नाशिकची ‘तामसवाडी एक्सप्रेस’

18 Jan 2025 10:13:23
Vaibhav Shinde

काश्मीर ते कन्याकुमारी हे ४ हजार, ११२ किमीचे अंतर अवघ्या ४४ दिवस, १७ तास, १५ मिनिटांत पूर्ण करुन, विश्वविक्रमाला साद घालणार्‍या शेतकरीपुत्र वैभव शिंदे याच्याविषयी...

वय वर्ष अवघे २६ असलेला नाशिकचा शेतकरीपुत्र वैभव शिंदे याने, विश्वविक्रमाला गवसणी घालत ‘गिनीज बुक’ला आपली नोंद घेण्यास नुकतेच भाग पाडले. सुमारे ४ हजार, ११२ किलोमीटरचे काश्मीर ते कन्याकुमारी अंतर त्याने अवघ्या ४४ दिवस, १७ तास, १५ मिनिटांमध्ये पूर्ण केले. यासाठी त्याला जीवतोड मेहनत करावी लागली, तरी तो मागे हटला नाही.
निफाड तालुक्यातल्या तामसवाडी नावाच्या छोट्याशा खेड्यात दि. ५ जून १९९८ रोजी जन्म झालेल्या वैभवचा प्रवास थक्क करणारा आहे. आई आशाबाई, वडील वाल्मिक, लहान भाऊ विकास आणि वैभव असे चौकोनी शेतकरी कुटुंब. विश्वविक्रमवीर वैभवचे प्राथमिक शिक्षण गावातीलच मविप्र समाजाच्या जनता विद्यालयात, तर माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मविप्रच्याच मांजरगाव येथील जनता विद्यालयात झाले.आपल्या धावण्याची चुणूक त्याने, शाळा-महाविद्यालयातच दाखवायला सुरुवात केली. या काळात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळवत त्याने, अनेक पारितोषिके पटकावली. परंतु, धावण्याच्या स्पर्धेत दुखापत झाल्याने, मधल्या काळात त्याने धावण्याला लगाम घातली. परंतु, त्याचे मन काही त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. अशातच दिल्लीमध्ये, सुफिया खान या प्रशिक्षकाबरोबर त्याची भेट झाली. महाराष्ट्रातून अद्याप असा विक्रम कोणी केलेला नाही, हे त्यांनीच वैभवच्या डोक्यात घातले. येथूनच खर्‍या अर्थाने त्याच्या विश्वविक्रमी प्रवासाला सुरुवात झाली.

डिसेंबर २०२१ सालापासून नाशिक येथील सायकलिस्ट डॉ. महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली वैभवने सरावाला सुरुवात करत, दररोज दोन ते तीन तास कसून सराव केला. सरावादरम्यान वैभवने नाशिक ते शिर्डी हे अंतर भर पावसात ११ तास, ३० मिनिटांत, तर नाशिक ते मालेगाव हे अंतर ४२ अंश सेल्सिअस तापमानात १४ तासांत पूर्ण केले. तीन वर्षे केलेल्या अथक परिश्रमानंतर दि. ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी, काश्मीरमधील श्रीनगरच्या लाल चौकातून वैभवने आपल्या विश्वविक्रमी मोहिमेला सुरुवात केली. यादरम्यान कडाक्याची थंडी, ऊन, वारा कशाचीही तमा न बाळगता, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करत तो धावत सुटला. काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर पूर्ण करून, ‘सोल रन’मध्ये तो जगज्जेत्ता ठरत इतिहासाला गवसणी घातली. काश्मीर ते कन्याकुमारी हे ४ हजार, ११२ किमी अंतर, यापूर्वी सन २०१९ मध्ये हरियाणा येथील संजयकुमार आणि रतनकुमार या दोघांनी पूर्ण केले आहे. त्यावेळी त्यांना हे अंतर पार करण्यासाठी, ५२ दिवस, ४ तास, ४० मिनिटे इतका कालावधी लागला होता. महिलांमध्ये दिल्लीच्या सुफिया खान यांनी, ८७ दिवसांमध्ये हे अंतर पूर्ण केल्याची नोंद आहे. यांच्या तुलनेत वैभवने खूपच कमी कालावधी घेतल्याचे दिसून येते. हा विश्वविक्रम करणे वैभवसाठी सोपे नव्हते. सरावादरम्यान दररोज सरासरी ९० ते १०० किमी धावायचे, त्यानंतरच झोपायचे अशी मनाशी खूणगाठ बांधूनच वैभव सरावाला सुरुवात करत असे. ‘सोल रन’ पूर्ण करण्यास किती दिवस लागतील याचा अंदाज नसल्याने, सुरुवातीला तर काही दिवस धावता धावता जेवण केल्याचे वैभव सांगतो. रस्त्यात अनेक प्रसंग आले पण, वैभव जिद्दीने धावतच राहिला. त्याची हीच मेहनत आता फळाला आली आहे. दरम्यान, धावताना त्याला भारताच्या माणुसकीचे दर्शन घडले. १२पेक्षा जास्त राज्ये आणि ११०हून अधिक शहरांमधून प्रवास करताना, त्याला ठिकठिकाणी माणुसकीचे दर्शन होत गेले. यादरम्यान त्याला शेकडो जण भेटले. त्याच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले. अनेकांनी त्याच्या या ध्येयाला सलाम केला. अनेकांनी आर्थिक मदतही देऊ केली. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी दूध आणि जेवणही दिले. या सर्व प्रवासात, खर्‍या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडत गेल्याचे वैभव आवर्जून सांगतो. वैभवला विश्वविक्रमासाठी लागणारा सर्व आर्थिक भार कल्याण-डोंबिवलीचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उचलला. त्यांच्या पाठबळावरच त्याने इतके मोठे शिवधनुष्य उचलले.

आपल्या प्रवासाविषयी वैभव सांगतो, “शेतकरी कुटुंबातून असल्याने, जागतिक स्तरावर विश्वविक्रम करण्याचे स्वप्न बघणे हा महागडा प्रवास वाटायचा. परंतु, सुरुवात केल्यावर चारही बाजूंनी मदतीचे हात पुढे आले. ग्रामीण भागातून तरुणांनी पुढे येण्याचे धाडस करायला हवे. जेणेकरुन अजून असे विश्वविक्रम भारताच्या नावे होतील. मी देखील एक सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातीलच आहे. आपण जर जिद्दीने ठरवले, तर अशक्य असे काहीच नाही. माझ्यासारखा महाराष्ट्रातील प्रत्येक युवा विश्वविक्रम करू शकतो,” हा दृढ विश्वास वैभवला आहे. यापुढेदेखील अशा अनेक विश्वविक्रमाला गवसणी घालण्यास सज्ज असलेल्या वैभव शिंदे याला, दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

विराम गांगुर्डे
९४०४६८७६०८
Powered By Sangraha 9.0