मुंबई (विशेष प्रतिनिधी) - उरणमधील चिरनेर गावात गुरुवार दि. २३ जानेवारी रोजी दुर्मीळ 'हिमायलीन ग्रिफाॅन' जातीचे गिधाड अशक्त अवस्थेत आढळून आले (Himalayan Griffon Vulture). वन विभागाने स्थानिक वन्यजीव बचाव संस्थेच्या मदतीने या गिधाडाचा बचाव केले असून त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू करण्यात आले आहेत (Himalayan Griffon Vulture). या प्रजातीची गिधाडे ही महाराष्ट्रात हिवाळ्यामध्ये स्थलांतर करुन येतात. (Himalayan Griffon Vulture) महत्त्वाचे म्हणजे उरणमधील 'बर्ड फ्लू'बाधित क्षेत्रात हे गिधाड सापडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद असली तरी ‘पांढऱ्या पुठ्ठ्याची’, ‘लांब चोचीची’ आणि ‘पांढरी गिधाडे’ १९९० आणि त्यापूर्वी मोठय़ा संख्येने आढळत होती. गिधाडांची संख्या देशभरात कोलमडल्यानंतर अपुऱ्या खाद्यपुरवठय़ामुळे राज्यात आढळणारी गिधाडे सुद्धा दिसेनाशी झाली. त्यामुळे त्यांचा समावेश ‘नष्टप्राय श्रेणी’तील पक्ष्यांच्या यादीत करण्यात आला. प्रामुख्याने उत्तर भारतात आढळणारे ‘ग्रिफाॅन’ गिधाडे दरवर्षी महाराष्ट्रात हिवाळी स्थलांतर करतात. यामधीलच 'हिमालयीन ग्रिफाॅन' प्रजातीचे गिधाड गुरुवारी उरणमधील चिरनेर गावात आढळले. हे गिधाड गावातील एका आदिवासी महिलेला सापडले. गावकऱ्यांनी याची माहिती 'फ्रेण्ड्स आॅफ नेचर' या संस्थेच्या कार्यकर्त्यांना दिली. कार्यकर्त्यांनी गिधाडाला ताब्यात घेऊन वन विभागाला कळवले. उरण वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी या गिधाडाची रवानगी पुढील उपचाराकरिता मुंबईला केली असून 'राॅ' या संस्थेमार्फत त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
उरणमधील गिधाड हे पूर्णपणे अशक्त आणि कुपोषित असल्याची माहिती 'राॅ'चे प्रमुख पवन शर्मा यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे देखील त्यांनी सांगितले. शिवाय हे गिधाड उरणमधील 'बर्ड फ्लू'बाधित क्षेत्रातील एक किलोमीटरच्या परिसरात आढळल्याने त्याची आम्ही तपासणी देखील करुन घेणार असल्याचे शर्मा म्हणाले. भारतातील गिधाडांच्या प्रजातीमधील 'हिमालयीन ग्रिफाॅन' हे सर्वात मोठे गिधाड आहे. पांढऱ्या पुठ्ठयाची आणि भारतीय गिधाडांचे वास्तव्य हे आग्नेय आशियाई देशांमध्ये आहे. तर 'ग्रिफाॅन' हे हिमालय पर्वत रांगेत सापडतात. परंतु, हिवाळ्यात हे भारताच्या दक्षिणेकडे स्थलांतर करतात. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या आकाशात दुर्मीळ युरेशिय गिधाडे आढळून आली होती. त्यामधील वडाळ्यात जखमी अवस्थेत सापडलेल्या एका गिधाडावर 'राॅ'ने उपचार करुन त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले होते.