दिल्लीतील शेतकऱ्यांची आप सरकारतर्फे फसवणूक

02 Jan 2025 18:11:47
 
AAP
 
नवी दिल्ली : (AAP) गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. मात्र, आप सरकार आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा ठपका केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी ठेवला आहे.
 
विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीचे राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल त्यांनी दु:ख आणि चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, आपण अत्यंत दुःखाने हे पत्र लिहीत असून आप सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेतल्याचे दिसून आले आहे.केंद्र सरकारच्या शेतकरी हिताच्या योजनाही दिल्लीत राबविण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे आज दिल्लीतील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. आपण यापूर्वीही पत्र लिहून दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समस्यांची माहिती दिली होती. मात्र, आप सरकारने या समस्यांकडे दुर्लक्ष करणे ही चिंतेची बाब असल्याचे पत्रात म्हटले आहे.
 
शिवराज सिंह चौहान पुढे लिहितात की, दिल्लीमध्ये गेल्या १० वर्षांपासून आपचे सरकार आहे, परंतु माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केवळ शेतकरी बंधू-भगिनींची फसवणूक केली आहे आणि निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या घोषणा करून राजकीय लाभ घेतला आहे. केजरीवाल सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी नेहमीच फसवणूक केली आहे. आप सरकारच्या बेजबाबदार वृत्तीमुळे केंद्र सरकारच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची अंमलबजावणी झालेली नाही. मिशनची अंमलबजावणी न झाल्यामुळे शेतकरी बंधू-भगिनींना रोपवाटिका आणि टिश्यू कल्चरची स्थापना, लागवड साहित्याचा पुरवठा, काढणीपश्चात व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधांची उभारणी, नवीन फळबागांचे अनुदान, यासह अनेक योजनांचा लाभ घेता येत नसल्याचेही केंद्रीय कृषीमंत्र्यांनी अधोरेखित केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0