मुंबई : (Chhaava Movie Trailer) चित्रपटप्रेमींना प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा दमदार ट्रेलर बुधवार, दि. २२ जानेवारी रोजी संध्याकाळी प्रदर्शित झाला. इतिहासकार शिवाजी सावंत यांच्या छावा या प्रसिद्ध मराठी कादंबरीवर आधारित लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटात विकी कौशलसह, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर अश्या तगड्या कलाकारांची वर्णी लागली आहे.
दिनेश विजन यांनी मॅडॉक फिल्म्स अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्वराज्याचे धाकले धनी असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचा हा जीवनपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. 'छावा' या चित्रपटाचा ट्रेलरवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होताना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशलचा रुद्रावतार पाहताना अंगावर काटा येतो. ट्रेलरमधील संवाद ऐकताना आणि युद्धप्रसंगांची दृश्यं पाहताना छाती अभिमानाने फुलून येते.
टिझर प्रदर्शित झाल्यानंतर फक्त विकी कौशलच्या लूकचीच नव्हे तर इतर मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या नावांची चर्चा होती. विशेषतः औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या लूकविषयी अनेकांना उत्सुकता होती. औरंगजेबाच्या भूमिकेतील अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून अक्षय खन्ना आहे. वृद्ध औरंगजेबाच्या भूमिकेतील अभिनेता अक्षय खन्ना हा त्याच्या कमाल लूकमुळे अजिबात ओळखू येत नाही. 'सिवा गया, पर अपनी सोच जिंदा छोड गया' या एका डायलॉगने अक्षय खन्नाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे आता छावा चित्रपटात विकी कौशल आणि अक्षय खन्ना यांच्या अभिनयाची जुगलबंदी येत्या १४ फेब्रुवारीला चित्रपटप्रेमींना पाहायला मिळणार आहे.