राष्ट्र-राज्य संकल्पनेचा परिचय

    22-Jan-2025
Total Views |

Nation
भारत देशाची आणि त्याच्या बदलत्या भूगोलाची तोंडओळख आपण मागील भागात पाहिली. ‘देश’ ही संकल्पना अधिक भौगोलिक स्वरूपाची असली, तरी त्या भूभागात राहणार्‍या समाजाची सांस्कृतिक वैशिष्ट्ये भिन्न असतील, तर त्या भूप्रदेशाची एक देश म्हणून ओळख अधिक घट्ट होते, असेही आपण म्हटले. याच संदर्भात आपल्यासमोर जो शब्द ‘देश’ या शब्दाशी समकक्ष म्हणून येतो तो म्हणजे ‘राष्ट्र.’ ‘राष्ट्र’ या संकल्पनेचा नेमका अर्थ काय, इंग्रजी भाषेत त्यासाठी वापरला जाणारा ‘नेशन’ हा शब्द त्याच्याशी समानार्थी आहे का आणि याचबरोबर सतत वापरला जाणारा जोडशब्द किंवा जोडसंकल्पना म्हणजे ‘राज्य’ किंवा ‘स्टेट’ या दोघांचा परस्परसंबंध काय ते आपण आज तपासून पाहू.
नेशन’, ‘नॅशनलिझम’ (आपण या दोन्हीसाठी सध्या सोय म्हणून ‘राष्ट्र’ आणि ‘राष्ट्रवाद’ असे शब्द वापरू) आणि प्रत्यक्ष अस्तित्वात असलेली किंवा संकल्पित राज्य व्यवस्था यांचा संबंध नेमका काय, याचा खर्‍या अर्थाने सखोल विचार फ्रेंच राज्यक्रांतीच्या सुमारास सुरू झाला. फ्रेंच भाषा बोलणारे, फ्रेंच चालीरीती पाळणारे फ्रेंच लोक यांचे एक राष्ट्र आहे. हे राज्य काही फक्त राज्यकर्ते आणि सरदार यांचा एक वर्ग आणि ख्रिश्चन पाद्र्यांचा दुसरा वर्ग यापुरते सीमित नाही. सर्वसामान्य जनतेच्या तिसर्‍या वर्गाचाही यात समावेश व्हायला हवा. फ्रेंच राष्ट्राचे हे महत्त्वाचे घटक आहेत. अशा विचारातून फ्रेंच राष्ट्र म्हणजे नेमके काय व कोणाचे असा उहापोह सुरू झाला. हा तिसरा वर्ग म्हणजे, प्रामुख्याने नव्याने उदयाला आलेला उद्योजक वर्ग होता, ज्यांच्याकडे जन्मजात उमरावी नसली, तरी धनाने आलेली समृद्धी होती आणि राष्ट्राच्या जडणघडणीत आता त्यांना सहभाग हवा होता.
 
याच सुमारास जर्मनी आणि इंग्लंडमध्येही विचारांना चालना मिळत होती. फ्रेंच राज्यक्रांतीचे पडसाद संपूर्ण युरोपभर उमटत होते आणि युरोपमधील सर्वच राष्ट्रे त्यांच्या राष्ट्रीयत्वाचा आधार शोधत होती. या काळात युरोपात इंग्लंडसारखी लोकशाही दिशेने झुकलेली राष्ट्रे होतीच. पण, अनेक भिन्न वांशिक, भाषिक गटांना सामावून घेतलेली ऑस्ट्रो-हंगेरीयन साम्राज्यासारखी राजेशाही पद्धतीची राज्येही होती. या सर्व मंथनातून जी ‘राष्ट्र’ संकल्पना निर्माण झाली, ती सांस्कृतिक एकता आणि भिन्नतेवर भर देणारी होती. भाषिक एकता हा एकत्वाचा मूलाधार मानला गेला. यातून भाषेचे प्रमाणीकरण आणि अन्य भाषिक लोकांशी भिन्नत्वाची भावना या संकल्पनांनी मूळ धरले. एका दृष्टीने पाहता, ही राष्ट्रे मुळात अस्तित्वात होतीच. मात्र, त्यांच्या भिन्नत्वाची जाणीव या आधी तीव्रतेने झालेली नव्हती. या काळात सर्व राष्ट्रांनी राष्ट्रभाषा, राष्ट्रीय प्रतीके, राष्ट्रीय गाणी, राष्ट्रीय उत्सव यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती आणि समाजमानसात स्थापना केली. स्वाभाविकपणे जर समाजाचे सांस्कृतिक आणि राष्ट्रीय वेगळेपण जपायचे असेल, तर त्या राष्ट्राच्या संस्कृतीस अनुकूल, त्या राष्ट्राच्याच लोकांनी चालवलेले असे राज्य स्थापन व्हायला हवे. पश्चिम युरोपात तुलनेने सहजगत्या या विचारास पाठबळ मिळून, त्या त्या राष्ट्राचे राज्यही निर्माण झाले. युरोपात अन्यत्र मात्र या संकल्पनेस कमीअधिक स्वरूपात यश मिळाले. हाच राष्ट्र-राज्य संकल्पनेचा पहिला आविष्कार होता.
 
राष्ट्र-राज्य संकल्पना समजून घेताना या दोन्ही शब्दांचे नेमके काय अर्थ इथे अभिप्रेत आहेत, ते समजून घेतले पाहिजे. ‘राष्ट्र’ म्हणजे एक असा मानव समाज, जो एका विशिष्ट भूभागावर राहतो, ज्याची काही समान संस्कृती आहे, ज्याच्या समान जीवनविषयक धारणा आहेत आणि ज्याला समान ऐतिहासिक पूर्वपीठिका आहे. या सर्व आचार-विचार व्यवहारातील समानतेमुळे त्या समाजात एकत्वाची भावना स्वाभाविकपणे निर्माण होते आणि या परंपरांना अखंडित चालू ठेवण्याची एक सामाजिक इच्छा त्यातून उत्पन्न होते. अशा सामाजिक इच्छेची पूर्तता व्हायची असेल, तर समाजाच्या व्यवहारांचे नियमन करणारे जे राज्य ते ताब्यात हवे. ‘राज्य’ याचा इथे अर्थ म्हणजे त्या भूभागावर सार्वभौम सत्ता असलेली आणि सर्व प्रशासनिक व्यवस्था सांभाळणारी यंत्रणा. या अर्थानुसार भारतीय संघराज्य हे एक राज्य गणले जाते. ज्याला आपण रूढार्थाने ‘राज्य’ म्हणतो तशी महाराष्ट्र, गुजरात अशी राज्ये नव्हे. अशा प्रकारे सांस्कृतिकदृष्ट्या एकसंध समाज म्हणजेच ‘राष्ट्र’ आणि त्या समाजाच्याच विचाराने चालणार्‍या राज्याचे त्यांचा निवास असणार्‍या भूभागावर आधिपत्य अशी जोडव्यवस्था म्हणजे राष्ट्र-राज्य व्यवस्था.
 
या व्यवस्थेत असे अपेक्षित आहे की, अंतिमतः सर्व राष्ट्रे आपापल्या भूभागावर राज्यव्यवस्था स्थापन करतील. आपल्याच संस्कृतीच्या लोकांचे राज्य असल्याने कुठल्याही प्रकारचा अल्पसंख्य समाज नसेल, ज्यावर अन्याय होतो आहे. परिणामतः सर्वत्र आंतरिक सौहार्द असेल. प्रत्यक्षात असे घडत नाही. आज आपण जी राष्ट्र-राज्ये बघतो, त्यात बरेचदा भिन्न मानवसमूहांना एकत्र आणून एका राज्याच्या अंतर्गत वसवलेले असते. मग अशा समूहांचे स्वायत्ततेचे प्रयत्न सतत चालू राहतात. स्कॉटलंड, कॅटेलोनिया, कुर्दिस्तान यांचे मधूनमधून होत राहणारे जनमत आणि दक्षिण सुदानसारखी नव्याने तयार झालेली राष्ट्रराज्ये हेच दर्शवतात की, मानव समूह नेहमी परस्पर भेद शोधून छोट्या छोट्या अस्मिता तयार करत राहतात. ही प्रवृत्ती कायम राहिली आणि राष्ट्र-राज्य सिद्धांतानुसार प्रत्येक नवीन उदयास आलेल्या राष्ट्राला जर नवीन राज्य तोडून दिले, तर मात्र अत्यंत छोट्या तुकड्यांमध्ये विखुरलेली आणि अत्यंत अस्थिर अशी जागतिक व्यवस्था यातून निर्माण होऊ शकते.
 
‘एक राज्य, एक राष्ट्र’ अशी स्थिर व्यवस्था आणि ‘एक राज्य, अनेक राष्ट्र’ अशी अस्थिर व्यवस्था यांच्यापेक्षा वेगळी अशी ‘अनेक राज्य, एक राष्ट्र’ व्यवस्था कशी असावी याचा फारसा विचार युरोपने कधी केला नाही. त्यांच्या दृष्टीने अशी व्यवस्था मुळात टिकणारी नाही. कारण, अशा स्थितीत एक तर सर्व राज्ये स्वतःची स्वतंत्र राष्ट्रीय ओळख कालांतराने निर्माण करतील किंवा सर्व राज्ये एकत्र येऊन एक मोठे संघराज्य बनवतील. त्यामुळे भारतासाठी हे राष्ट्र-राज्य प्रतिमान लागू करणे, हा एक अत्यंत जटिल प्रश्न आहे. ‘हे प्रतिमान लागू नाही’ असा स्वच्छ सोपा निष्कर्ष काढण्याऐवजी त्या चौकटीत भारताला जमेल तिथे दाबून बसवण्याचे प्रयत्न सतत होत आले आहेत. त्यातूनच भारत हा अनेक राष्ट्रांचा एक समूह आहे, भारत हे एक बनत असलेले राष्ट्र आहे. (नेशन इन मेकिंग) 1947 साली निर्माण झालेले हे एक नवीनच राष्ट्र आहे, अशा सर्व संकल्पना येतात. नवीन राष्ट्राचे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे नवीन उत्सव निर्माण होतात. पण, प्रतीक शोधण्यासाठी स्वाभाविकपणे अडीच हजार वर्षे मागे जाऊन अशोकाचा जयस्तंभ निवडला जातो आणि मग हे राष्ट्र नवे का जुने, असा संभ्रम विद्वज्जनांना पडतो.
 
इथे आपण ‘नेशन’ आणि ‘राष्ट्र’ यातील भेद प्रथम समजून घ्यायला हवा. ‘नेशन’ या संकल्पनेत वर म्हटल्याप्रमाणे समान भूभाग, संस्कृती, इतिहास आणि जीवनधारणा आवश्यक आहेत. युरोपीय दृष्टिकोनातून यापैकी जीवनधारणा या प्रामुख्याने समान ख्रिश्चन ‘रिलीजन’च्या अनुसरणातून निर्माण होतात आणि समान संस्कृती ही समान भाषेतून उगम पावते. भूभाग समान असतो. पण, त्याचे आणि समाजाचे नाते हे ख्रिश्चन धारणांच्या अनुसार उपभोगाचे किंवा मालकीचे आहे. तसेच या संकल्पनेत समानतेवर असलेला भर हा भिन्नत्वसुद्धा अधोरेखित करतो. त्यामुळे आपपरभाव ‘नेशन’ संकल्पनेत अनुस्यूत आहे.
 
भारतीय ‘राष्ट्र’ संकल्पना अधिक भावात्मक आहे. इथे ‘माता भूमि पुत्रोऽहं पृथिव्या’ यासारख्या वचनांतून समाज आणि भूभागाचा परस्परसंबंध दर्शवला आहे. जीवनधारणा या बंदिस्त रिलीजनवर आधारित नसून, एकाचवेळी व्यक्तिगत आणि वैश्विक असणार्‍या धर्मावर आधारित आहेत. भाषांचा भेद नसून सर्व भाषांमधून व्यक्त होणार्‍या भावना समान आहेत. त्यामुळे जगातील अन्य कुठल्याही प्रदेशात नसतील, तितके भेद अस्तित्वात असतानाही भारतात एकत्वाचे धागे अधिक घट्ट आहेत. इथे भाषेतील, आहारातील, वस्त्रे परिधान करण्यातील, धार्मिक आचारातील थोड्याशा भेदांवरून छोट्या पृथक अस्मिता उभ्या राहण्याऐवजी हे भेद कायमच ठेवून त्यांच्यातील समान धागा शोधणे आणि त्याआधारे आचरणाने भिन्न, पण प्रकृतीने समान अशा एकसंध अशा समाजाची निर्मिती करणे, यावर भर राहिला आहे. या एकत्वाचे मूळ हे भारतीय संकल्पनेतील व्यक्ती, समाज, चराचर सृष्टी आणि परमेश्वर यांच्या परस्परसंबंधातील चिंतनात आहे. त्यामुळे आपली ‘राष्ट्र’ संकल्पना ही भेदमूलक नसून, परस्पर सौहार्दाला अधिक पोषक आहे. त्यामुळेच भारताचे संकल्पनात्मक राष्ट्रीयत्व सहजगत्या वैश्विक होऊन ‘वसुधैव कुटुम्बकम्’ आणि ‘स्वदेशो भुवनत्रयम्’ असा उद्घोष करते.
 
भारताचा विचार करताना पाश्चात्य ‘नेशन-स्टेट’ संकल्पनेच्या या त्रुटी लक्षात घेऊन आणि ‘नेशन’ आणि ‘राष्ट्र’ यातील संकल्पनात्मक भेद लक्षात घेऊन आपले चिंतन पुढे न्यायला हवे. एक समाज म्हणून आपला जीवनानुभव हा काही सहस्र वर्षांचा आहे. त्या संचिताच्या आधारे आपण स्वतःसाठी आणि सर्व जगासाठी निश्चितच एक नवे प्रतिमान तयार करू शकतो.
 
डॉ. हर्षल भडकमकर