'मराठवाडा वॉटर ग्रीड' प्रकल्पातून मराठवाड्याला कायमस्वरुपी पाणी उपलब्ध होणार!

22 Jan 2025 18:29:53
 
Gulabrao Patil
 
मुंबई : 'मराठवाडा वॉटर ग्रीड' प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला कायमस्वरुपी पाणी उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील यांनी केले.
 
बुधवार, २२ जानेवारी रोजी 'मराठवाडा वॉटर ग्रीड' प्रकल्पाबाबत जागतिक स्तरावरील बँकांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, जल जीवन मिशन अभियान संचालक ई रवींद्रन, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे उपस्थित होते. यासोबतच अशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे राजेश यादव, एशियन डेव्हल्पमेंट बँकेचे विकास गोयल, न्यू डेव्हल्पमेंट बँकचे बिंदू माधव पांडा, एन रंगनाथ हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  जळगाव जिल्ह्यात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना उघड!
 
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, "मराठवाड्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मराठवाड्यातील ११ मोठी धरणे पाईपलाईनद्वारे जोडून सर्व शहरे आणि गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी 'मराठवाडा वॉटर ग्रीड' योजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला शाश्वत पाणी उपलब्ध होणार आहे, तसेच प्रकल्पाच्या उभारणीसाठी जागतिक स्तरावरील बँकांचा सहभाग राहणार आहे," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. 'मराठवाडा वॉटर ग्रीड' प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला दीर्घकालीन स्वरुपात पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य शासनाने वर्ल्ड बँक, आशियायी विकास बँक यासारख्या बँकांमार्फत कर्ज स्वरुपात निधी उभारणी करुन मराठवाडा वॉटर ग्रीड' प्रकल्पाची उभारणी करण्यात यावी, असे सूचित केले आहे. त्यानुसार ‘मित्रा’ संस्थेमार्फत अशा जागतिक संस्थांशी समन्वय साधून हा प्रकल्प पुढे नेण्याच्या अनुषंगाने पाठपुरावा करण्यात यावा," असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0