आज जगाचा वेग झपाट्याने वाढतो आहे, त्याबरोबरच माणसाचा श्वासदेखील कोंडला जातो आहे. तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे कामाचे तास वाढले, आकांक्षापूर्तीचा अट्टहासही वाढला. या सगळ्यात माणसाचे समाधान सहज हरवलेले दिसून येते. जगभरातल्या लाखो तरुणांना ही समस्या समजतच नाही. ‘जास्त काम म्हणजे, जास्त यश’ हे एक सूत्र, सातत्याने मानवी मनावर बिंबवले गेले. त्यामुळे सतत यशस्वी होण्याचे व्यसन लागलेल्या उद्योगपती आणि व्यावसायिकांच्या मनात थांबण्याचा विचारच येत नाही. या सगळ्यात प्रत्यक्ष काम करणार्या तरुणांवर काय परिणाम होतो आहे? हे पाहण्यासाठी लागणारा वेळही त्यांच्याकडे नाही. त्यामुळेच तरुणांकडून आजमितीला ‘मायक्रो रिटायरमेंट’ या संकल्पनेचा स्वीकार केला जात आहे. मन:शांतीच्या शोधात आज जगभरातील तरुण या संकल्पनेचा स्वीकार करत आहे.
निवृत्ती म्हटले की, अनेकांना आयुष्याच्या संध्याकाळी मिळणारा शांत वेळ आठवतो. अर्थात वयाच्या 60-65व्या वर्षी निवृत्ती घेतली जाते, हाच अर्थ मनात रुजलेला असतो. पण, ‘मायक्रो रिटायरमेंट’ ही नवी संकल्पना या या पारंपरिक संकल्पनेला छेद देते. ‘आयुष्यात शांतता आणि मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी आयुष्याच्या संध्याकाळची वाट पाहू नका, आता थोडे थांबा, श्वास घ्या आणि नव्या उमेदीने कामाला लागा’ या संकल्पनेवर ‘मायक्रो रिटायरमेंट’चा भर असतो. ‘मायक्रो रिटायरमेंट’ म्हणजे, कायमची निवृत्ती नाही, तर काही आठवड्यांची, काही महिन्यांची घेतलेली अल्पकालीन विश्रांती असते.
पण, माणसाला ऐन तारुण्यात दैनंदिन कामकाजातून अशी ‘मायक्रो रिटायरमेंट’ का घ्यावी लागतेे आहे? कारण, आज कामाच्या गतीने माणसाला यंत्रवत केले आहे. आठवड्यातले पाच-सहा दिवस घड्याळ्याच्या काट्यावर चालणे, कामाचे उद्दिष्ट गाठण्यातच दिवसाचे १२-१५ तास खर्च करणे आणि स्वतःला मानव न समजता निव्वळ तथाकथित सिस्टमचा भाग मानणे, ही सध्या तरुणांची जीवनशैली झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेने हा खेळ सुरू केला आहे. भारतातल्या काही उद्योगपतींनी तर अधिक काम करणे याला प्रतिष्ठेचे चिन्हच मानले आहे. या उद्योजकांनी तर कर्मचार्यांनी किती तास काम केले पाहिजे, यासाठी तासांचे आकडे लावण्याच्या स्पर्धादेखील सुरू केल्या आहेत. ‘ज्यांना यश हवे, त्यांनी शांत बसूच नये’, हे वाक्य आताच्या पिढीत इतके रुजले आहे की, काही क्षण थांबणे म्हणजे पराभव वाटायला लागला आहे.
पण, या सगळ्यात हा विचार करणेदेखील गरजेचे आहे की, या सततच्या धावपळीत आपण नेमके काय गमावतो आहोत? वैयक्तिक आयुष्य, कुटुंबाशी असलेले नाते, स्वतःची आवड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःचे मानसिक स्वास्थ्य. आजची पिढी सतत सामाजिक प्रतिष्ठा आणि यशासाठी धावत राहते. चांगले घर, आलिशान गाडी, ब्रॅण्डेड कपडे यासाठी, सतत बक्कळ पैसा मिळवायचा आहे. पण, या सगळ्या धामधूमीत माणूस स्वतःलाच विसरतो आहे. आपण फक्त यंत्रवत जगतो आहोत, हे त्याला समजायलादेखील वेळ लागतो आहे. भारतातली परिस्थिती याला अपवाद नाही. आपल्या देशात तरुणाच्या मागे ‘सेटल’ होण्याचा जबरदस्त तगादा लावला जातो आहे. अगदी तरुणांकडून सणासुदीला, अगदी कामावरून घरी आल्यावरदेखील काम करून घेतले जाते आहे. परिणामी, मानसिक आजार, नैराश्य आणि ताणतणाव यांचे समाजातील प्रमाण सातत्याने वाढते आहे.
‘मायक्रो रिटायरमेंट’ ही संकल्पना तरुणांना वेगळा आधार देताना दिसते. तरुणांनी थोडा वेळ स्वतःसाठी काढावा, कामाच्या व्यापातून बाहेर यावे, मी कोण आहे? मला खरंच काय हवे आहे? याचा शोध घ्यावा, प्रवास करावा, नवी कौशल्ये आत्मसात करावी, कुटुंबासोबत वेळ घालवावा आणि स्वतःलाही मोकळा वेळ द्यावा, इतकेच या संकल्पनेमध्ये समाविष्ट आहे. पण, याच्यातही चुका होतात. काही जण ‘मायक्रो रिटायरमेंट’चा अर्थ म्हणजे केवळ मजा असा घेतात आणि पुन्हा विश्रांती नंतरही त्याच वर्तुळात परततात. त्यामुळे ध्येय साध्य होत नाही. ‘मायक्रो रिटायरमेंट’ ही संकल्पना वाईट नक्कीच नाही. मात्र, याची गरज निर्माणच का झाली? यावर सर्व स्तरातून गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. तो न झाल्यास परिस्थितीमध्ये फार काही सकारात्मक बदल होतील, अशी अशा बाळगता येणार नाही.
कौस्तुभ वीरकर