धाराशिवच्या वाघ बचावकार्यातून 'ताडोबा टीम' आऊट 'रेस्क्यू-पुणे' इन

20 Jan 2025 21:17:46
https://zeenews.india.com/marathi/maharashtra/gujarat-forest-department-vs-maharashtra-nandurbar-district-tribal-people-over-leopard-issue/878469



मुंबई (विशेष प्रतिनिधी) - धाराशिवच्या वाघाला पकडण्यासाठी आलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा टीमला वन विभागाने पुन्हा चंद्रपूरला पाठवले आहे (dharashiv tiger). त्याजागी आता वाघाला पिंजराबंद करण्याची जबाबदारी रेस्क्यू-पुणे टीमला देण्यात आली आहे (dharashiv tiger). सोमवार दि. २० जानेवारी रोजी रेस्क्यू-पुणे टीम घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी वाघाला पकडण्याची तयारी सुरू केली आहे. (dharashiv tiger)
 
 
टिपेश्वर अभयारण्यातून धाराशिवमध्ये दाखल झालेला वाघ सध्या येडशी रामलिंग वन्यजीव अभयारण्याच्या परिसरात आहे. या वाघाला पकडून त्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचे निर्देश अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले आहेत. गेल्या आठवड्यात मंगळवारी या वाघाने येडशी परिसरात एका गायीवर हल्ला करुन तिला ठार केले होते. बुधवारी हा वाघ कॅमेऱ्यात कैद झाला होता. शुक्रवारी या वाघाने बार्शी तालुक्यातील उक्कडगाव हद्दीत प्रवेश केरुन तीन जनावरांना ठार केले होते. मात्र, याठिकाणी वाघाला पकडण्यासाठी तैनात असलेल्या ताडोबातील रेस्क्यू टीमला वाघाला पकडता आले नाही.
 
 
सोमवार दि. २० जानेवारी रोजी ताडोबाची टीम पुन्हा चंद्रपूरला परतली आहे. याविषयी पुण्याचे मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रवीण यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, "ताडोबाच्या टीममधील पशुवैद्यकांना चंद्रपूरला परतणे गरजेचे असल्याने आम्ही त्यांना पाठवले असून वाघाला पकडण्याची जबाबदारी 'रेस्क्यू-पुणे' टीमला देण्यात आली आहे." 'रेस्क्यू-पुणे'ची टीम धाराशिवमध्ये सोमवारी सकाळी दाखल झाली. त्यांनी वाघाच्या हालचालींचा मागमूस काढून आपले बस्तान भूम परिसरात बसवले आहे. पाळीव कुत्रे आणि ड्रोनच्या मदतीने देखील वाघाच्या हालचालींचा मागोवा काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0