मुंबई दि. २१ : प्रतिनिधी महावितरणच्या पुणे परिमंडलातील पर्वती विभागमध्ये कार्यरत प्रतीक वाईकर यांच्या नेतृत्वात भारतीय खो-खो संघाने पहिल्या विश्वचषकाचे विजेते होण्याचा मान पटकावला आहे. तब्बल २० देशांचा सहभाग असलेल्या या विश्वस्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार व उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रतीक वाईकर यांनी मोलाची कामगिरी केली. विजेत्या संघासह वाईकर यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महावितरणचे खेळाडू म्हणून विश्वचषक विजेत्या संघाचे नेतृत्व करणाऱ्या प्रतीक वाईकर यांचे राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. याचसोबत, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, संचालक अरविंद भादिकर, पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, पुणे परिमंडळ मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी अभिनंदन केले आहे.
क्रीडा कोट्यातून १९ जून २०१२ मध्ये प्रतीक वाईकर वयाच्या १९ व्या वर्षी महावितरणमध्ये रुजू झाले. दि. २७ मार्च १९९२ रोजी जन्मलेले प्रतीक यांनी सन २००० च्या सुमारास बास्कटेबॉल, लंगडी व गोल खो-खो खेळायला सुरवात केली. संगणकशास्त्रात बीएस्सी पदवीधर असलेल्या प्रतीक यांनी फायनान्समध्ये एमबीए केलेले आहे. त्यामुळे खेळ व अभ्यास या दोहोंना कायम महत्व दिल्याने कुटुंबियांचे देखील प्रतीक यांना खो-खो खेळण्यासाठी मोठे पाठबळ मिळाले. महाराष्ट्र शासनाचा श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त असलेले प्रतीक वाईकर यांनी महाराष्ट्र संघाच्या १४ वर्षाखालील, १६ वर्षाखालील व १८ वर्षाखालील वयोगटाचे व वरिष्ठ गटाचे नेतृत्व केले आहे. अशी कामगिरी करणारे ते एकमेव खो-खोपटू आहे. प्रतीक यांना खो-खोच्या विविध स्पर्धा व सरावासाठी महावितरणकडून कायमच सहकार्य करण्यात आले आहे. यासाठी प्रतीक यांचे घर, क्रीडांगण व कार्यालय केवळ दोन किलोमीटर परिघात ठेवण्यात आले आहे.