या मुलींना सांभाळण्यास नकार दिला. अडचण नको, म्हणून त्याने पहिल्या पत्नीच्या मुलींवर गोळ्या झाडल्या. त्याआधी मुलींच्या अंगावर उकळते पाणी फेकले. या सगळ्या हल्ल्यातून सना बचावली. मात्र, तिचे शरीर आणि चेहरा होरपळून निघाला.

अशीच एक दुसरी वेदनादायी घटना. हेरो या किशोरीवर तिच्या शेजारच्या दोन इसमांनी सामूहिक बलात्कार केला. त्यांना शिक्षा देण्याआधी घरातले आपल्यालाच मारतील, या भीतीने ती गप्प बसली. दुर्दैवाने ती गरोदर राहिली. तिच्या घरातल्यांना जेव्हा हे कळले, तेव्हा त्यांनी तिला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. ती जीव वाचवण्यासाठी पळून गेली. सुदैवाने ती एका आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थेला भेटली. संस्थेने तिला मदत केली. मात्र, इराकमध्ये तिच्या अपत्याला बापाचे नाव लावणे आवश्यक होते. निकाहशिवाय झालेल्या पोराची आणि त्याच्या आईची खैर नव्हती. तसेही या संस्थेत असतानाही तिच्या नातेवाईकांनी तिचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. तिला जर जीवंत राहायचे असेल, तर तिने बलात्कार्‍याशी निकाह करणे गरजेचे होते. शेवटी स्वयंसेवी संस्थेला नाईलाजाने पुढाकार घ्यावा लागला. तिच्यावर बलात्कार करणार्‍यांपैकी एका व्यक्तीशी तिचा निकाह लावण्यात आला. तो तिच्यापेक्षा वयाने तिप्पट होता. तेव्हा कुठे तिला जीवनदान मिळाले.

भयंकर! हा कोणता धर्म-कायदा? इस्लाममध्ये कायदा सांगणारे सुन्नी आणि शियांचे अनेक गट आहेत. त्यांपैकी शिया मुस्लिमांचा कायद्याचा अर्थ सांगणारा एक गट आहे ‘जाफर स्कुल.’ ‘जाफर स्कुल’च्या मते नऊ वर्षांच्या मुलीचा निकाह करण्याला मान्यता आहे. इराकच्या सत्तेवर मुल्ला-मौलवींचे वर्चस्व. कारण, इराकमध्ये ९७ टक्के मुस्लीम आहेत. या कट्टरपंथी मुस्लिमांना खुश ठेवण्यासाठी इराकच्या सरकारने मुल्ला-मौलवींना विशेष अधिकार दिले. या मुल्लांनी ‘जाफर स्कुल’चा आधार घेत नऊ वर्षांच्या मुलीचा निकाह योग्य ठरवला आहे. त्यानुसार इराक सरकारने हा कायदा पारित केला. म्हणूनच आता इराकसह बालविवाहाचे समर्थन करणार्‍यांना कळायलाच हवे की ‘चाईल्ड नॉट ब्राईड.’